News Flash

पावसाळी गॅजेट्स

पावसातही आनंदात भंग न करता काम करू शकणारे गॅजेट्स बाजारात आले आहेत.

पावसाळी गॅजेट्स
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

शनिवारपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे पुढच्या वीकेंडला नक्कीच कुठे तरी प्रवासाचे नियोजन झाले असेलच. हे नियोजन करीत असताना तुम्ही कोणत्या वस्तू न्यायच्या याची यादी करीत असताना त्या वस्तू पावसात भिजल्या तरी काही होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे अगदी मुसळधार पावसातही तुमच्या आनंदात भंग न करता तुमचे काम करू शकणारे गॅजेट्स बाजारात आले आहेत. पाहू या असेच काही पावसाळी गॅजेट्स.

ब्लूटूथ स्पीकर

वीकेंडला फिरायला जाताना सर्वात प्रथम आपण कोणते काम करतो ते म्हणजे आपल्या आवडीची गाणी एका पेन ड्राइव्हमध्ये अथवा मोबाइलमध्ये घेऊन जातो. पावसात भिजत मज्जा करता येईल अशी काही गाणी असतात. ही गाणी ऐकण्यासाठी चांगला स्पीकर असणेही आवश्य आहे. तुमच्याकडे बरेच स्पीकर असले तरी त्यात जर पाणी गेले तर ते नक्कीच बंद पडतील. मात्र अ‍ॅल्टेक या कंपनीने एक असा ब्लूटूथ स्पीकर बाजारात आणला आहे की जो अगदी भर पावसातही आपल्याला गाण्यांचा मनमुराद आनंद घेऊ देतो. या स्पीकरला एक विशिष्ट प्रकारचे कव्हर लावण्यात आले आहे. ज्याच्यामुळे तो पाण्यापासून सुरक्षित राहतो. इतकेच नव्हे तर धूलिकण, माती, बर्फ या सर्वापासूनही तो सुरक्षित राहतो. तसेच हा स्पीकर शॉकप्रूफ असल्यामुळे लहान मुलांनी जरी त्याला हात लावला तरी तसे भीतीचे कारण नाही. हा स्पीकर खोल पाण्यात तब्बल १५ मिनिटे राहू शकतो. हा स्पीकर अ‍ॅमेझॉनवर ५९९० रुपयांना उपलब्ध आहे.

एमपीथ्री प्लेअर

आपल्या आवडीची गाणी ऐकत पावसात चालत जाणे अनेकांना आवडते. पण पावसातही काम करणारा वॉकमन आपल्या हातात नसतो. जर तुम्हाला पावसात चालणारा वॉकमन घ्यायचा असेल तर बाजारात त्याचेही पर्याय उपलब्ध आहेत. बाजारात वॉटरप्रूफ एमपीथ्री प्लेअर्स उपलब्ध आहेत. यासाठी तुम्ही सोनीचा वॉकमन खरेदी करू शकता. तुमच्याकडे सोनीचा वॉटरप्रूफ व डस्टप्रूफ वॉकमन खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हा तुम्हाला बाजारात सहा हजार रुपयांपासून उपलब्ध आहे. याचबरोबर तुमच्याकडे पायलेचाही एमपीथ्री प्लेअर खरेदी करण्याचा पर्याय आहे. आयपी एक्स ८चा हा प्लेअर पाण्यात ३.३ फूट खोलवर जाऊनही काम करू शकतो. याची किंमतही साडेसहा हजारापासून पुढे आहे.

इअरफोन

अनेकांना स्विमिंग करीत असताना गाणी ऐकणे आवडते. यासाठी तुमच्याकडे खास इअरफोन्स असणे आवश्यक आहे. आज बाजारात अशा प्रकारच्या क्रीडा प्रकारातील इअरफोन्सचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. यात सॅमसंग, फिलिप्ससारख्या मोठय़ा ब्रॅण्ड्सनीही आपली उत्पादने बाजारात आणली आहेत. फिलिप्सचा एसएचक्यू१२०० अ‍ॅक्शन फिट इअरफोन बाजारात दीड हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. तर एमईई ऑडिओ एम६ हे इअरफोनही बाजारात उपलब्ध आहेत. हे इअरफोन ऑनलाइन बाजारात दोन हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत.

स्मार्ट घडय़ाळ

स्मार्ट घडय़ाळ ही सध्याच्या तरुणाईची आवडती गोष्ट आहे. हे घडय़ाळ घातल्याशिवाय ते कुठे प्रवासच करत नाहीत. अशा वेळी पावसात हे घडय़ाळ वापरायचे असेल तर त्यांनी नक्कीच पाण्यात चालणारे घडय़ाळ घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे घडय़ाळ पाण्यामुळे बिघडू शकते. सध्या बाजारात अनेक बडय़ा ब्रॅण्ड्सचे स्मार्ट घडय़ाळ हे पाण्यामुळे खराब होत नाहीत. पेबल टाइम स्टील हा एक स्मार्ट घडय़ाळाचा चांगला पर्याय आहे. याची किंमत ८९९९ रुपये इतकी आहे. हे घडय़ाळ १.२५ इंचाचे असून ते अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएसवर काम करते. याचबरोबर बाजारात सॅमसंग तसेच इंटेक्ससारख्या कंपनीचेही स्मार्ट घडय़ाळं बाजारात उपलब्ध आहेत. इंटेक्सचे ४९९९ रुपयांचे आयरिस्ट प्रो हे पाण्यात वापरण्यासारखे स्मार्ट घडय़ाळ आहे. जर तुम्ही अ‍ॅपलचे फॅन असला आणि तुम्हाला स्मार्ट घडय़ाळय़ावर जास्त पैसे खर्च करणे शक्य असेल तर तुम्ही २८ हजार रुपयांचे आयवॉचही खरेदी करू शकता.

स्मार्टफोन्स

पावसाळा आला की आपल्या फोनला एका चांगल्या पिशवीत अथवा बाजारात उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिक कव्हरमध्ये ठेवून त्याची जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. यामुळे अनेकदा पाऊस असल्यावर आपण फोन बाहेर काढण्यास टाळतो. पण खास पाण्यातही वापरता येईल असे स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. सॅमसंगने २०१६मध्ये गॅलेक्सी एस ७ हा फोन बाजारात आणला होता. तो फोन आणि त्यानंतर बाजारात आणलेले सर्व फोन हे वॉटरप्रूफ आहेत. यामुळे अगदी खोल पाण्यातही हे फोन वापरता येऊ शकतात. तसेच मोटोरोला या कंपनीचा मोटो एक्स हा फोनही वॉटरप्रूफ असून तो सॅमसंगच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. सॅमसंगचा फोन ४५ हजारांपासून उपलब्ध आहे तर मोटो एक्स हा १८ हजारात उपलब्ध आहे. याशिवाय अन्य ब्रॅण्ड्सचेही वॉटरप्रूफ फोन्स बाजारात उपलब्ध आहेत.

फिटनेस बॅण्ड्स

सध्या अनेक जण हातात फिटनेस बॅण्ड्स वापरतात. पण पावसामुळे अनेकांनी आपल्या हातातील हे बॅण्ड्स काढून ठेवले आहेत. पावसाळय़ात चालतील असे अनेक बॅण्ड्स बाजारात उपलब्ध आहेत. शिओमी या कंपनीचा एमआर बॅण्ड हा वॉटरप्रूफ असून तो अवघ्या एक हजार रुपयांत उपलब्ध आहे. हा बॅण्ड तब्बल दीड तास पाण्यात राहून काम करू शकतो. तसेच साधारणत: २०१६पासून बाजारात दाखल झालेले सर्वच फिटबॅण्ड हे वॉटरप्रूफ असल्यामुळे तुम्ही इतर पर्यायांचाही विचार करू शकता.

नीरज पंडित   

  Niraj.pandit@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 1:14 am

Web Title: marathi articles on new gadgets technology
Next Stories
1 कॅमेऱ्याची उत्क्रांती- पिनहोल ते सध्याची सेल्फीक्रांती
2 कोणता टीव्ही घेऊ?
3 अ‍ॅपवर संपूर्ण जीएसटी
Just Now!
X