मोठय़ा शहरांमध्ये जागेचा प्रश्न फारच गंभीर. उपलब्ध जागेत प्रतिचौरस किलोमीटरमध्ये २० ते ३० हजार लोक दाटीवाटीने राहात असतात. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येसाठी जागा अपुरी पडते आणि त्याचा परिणाम मग इतर सोयीसुविधांवर होतो. राहायला जागा नाही, स्टेशनवर उभं राहायला जागा नाही, बस, ट्रेनमध्ये शिरायला जागा नाही, रस्त्यावर गाडी चालवायला जागा नाही, मुलांना खेळायला जागा नाही, युगुलांना प्रेम करायला जागा नाही, कचरा टाकायला जागा नाही, झोपायला जागा नाही – या ‘जागा नाही’च्या शृंखलेत आता ‘मोबाइलमध्ये जागा नाही’चाही समावेश झालेला आहे. या शेवटच्या प्रश्नामुळे तर मामला अधिकच बिकट बनला आहे.

मोबाइलमध्ये जागा नसणं म्हणजे जीव अडकल्यासारखं होतं. इतर जागांचा प्रश्न निकाली लावताना बरीच डोकेफोड, चर्चा वगैरे कराव्या लागतात. त्यामध्ये बरीच र्वषेही जातात. पण मोबाइलमधल्या जागेचा प्रश्न असा भिजत ठेवता येत नाही ना. मोबाइल मेमरी आणि एसडी कार्ड असूनही अनेकदा जागा अपुरी पडते. हे म्हणजे कपडय़ांच्या कपाटासारखं आहे. कपाटामध्ये कपडे अगदी कोंबून कोंबून भरलेले असतात. आणखी कपडेही हवे असतात पण जागा नसते. जुने कपडेही टाकवत नसतात. मग शेवटी मनाचा हिय्या करून एक दिवस कपाट, खण लावला जातो. कपडय़ांच्या घडय़ा वगैरे करून कपाट आवरलं जातं. मनावर दगड ठेवून, जड अंत:करणाने काही कपडे टाकून दिले जातात आणि मग शेवटी कपाटात जागा होते.

मोबाइलच्या बाबतीतही तेच आहे. अर्थात इथे डिलीटशिवाय काही इतरही पर्याय उपलब्ध आहेत. पण काही गोष्टींना मात्र ‘जुने जाऊ  द्या मरणा लागूनी’चा नियम लावावाच लागतो.

अ‍ॅप्स डिलीट करा – अँड्रॉइड असो की आयफोन, सगळ्याच फोन्समध्ये अनेकदा अनावश्यक अ‍ॅप्स असतात. ही अ‍ॅप्स विनाकारण मोबाइलमधली जागा व्यापतात. मोबाइलच्या सेटिंग्जमध्ये अ‍ॅप्स नावाचा ऑप्शन असतो. तिथे मोबाइलमधल्या अ‍ॅप्सनी व्यापलेली जागा दिसते. जी अ‍ॅप्स आपण सामान्यत: वापरत नाही ती सरळ डिलीट करावी. अनेकदा सिस्टम किंवा प्री-लोडेड अ‍ॅप्सही मोठी जागा व्यापत असतात. मात्र त्यापैकी काही अ‍ॅप्स डिलीट करणं शक्य नसतं. अर्थात थोडंसं हॅकिंग करून ही अ‍ॅप्सही काढता येतात.

फोटोजचा बॅकअप घ्या – हल्लीच्या फोन्सचे कॅमेराज अधिकाधिक चांगले होत आहेत. मेगापिक्सेलचा आकडा जसजसा वाढत जातो तसतसं एकेका फोटोची साइजही वाढत असते. आणि मोबाइलवर हे फोटोज फार मोठी जागा व्यापून बसतात. अनेकदा एकाच ठिकाणाचे, वस्तूचे, पदार्थाचे अनेक फोटोज काढलेले असतात. यातला एक फोटो ठेवून बाकीचे डिलीट केल्याने काही एमबी जागा तयार होऊ  शकते. मात्र डिलीट करताना पर्मनंटली डिलीट या ऑप्शनवर क्लिक करा.

दुसरा पर्याय असा की या फोटोजचा कम्प्युटरमध्ये बॅकअप घ्यायचा. किंवा एक्सटर्नल हार्डडिस्कमध्ये. किंवा ड्रॉपबॉक्स, फ्लिकर, पिकासा, गुगल ड्राइव्हवरही या फोटोजचा बॅकअप ठेवता येऊ शकतो, जेणेकरून मोबाइलमधूनच ते फोटो नंतर बघता येऊ  शकता.

तिसरा पर्याय असा की अ‍ॅशसारखी अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. ही अ‍ॅप्स इमेजचं रिझोल्यूशन आणि साइज कमी करतात. पण हे करण्याआधी ओरिजनल फोटो हार्डडिस्क किंवा क्लाउडवर सेव्ह करायला विसरू नका.

व्हीडिओज डिलीट करा – व्हॉट्अ‍ॅपवर आलेले व्हीडिओज किंवा आपण स्वत: रेकॉर्ड केलेले व्हीडिओज जास्त जागा व्यापतात. जे व्हीडिओज नको असतील ते डिलीट करणं हा एक पर्याय झाला.किंवा मग फोटोजप्रमाणेच व्हिडिओजही कम्प्युटर, लॅपटॉवर कॉपी करायचे. याशिवाय आणखी एकपर्याय आहे. आणि तो म्हणजे व्हिडिओज युटय़ूबवर अपलोड करायचे. युटय़ूबवर तुमच्या सोयीनुसार हे व्हिडिओज तुम्ही पब्लिश, अनलिस्टेड किंवा प्रायव्हेट ठेवू शकता.

कॅशे क्लीअर करा – हा ऑप्शन अनेकांना तसा माहीत नसतो. प्रत्येक अ‍ॅप जेव्हा सुरू असतं तेव्हा काही डेटा आपोआप सेव्ह करत असतं. तात्पुरत्या फाइल्स डाउनलोड करतं. मॅप इन्फॉर्मेशन किंवा ग्राफिक्स फाइल्स सेव्ह करतं. या फाइल्सची संख्या वाढत जाऊन प्रत्येक अ‍ॅपमागे साधारण ५०-६० एमबी एवढा कॅशे डेटा आपल्या मोबाइलमध्ये असतो. हा डेटा काहीही कामाचा नसतो. त्यामुळे तो डिलीट करणं हाच उत्तम उपाय. सेटिंग्जमध्ये अ‍ॅप्सवर जायचं. आणि प्रत्येक अ‍ॅपवर टॅप केल्यानंतर त्या अ‍ॅपचा कॅशे डेटा दिसतो. तिथेच क्लीअर डेटाचा ऑप्शन असतो. त्यावर क्लिक केलं की तो डेटा कायमस्वरूपी डिलीट होतो.

मायक्रोएसडी कार्डचा वापर करणं हा तर सरळ पर्याय आहे. पण तो योग्यप्रकारे करणंही गरजेचं असतं. अनेक अ‍ॅप्स अशी असतात की जी मोबाइल स्टोरेजवरून एसडीकार्डवर हलवता येतात. त्यामुळे मोबाइल स्टोअरेज मोकळा राहतो. मोबाइल स्टोअरेज मोकळा ठेवण्यामागचं कारण म्हणजे अनेक अ‍ॅप्स डाउनलोड होण्यासाठी काही एमबी जागा लागते. ती नसल्यास डाउनलोड होण्यासाठी त्रास होतो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे मोबाइलचं कामकाज सुरळीत चालणं. मोबाइल स्टोअरेज जर का पूर्णत: भरलेलं असेल तर अनेकदा फोन हँग होतो. त्यामुळेच ही जागा काही प्रमाणात मोकळी ठेवावी. जाता जाता एक टीप अशी की अनेकदा मोबाइलमध्ये डुप्लिकेट फाइल्स असतात. उदा. एकाच फोटोच्या दोन कॉपीज असतात. त्या शोधून डिलीट करण्यासाठी सर्च डुप्लिकेट फाइलसारखी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून मोबाइलवर जागा तयार करता येऊ  शकते.

pushkar.samant@gmail.com