दक्षिण कोरिआ स्थित ‘एलजी इलेक्ट्रॉनिक’ ही सुप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक निर्माती कंपनी नव्या वर्षात ‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो-२०१६’ (सीईएस) मध्ये गुंडाळून ठेवता येणारा अर्थात ‘फोल्डेबल डिस्प्ले’ घेऊन येणार आहे. ‘एलजी’चा हा ‘फोल्डेबल डिस्प्ले’ १८ इंचाचा असणार असून तो ‘ओएलईडी’ आणि ‘एलसीडी’ वर्गवारीतील असेल.
दरम्यान, ‘फोल्डेबल डिस्प्ले’ घेऊन येणारी ‘एलजी’ ही पहिली कंपनी नाही. यापूर्वी सर्व प्रथम सोनी कंपनीने ‘सीईएस २०१०’ मध्ये ‘ओएलईडी फोल्डेबल डिस्प्ले’ दाखल केला होता. त्यानंतर ‘सीईएस २०१३’ मध्ये सॅमसंग कंपनीने अशाच प्रकारचा फोल्डेबल डिस्प्ले दाखल केला होता. मात्र, त्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती कंपनीने अद्याप तरी सुरू केलेली नाही. ‘फोल्डेबल डिस्प्ले’ सोबतच ‘एलजी’ कंपनी यंदाच्या ‘सीईएस’मध्ये १५.६ इंचाचा आणि केवळ ९८० ग्रॅम वजनाचा लॅपटॉप सादर करणार आहे. हा लॅपटॉप जगातील सर्वात हलका लॅपटॉप असेल, असा दावा देखील कंपनीकडून करण्यात आला आहे.