अलीकडच्या काळात हातात केवळ स्मार्टफोन असून चालत नाही तर तो आकाराने मोठादेखील असावा लागतो. परंतु, आकाराने मोठा असलेला स्मार्टफोन किमतीलाही जास्त असतो किंवा किंमत कमी असल्यास ‘मोठे’पणापलीकडे त्यात बाकीच्या वैशिष्टय़ांच्या बाबतीत तडजोड करावी लागते. मात्र, ‘लेइको’चा ‘ला २’ याला अपवाद ठरू शकेल.

भारतीय ग्राहकांची नवनवीन स्मार्टफोनबद्दलची ओढ संपता संपत नाही. सहा महिन्यांपूर्वी घेतलेला फोन जुना वाटू लागतो. मग नवीन स्मार्टफोनसाठी शोधाशोध सुरू होते. याची सुरुवात आधीच्या स्मार्टफोनपेक्षा मोठा आणि अधिक वैशिष्टय़े असलेला स्मार्टफोन शोधण्यापासून होते. ग्राहकांच्या या सवयीमुळेच प्रत्येक मोबाइल कंपनी भारतात दरवर्षी डझनभर स्मार्टफोन ‘लाँच’ करते. एवढेच नव्हे तर दरवर्षी नवनवीन कंपन्या भारतीय बाजारात उतरून एका पाठोपाठ ‘फ्लॅगशिप’ स्मार्टफोन आणत असतात.
या वर्षी ‘ले इको’ कंपनीने तसाच सपाटा चालवला आहे. या कंपनीने दोन आठवडय़ांपूर्वी भारतात ‘ला २’ नावाचा स्मार्टफोन ‘सुपरफोन’ नावाने सादर केला. १६ एमपी बॅक कॅमेरा आणि आठ एमपी फ्रंट कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनची अन्य वैशिष्टय़े पाहता हा स्मार्टफोन ११९९९ रुपयांत मिळेल, अशी कल्पना करता येत नाही.
कॅमेरा हेच ‘ला २’चे प्रमुख वैशिष्टय़ आहे. या स्मार्टफोनमध्ये ‘फेज डिटेक्शन ऑटो फोकस’ अर्थात ‘पीडीएएफ’ कॅमेरा असून त्याद्वारे अधिक गडद छायाचित्रे काढता येतात. विशेष म्हणजे, हा कॅमेरा समोरील दृश्यावर फोकस करण्यासाठी अवघे ०.०९ सेकंद इतका अवधी घेतो. त्यामुळे कॅमेरा धरून त्याचा फोकस स्थिर होण्यासाठी प्रतीक्षा पाहावी लागत नाही. छायाचित्र काढताक्षणी त्याचे ‘एडिटिंग’ करण्याची सुविधा यात पुरवण्यात आली आहे. या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेराही आठ मेगापिक्सेलचा आहे. त्यामुळे सेल्फी काढणाऱ्यांसाठी हा एक उपयुक्त स्मार्टफोन आहे. दोन्ही कॅमेऱ्यांतून येणारी छायाचित्रे सुस्पष्ट आहेत. शिवाय या स्मार्टफोनमध्ये ‘४के’ व्हिडीओ रेकॉर्डिगचीही सुविधा आहे. त्यामुळे कॅमेऱ्यातून रेकॉर्ड केलेला व्हिडीओ मोठ्ठय़ा टीव्हीवरही अतिशय सुस्पष्ट आणि ‘प्रोफेशनल कॅमेऱ्या’ने रेकॉर्ड केल्यासारखा दिसतो.
कॅमेऱ्यानंतर या स्मार्टफोनचे दुसरे वैशिष्टय़ याची ‘मेटॅलिक बॉडी’ आहे. तांबुस सोनेरी रंगात असलेली धातूची ‘बॉडी’ स्मार्टफोनला आकर्षक तर बनवतेच; परंतु त्याला मजबुतीही देते. असे असले तरी, या स्मार्टफोनचे वजन साधारण दीडशे ग्रॅमच्या आसपास आहे. या फोनमध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले पुरवण्यात आला असून त्यात १०८० बाय १९२० इतके रेझोल्युशन आहे. त्यामुळे यावर व्हिडीओ किंवा छायाचित्रे पाहण्याचा अनुभव वेगळा ठरतो.
‘ला २’चे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यात अँड्रॉइडची सर्वात प्रगत अर्थात ‘मार्शमेलो’ आवृत्ती आहे. या आवृत्तीमुळे स्मार्टफोनची हाताळणी अधिक सहज होते. या फोनमध्ये २.३ गिगाहार्ट्झचा डय़ुअल कोअर आणि २ गिगाहार्टझचा क्वाड कोअर प्रोसेसर पुरवण्यात आले आहेत. याशिवाय यात १.४ गिगाहार्ट्झचा क्वाड कोअर प्रोसेसरही आहे. यात तीन जीबी रॅम असल्याने अ‍ॅप्स किंवा व्हिडीओ चालवताना फोनचा वेग मंदावण्याचा प्रश्न येत नाही. याची स्टोअरेज क्षमता ३२ जीबी इतकी आहे.
‘ला २’ हा १२ हजार रुपयांच्या किमतीत मिळणारा चांगला पर्याय आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर, सुस्पष्ट आवाजासाठी चार्जिग पॉइंटच्या बाजूला असलेले स्पीकर, एलईडी फ्लॅश ही वैशिष्टय़े या फोनला अधिक आकर्षक आणि वरच्या श्रेणीतील बनवतात.