लेनोव्हो मोटोचा मोटो G4 आणि G4 प्लस या दोन नवीन स्मार्टफोनची भारतात अधिकृत विक्री सुरू झाली आहे. मोटो G4 प्लस भारतात पहिल्यांदा अमोझॉनवर मिळण्यास सुरूवात झाली आहे. मोटो G4 ची किंमत नंतर ठरविण्यात येणार आहे. मोटो G4मध्ये 4G असून, 4G वोल्ट आणि 3G सपोर्ट करतो. यात ड्युअल सिमची सुविधा आहे. मोटो G4 प्लस दोन प्रकारच्या स्टोअरेज पर्यायांमध्ये मिळणार आहे. २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोअरेजची सुविधा असलेल्या फोनची किंमत १३४९९ रुपये इतकी असेल, तर ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेजची सुविधा असलेल्या फोनची किंमत १४९९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. मोटोच्या या फोनंची बाजारात उपलब्ध असलेल्या शिओमी रेडमी नोट ३, लीको ले १एस आणि मायझू एम३ नोट या स्मार्टफोनशी स्पर्धा असेल. मोटो ‘जी’साठी ब्राझीलनंतर भारत ही दुसरी मोठी बाजारपेठ असल्याचे मोटोरोला इंडियाचे भारतातील प्रमुख अमित बोनी यांनी सांगितले. मोटो G4 मध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास ३ ने युक्त ५.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. चारही बाजूंना वक्राकार असलेल्या या फोनची जाडी ७.८ एमएम इतकी आहे. यात ५ मेगापिक्स फ्रंट कॅमेरा आणि १३ मेगापिक्सल बॅक कॅमेरा देण्यात आला आहे. २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोअरेज असलेल्या या फोनचे स्टोअरेज मायक्रो एसडी कार्डाचा वापर करून १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल. यात स्नॅपड्रॅगॉन ६१७ १.५ गेगाहर्टस् ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. ३००० एमएएच क्षमतेच्या बॅटरी असलेल्या या फोनमध्ये टर्बो चार्जिंगची सुविधा आहे. केवळ १५ मिनिटांच्या चार्जिंगनंतर हा फोन तब्बल सहा तासांसाठी काम करणार असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. मोटो G4 प्लसमध्येदेखील हाच प्रोसेसर आणि बॅटरी असून, प्लस व्हर्जनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा पुरविण्यात आली आहे. तर यातील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल क्षमतेचा आहे.