News Flash

मोबाइल सुरक्षेची गुणकारी मात्रा

पावसाळय़ात साथीच्या आजाराचा फटका अनेकांना बसला असेल.

पावसाळय़ात साथीच्या आजाराचा फटका अनेकांना बसला असेल. आपल्या शरीरातील त्या विषाणूंवर आपण गुणकारी औषधाची मात्रा घेतो आणि आजारपणातून बरे होतो. याचबरोबर पुन्हा त्या विषाणूंनी आपल्या शरीरात प्रवेश करू नये म्हणून आवश्यक ती काळजीही आपण घेत असतो. असेच विषाणू मोबाइलमध्येही शिरकाव करतात आणि मोबाइलचे आरोग्य बिघडवून टाकतात. मग आपला मोबाइल अचानकपणे काम करणे बंद करतो.. आपण काम करत असताना तो बंद होऊन सुरू होतो.. एकच छायाचित्र वारंवार दिसू लागते.. मोबाइलमधील आपली सर्व माहिती नाहीशी होते.. आपल्याला अशा एक ना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. या विषाणूंवर हल्ला करण्यासाठी अँटिव्हायरस उपयुक्त ठरतो. पाहुयात मोबाइलसाठी उपलब्ध असलेल्या अँटिव्हायरसेसचे प्रकार.

देशातील लाखो डेबिट कार्डधारकांची माहिती चोरीला गेली असे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आणि पुन्हा एकदा आपल्या माहिती सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. यानंतर अल्पावधीतच अनेक संकेतस्थळं हॅक झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. अशाचप्रकारे मोबाइलवरही सायबर हल्ला होत असतो. आपल्या मोबाइलमधील माहिती चोरीपासून ते मोबाइलचे नियंत्रण मिळवेपर्यंत अनेक गोष्टी हे हॅकर्स आणि विषाणू पसरविणारी मंडळी करत असतात. मोबाइलमध्ये सर्वाधिक धोका हा अँड्रॉइड मोबाइलला असतो. आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेल्या विविध अहवालानुसार मोबाइलमधील अँटिव्हायरस हल्ल्यांमध्ये ९९ टक्के हल्ले हे अँड्रॉइड मोबाइलवर झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अँड्रॉइड मोबाइलधारकांनी याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हे विषाणू प्रामुख्याने एपीके फाइल्सच्या माध्यमातून आपल्या मोबाइलमध्ये शिरकाव करतात. लोकप्रिय अ‍ॅप आपल्याकडेही असावे अशी इच्छा सर्वानाच असते. पण ते डाऊनलोड करताना ज्या कंपनीने त्या अ‍ॅपची निर्मिती केली आहे त्याच कंपनीचे अ‍ॅप डाऊनलोड करणे महत्त्वाचे असते. अनेकदा लोकप्रिय अ‍ॅप्सची प्रतिकृती विकसित करून तसेच अ‍ॅपही अ‍ॅपबाजारात ठेवले जाते. ते अ‍ॅप डाऊनलोड झाल्यावर त्यातून अशा प्रकारचे विषाणू आपल्या मोबाइलमध्ये सोडले जातात. तसेच अनेकदा आपण अ‍ॅप दुसऱ्या कुणाच्या तरी मोबाइलवरून शेअरिंग अ‍ॅपच्या माध्यमातून घेतो त्यावेळेस अ‍ॅप प्ले स्टोअरवर न जाता पॅकेज इंस्टॉल करतो त्या माध्यमातूनही विषाणूंचा शिरकाव होण्याची शक्यता असते. तसेच फाइल शेअरिंग मोबाइलमध्ये वेगवेगळय़ा संकेतस्थळांचे सर्फिग करणे आदी गोष्टींच्या माध्यमातून विषाणू मोबाइलमध्ये शिरकाव करू शकतात. अशा विषाणूंना रोखण्यासाठी आणि शिरकाव केलेल्या विषाणूंना त्यांचे काम करण्यापासून रोखण्यासाठी आपल्या मोबाइलमध्ये अँटिव्हायरस महत्त्वाची भूमिका बजावतो. बाजारात अनेक अ‍ॅंटिव्हायरस अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यातील काही अ‍ॅप्स केवळ माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने तयार केलेले असतात. यामुळे अँटिव्हायरसची निवड करताना नेहमी आपल्याला माहिती असलेल्या अँटिव्हायरसची निवड करावी. जेणेकरून त्यात आपली फसगत होऊ शकणार नाही. असेच काही लोकप्रिय अँटिव्हायरस अ‍ॅपविषयी जाणून घेऊयात.

सीएम सिक्युरिटी

अ‍ॅंड्राइडवरील अँटिव्हायरस अ‍ॅप्समधील हे एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप आपल्या मोबाइलमध्ये शिरकाव केलेल्या विषाणूंचा शोध घेते. शोध घेतल्यानंतर सापडलेल्या विषाणूंना मोबाइलच्या बाहेर फेकून दिले जाते. याचबरोबर या अ‍ॅपमध्ये आपल्याला अ‍ॅप लॉक सुविधा मिळते, जेणेकरून आपण आपल्या अ‍ॅप्सना पासकोड्स देऊन अधिक सुरक्षित करू शकतो. यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीने आपला मोबाइल घेतला तर पासकोड्स माहिती नसल्यामुळे तो त्यातील माहितीचा उपयोग करून घेऊ शकत नाही. याचबरोबर यामध्ये अनोळखी व्यक्तीने आपल्या मोबाइलला हात लावला अर्थात चुकीचा पासकोड वापरला तर तो वापरणाऱ्या व्यक्तीचा सेल्फी घेण्याची सुविधाही आहे. यामुळे आपला मोबाइल हाताळून कुणी चुकीचा पासकोड वापरला ती व्यक्ती आपल्याला समजू शकते.

अवास्त

डेस्कटॉपच्या काळातील सर्वात लोकप्रिय अँटिव्हायरस कंपनी असलेल्या अवास्तने मोबाइलसाठीही अँटिव्हायरस विकसित केले आहेत. यामध्ये फ्रीमियम आणि प्रिमियम अशा दोन सुविधा आहेत. यातील फ्रीमियममध्ये आपल्याला मोफतमध्ये सुरक्षेच्या प्राथमिक सुविधा मिळतात. ज्यात आपल्या मोबाइलमधील विषाणूंचा शोध घेतला जातो आणि त्यांना मोबाइलमधून बाहेर काढले जाते. तसेच आपण कोणत्याची प्रकारची नवीन माहिती मोबाइलमध्ये घेतली तर त्यामध्ये विषाणू आहेत की नाही याचा शोधही हे अ‍ॅप घेते. तसेच आपल्या मोबाइलमधील दोन अ‍ॅप्सना अ‍ॅपलॉकची सुविधाही उपलब्ध करून देते. प्रीमियममध्ये आपल्याना काही पैसे आकारून फ्रीमियमपेक्षा अधिक सुविधा दिल्या जतात.

कॅस्परस्काय इंटरनेट सिक्युरिटी

आपल्या उपकरणांमध्ये विषाणूंचा शिरकाव होणारे सर्वात लोकप्रिय माध्यम म्हणजे इंटरनेट. यामुळे इंटरनेटशी जोडलेल्या प्रत्येक उपकरणाला अँटिव्हायरस असणे हे आवश्यक आहे. कॅस्परस्कायच्या या अ‍ॅपमध्येही फ्रीमियम आणि प्रिमियम सुविधा देण्यात आली आहे. या अ‍ॅपमध्ये आपल्याला चोरीपासून संरक्षण मिळू शकणार आहे. यात देण्यात आलेल्या रिमोट लॉकमुळे आपला फोन जर चोरीला गेला तर वापरायोग्य उरत नाही, कारण आपण दुसऱ्या ठिकाणाहून आपल्या फोनमधील सर्व माहिती डिलिट करू शकतो. याचबरोर या अ‍ॅपमध्येही चुकीचा पासवर्ड टाकणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र टिपले जाते. यामुळे फोनचा गरवापर करणारी व्यक्ती आपल्याला समजू शकते. याशिवाय यामध्ये क्लाऊड आधारित स्कॅनिंगची सुविधाही उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला पैसे आकारून ती सुविधा विकत घ्यावी लागेल.

नॉर्टन सिक्युरिटी

संगणक अँटिव्हायरसमधील नामांकित कंपनी म्हणून याची ओळख आहे. या कंपनीनेही मोबाइल सुरक्षेसाठी अ‍ॅप बाजारात आणले असून यामध्ये अँटिव्हायरस स्कॅन आणि रिमोट लॉक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्येही प्रीमियम आवृत्ती उपलब्ध असून त्यामध्ये आपल्या मोबाइलसाठी अधिक सुरक्षा उपलब्ध करून दिली जाते.

क्विकहील मोबाइल सिक्युरिटी

क्विकहील या पुण्यातील कंपनीनेही संगणक अँटिव्हायरसमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या कंपनीनेही मोबाइल सिक्युरिटी नावाने मोबाइल अँटिव्हायरस बाजारात आणला आहे. यामध्ये आपल्या मोबाइलचे संपूर्ण स्कॅनिंग केले जाते. याचबरोबर आपल्या इच्छेनुसार काही ठरावीक अ‍ॅपचे स्कॅनिंग करणे किंवा मेमरी कार्डचे स्कॅनिंग करणे यासारख्या सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत. याशिवाय यामध्ये शेडय़ुल स्कॅनचाही पर्याय देण्यात आला आहे. ज्यामध्ये ठरावीक वेळेला तुमच्या मोबाइलचे स्कॅनिंग करून त्यात आढळणाऱ्या विषाणूंचा शोध घेऊन ते काढून टाकले जातात. यामध्ये रिमोट लॉकची सुविधा देण्यात आली आहे ज्यामुळे तुमचा मोबाइल जर चोरीला गेला तर तो नेमका कुठे आहे हे समजू शकते. तसेच यामध्ये नव्याने येणाऱ्या विषाणूंची माहितीही सातत्याने पुरविली जाते. जेणे करून आपण मोबाइलचा वापर करताना सतर्क राहू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2016 1:37 am

Web Title: mobile security antivirus
Next Stories
1 वेबब्राउजर्सचे ‘बाहुबली’
2 ‘ई वाचनानंद’
3 कूपन ‘भेट’
Just Now!
X