खरे तर आपल्याला एखादे एकक दुसऱ्या एककात रूपांतरित करण्याबद्दल शाळेतच शिकवले जाते. जसे की, एक किमी बरोबर एक हजार मीटर किंवा एक लिटर म्हणजे एक हजार मिलिलिटर, एक तास म्हणजे साठ मिनिटे म्हणजेच तीन हजार सहाशे सेकंद वगैरे.
काही वेळेला आपल्याला एकक रूपांतरित करताना कॅल्क्युलेटरची मदत घ्यावी लागते. कारण काही आकडेमोड करणे थोडे कठीण असते. बहुतांश वेळेला आपण उंची फूट आणि इंचांमध्ये सांगतो. परंतु आपली उंची जर सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये विचारली तर गोंधळायला होते. नवजात बालकाचे वजन कोणी पाऊंडमध्ये तर कोणी किलोग्रॅममध्ये सांगतात. तेव्हाही बऱ्याचदा अनेकांचा गोंधळ उडतो. घराच्या प्लॉटचे क्षेत्रफळ जुनी मंडळी गुंठय़ात किंवा चौरस यार्डात सांगतात, पण सरकारदरबारी नोंद मात्र चौरस मीटरमध्ये करायची असते. अशा प्रकारे रूपांतर करण्याची गरज सातत्याने भासत असते.
अगदी छोटय़ापासून मोठय़ा संख्यांचे रूपांतर अगदी क्षणार्धात करून देणाऱ्या स्मार्ट टूल्स कंपनीने बनवलेल्या ‘युनिट कन्व्हर्टर’ या अ‍ॅपबद्दल आज जाणून घेऊ. हे अ‍ॅप चार भागांत विभागले आहे- १) बेसिक २) लिव्हिंग ३) सायन्स ४) मिसलेनियस.
बेसिक म्हणजे मूलभूत एककांच्या या भागात लांबी, वजन, क्षेत्रफळ आणि घनफळ यांचा समावेश आहे.
लिव्हिंग म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात लागणारी एकके, उदाहरणार्थ, चलन, तापमान, वेळ आणि गती यांचा समावेश आहे. या भागातील करन्सी म्हणजेच चलनाच्या भागात चलनाचा दर हा बाजारभावाप्रमाणे बदलत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी येथे रिफ्रेश बटणाची सोय दिलेली आहे.
सायन्स या भागात प्रेशर (दाब), फोर्स (बल), वर्क (कार्य), पॉवर (शक्ती), फ्लो (द्रव प्रवाह), करंट (विद्युत प्रवाह), व्होल्टेज (विद्युत दाब), डेन्सिटी (घनता) इत्यादींचा समावेश आहे. स्क्रीनवर एका वेळी केवळ कुठलेही चारच प्रकार दिसू शकतात. त्यामुळे फेवरिटस् या विभागातून तुम्ही तुमच्या दृष्टीने आवश्यक आणि महत्त्वाचे असणारे चार प्रकार निवडू शकता. आवश्यकतेनुसार त्यात बदलही करू शकता.
मिसलेनियस म्हणजे संकीर्ण या भागात कोन, डेटा, फ्युएल, कुकिंग, इल्युमिनन्स, रेडिएशन, प्रिफिक्स, बायनरी, टाइम झोन, ब्लड शुगर हे प्रकार उपलब्ध आहेत. या भागातही तुम्ही एका वेळी चार प्रकार निवडू शकता.
हे अ‍ॅप कसे कार्य करते ते पाहू. समजा तुम्हाला एक वर्ष म्हणजे किती मिनिटे याचे उत्तर हवे असेल तर हे अ‍ॅप एवढेच उत्तर देऊन थांबत नाही, तर त्याच स्क्रीनवर एक वर्ष म्हणजे किती महिने, आठवडे, दिवस, तास, मिनिटे, सेकंद आणि मिलिसेकंददेखील दाखवले जाते. हेच तुम्हाला प्रत्येक भागातील प्रत्येक एककासाठी दिसू शकते.
हे अ‍ॅप वापरायला अतिशय सोपे असून बहुतांशी सर्व एकके रूपांतरित करण्याची सोय या अ‍ॅपमध्ये आहे. त्यामुळे आता एकक रूपांतरित करण्याची सूत्रे लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण ती आता केवळ एका क्लिकने मिळवता येणार आहेत.
manaliranade84@gmail.com