20 November 2017

News Flash

मोबाइल गेमचं वेड

स्मार्टफोन प्रत्येक हाती खेळू लागल्यानंतर त्यावरचे खेळ प्रत्येकाला आकर्षित करू लागले.

प्रा योगेश  हांडगे | Updated: August 22, 2017 1:44 AM

मोबाइल गेमचे पेव आणि त्याचा वापरकर्त्यांवर होणारा परिणाम यांची चर्चा सुरू झाली आहे.

स्मार्टफोन प्रत्येक हाती खेळू लागल्यानंतर त्यावरचे खेळ प्रत्येकाला आकर्षित करू लागले. व्हिडीओ गेम, ऑनलाइन गेम, संगणकीय गेम यांच्या छंदामुळे आधीच मैदानी खेळ विसरलेल्या तरुणाईला तर मोबाइल गेमनी अक्षरश: झपाटून टाकलं आहे. अलीकडेच, ‘ब्लू व्हेल’ या गेमच्या निमित्ताने एकूणच मोबाइल गेमचे पेव आणि त्याचा वापरकर्त्यांवर होणारा परिणाम यांची चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपर भागातील एका १४ वर्षीय मुलाने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येमागील कारण ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ नावाचा गेम होता, असे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर अवघ्या देशात एकच खळबळ उडाली आणि ‘ब्लू व्हेल’बद्दल नवनवीन गोष्टी बाहेर येऊ लागल्या. भारतात अद्याप या गेमचा प्रसार झालेला नाही. किंबहुना जगातील अनेक देशांप्रमाणे आपल्याकडेही या गेमवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, ‘ब्लू व्हेल’च्या निमित्ताने मोबाइल गेमबद्दल वाढत असलेलं वेड हा चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

केवळ तरुण वर्गच नव्हे तर लहान मुलांपासून ज्येष्ठ  नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटांतील असंख्य मंडळी वेगवेगळ्या मोबाइल गेमच्या प्रेमात पडल्याचे दिसून येते. खरं तर फावल्या वेळेत अथवा मेंदूचा क्षीण कमी करण्यासाठी ‘मोबाइल गेम’ खेळणं, हे काही चुकीचं असू शकत नाही. परंतु अलीकडच्या काळात ‘मोबाइल गेम’ हे केवळ ‘टाइमपास’ म्हणून नव्हे, तर वेळात वेळ काढून किंवा हातातील सर्व कामे बाजूला ठेवून खेळले जात असल्याचे दिसून येते. सुरुवातीला गमतीशीर वाटणारा एखादा ‘गेम’ कालांतराने इतक्या सवयीचा वाटू लागतो की त्याव्यतिरिक्त कोणतीही गोष्ट किंवा काम करण्याची इच्छा होत नाही. एवढंच नव्हे तर, सुरुवातीला केवळ मनोरंजन म्हणून खेळला जाणारा हा गेम वापरकर्त्यांच्या मनाचा इतका ताबा घेतो की नंतर त्यात यशस्वी होणं, हे जणू खेळणाऱ्याच्या आयुष्यातील अंतिम ध्येय बनून जातं. साहजिकच मेंदूचा थकवा कमी करण्यासाठी खेळायला सुरुवात झालेला गेम मेंदूचा ताण वाढवू लागतो व त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात.

भारतात कॅण्डीक्रश, तीनपत्ती, स्नेक, अँग्री बर्ड, टेम्पल रन, सबवे सर्फर, फुटबॉल, सॉकर, रेस, बर्न इट आऊट, बर्न द रोप, बॉम्ब टॉस, ब्लॉक ब्रेकर्स, क्रिकेट वर्ल्ड असे मोबाइल गेम प्रचंड लोकप्रिय आहेत. या खेळांची रचना अशी आहे की, खेळणारा एकदा खेळू लागला की तो त्यात गुंतत जातो व ते एक व्यसनच बनून जाते. अशाच काही गेमच्या दुष्परिणामांबाबत आपण जाणून घेऊ या.

कॅण्डीक्रश

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय असलेल्या कॅण्डीक्रशमुळे खेळणाऱ्याच्या आयुष्यावर अनेक विपरीत परिणाम होऊ शकतात. हा खेळ खेळण्यास सोपा असल्यामुळे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेक मंडळी तो सहज खेळू लागतात. प्रत्येक ‘लेव्हल’गणिक या खेळाची इतकी सवय होते की, काही कामानिमित्त हा गेम मध्येच थांबवावा लागला तरी, तो अर्धवट सोडू नये, असे वाटते. विशेष म्हणजे, एक ‘लेव्हल’ पूर्ण केल्यानंतर दुसरी ‘लेव्हल’ पूर्ण करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नाही.

या गेममध्ये खेळणाऱ्याला दिल्या जाणाऱ्या पाच ‘लाइफ’ संपल्यानंतर नवीन ‘लाइफ’ उपलब्ध होण्यासाठी किमान अर्धा तास वाट पाहावी लागते. परंतु खेळणाऱ्याला गेमची इतकी सवय होऊन जाते की तो अर्धा तासही ती व्यक्ती केवळ ‘लाइफ’ उपलब्ध होण्याच्या प्रतीक्षेत घालवते.

या गेमच्या ‘मॅप’मध्ये आपले मित्र कुठल्या ‘लेव्हल’पर्यंत पोहोचले आहेत, हे समजत असल्याने त्यांना मागे टाकण्याची ईष्र्या वापरकर्त्यांला अधिकाधिक वेळ हा गेम खेळण्यासाठी प्रवृत्त करते.

हा गेम ‘फेसबुक’शी जोडण्यात आला असल्याने यातून ‘स्पॅम’ मोबाइलमध्ये येण्याचाही धोका असतो. गेमचं व्यसन लागलेली व्यक्ती संपलेली ‘लाइफ’ मिळवण्यासाठी प्रसंगी ती खरेदी करते किंवा एखाद्या ‘लेव्हल’ला पूर्ण करण्यासाठी लागणारे ‘स्पेशल तिकीट’ खरेदी करण्यासाठी ३० डॉलपर्यंत किंमत मोजते.

कॅण्डीक्रश या गेमला अंत नाही. तुम्ही कितीही वरच्या ‘लेव्हल’ला पोहोचलात तरी, त्यापुढे तुम्हाला आणखी ‘लेव्हल’ दिसून येतील.

 ‘पोकेमॉन गो’

पोकेमॉन गो हा एक ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी (अफ) वर आधारित मोबाइल गेम आहे. आयओएस आणि अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलवर हा गेम उपलब्ध आहे. या गेमने व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामलाही मागे टाकलं आहे. पोकेमॉन गोमध्ये वास्तवातल्या जगात फिरून तुम्हाला पोकेमॉन पकडायचा असतो. या गेममध्ये अनेक लेव्हल आहेत. मात्र या ‘पोकेमॉन’च्या शोधात रस्त्यावर अपघात घडल्याच्याही घटना घडल्या आहेत.

तीनपत्ती

मोबाइलवर तीनपत्ती हा गेम लोकप्रिय आहे. प्ले स्टोअरमधून तीनपत्ती नावाचे अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यानंतर फेसबुक ई-मेल अ‍ॅड्रेस टाकून तीनपत्ती गेम खेळत असणाऱ्यांची नावे समोर येतात. गेम खेळण्यापूर्वी डाऊनलोड केलेल्याच्या खात्यावर दहा हजार कॉइन्स अमेरिकन डॉलर पद्धतीचे येतात. हे पैसे केवळ आभासी पद्धतीचे असतात. ते प्रत्यक्षात रोख पद्धतीत मिळत नाहीत. ते इतर कोणाशी खेळत असल्यास त्यांच्यातही सहभागी होता येते. एका गेममध्ये पाच सदस्य असतात. जे युवक मनोरंजन म्हणून हा गेम खेळतात त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणात कॉइन्स जमा होतात. हेच कॉइन्स जुगारी व्यक्ती दीड ते दोन हजार रुपये देऊन खरेदी करतात.

या गेमच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार सुरू झाले आहेत. हा गेम खेळणाऱ्याकडचे सगळे पैसे संपून गेले आणि त्याचे स्टेटस झिरो बॅलन्स असे झाले की समोरचा त्याला काही पैसे उधार देतो. अर्थात तो या गेममध्ये फंड ट्रान्सफर करतो. पण असे करताना ज्याला फंड दिला त्याच्याकडून खरोखरचे पैसेही घेण्याचे प्रकार होत आहेत. यात मोठय़ा माणसांबरोबरच लहान मुलेही सक्रिय झाली आहेत.

(पुढील भागात : ऑनलाइन गेमचे व्यसन टाळण्यासाठी काय कराल?)

– प्रा योगेश  हांडगे

लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

First Published on August 22, 2017 1:43 am

Web Title: mobile game craze
टॅग Mobile Game