* मला अ‍ॅपधारित टीव्ही घ्यायचा आहे. तर तसे काही पर्याय मला सुचवावेत.
– संजय जाधव, नवी मुंबई
* टीव्हीच्या बाजारात थ्रीडीपासून फोरकेपर्यंतेचे विविध टीव्ही उपलब्ध आहेत. याचबरोबर अ‍ॅपवर आधारित टीव्हीचीही चांगलीच चलती आहे. बराच काळ केवळ ऑनलाइन उपलब्ध असलेले हे टीव्ही आता किरकोळ बाजारातही दिसू लागले आहे. नुकताच व्हिडीओकॉनने विंडोजसोबत असाच एक अ‍ॅपवर आधारित टीव्ही बाजारात आणला आहे. या टीव्हीमध्ये विंडोज-१० उपलब्ध करून देण्यात आले असून या टीव्हीचा वापर आपण संगणक म्हणूनही करू शकतो. यामध्ये संगणक आणि टीव्हीसाठी दोन पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये टीव्हीचा पर्याय निवडल्यावर आपण सामान्य टीव्ही वाहिन्या पाहू शकतो. हा टीव्ही एलईडी असून तो पूर्णत: एचडी आहे. याशिवाय टीव्हीला एचडीएमआय पोर्ट देण्यात आला आहे. तसेच दोन जीबी डीडीआर ३रॅम आणि १६ जीबीची अंतर्गत साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. तसेही एसडी कार्डच्या मदतीने ही साठवणूक क्षमता आपण १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो. यासाठी टीव्हीमध्ये मायक्रो एसडी स्लॉटही देण्यात आला आहे. हा टीव्ही ८१ सेमी आणि ९८ सेमी अशा दोन आकारांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीतील संगणकाचा पर्याय निवडल्यावर टीव्ही संगणकासारखा काम करू लागतो. यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डपासून इंटरनेटपर्यंत संगणकात वापरता येणारे बहुतांश सॉफ्टवेअर वापरता येऊ शकतात. हा टीव्ही नोव्हेंबर महिन्यात देशभरात उपलब्ध होणार असून त्याची किंमत ३९९९० रुपये इतकी आहे. याशिवाय तुम्हाला नवीन तंत्रज्ञान असलेला टीव्ही घ्यायचा असेल तर तुम्ही पॅनासॉनिकने नुकताच बाजारात आणलेला फोर के टीव्हीचा पर्याय निवडू शकता याचबरोबर सॅमसंग, एलजी, सोनी यांसारख्या ब्रॅण्ड्सनी बाजारात आणलेल्या कव्‍‌र्ह टीव्हीचा पर्यायही तुमच्यासमोर आहे.
* मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या मोबाइलमधून अ‍ॅण्ड्रॉइडमध्ये माहिती शेअर करण्यासाठी ब्लूटय़ूथ वगळता कोणत्या अ‍ॅपचा वापर करता येऊ शकेल. – नितीन देव, कल्याण
* ब्लूटय़ूथने माहिती शेअर होण्यासाठी अनेकदा खूप वेळ लागतो. यासाठी विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून माहिती शेअर करणे सोयीस्कर ठरते. दोन्ही फोन एकाच ऑपरेटिंग सिस्टीमवर चालत असले तर माहिती शेअर करणे सोपे होते. पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नात दोन्ही फोनची ऑपरेटिंग सिस्टीम वेगवेगळी आहे. अशा वेळी तुम्हाला दोन्ही फोनमध्ये चालणाऱ्या डेटा शेअरिंग अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. यामध्ये फिन, शेअर इट या अ‍ॅप्सचा वापर करून तुम्ही माहिती शेअर करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही फोनमध्ये ते अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यामधील सेटिंग्जच्या मदतीने तुम्हाला दोन्ही फोन पेअर करावे लागतील. यानंतर तुम्ही माहिती शेअर करू शकता.
* संगणकावर आणि मोबाइलवर मराठी टायपिंग कसे करायचे. तसेच युनिकोड म्हणजे काय?
– संगीता पिंगळे, इगतपुरी
* युनिकोड म्हणजे विविध प्रादेषिक भाषांसाठीच्या फॉण्ट आणि कळफलकाची सर्वमान्य प्रणाली. यामध्ये मराठीसह विविध देशांतील काही शे भाषांचा समावेश आहे. संगणकावर युनिकोड इन्स्टॉल करणे अगदी सोपे आहे. यासाठी सर्वप्रथम कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन ‘रिजनल अ‍ॅण्ड लँग्वेज’ हा पर्याय स्वीकारा यामध्ये लँग्वेजेस हा पर्याय स्वीकारा. त्यातील पहिल्या पर्यायासमोर अ‍ॅड असा पर्याय असेल तो निवडा. त्यानंतर पुन्हा अ‍ॅड असे म्हणा. मग तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करताना संगणकात आलेल्या विविध भाषांचे पर्याय दिसतील. यामध्ये मराठीचा पर्याय असेत तो निवडा. यानंतर की-बोर्ड निवडा. मग ओके म्हणा. यानंतर तुम्हाला खालच्या टूलबारमध्ये उजव्या बाजूला ‘ईएन’ अशी इंगजी आद्याक्षरे दिसतील. त्यावर क्लिक करून तुम्ही मराठीचा पर्याय निवडू शकता. मग तुमचा संगणक मराठी होतो. म्हणजेच त्यामध्ये आपण युनिकोडच्या मदतीने मराठी टाइप करू शकतो. हे मराठी टाइप करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट हा कळफलक शिकावा लागेल. जर तुम्हाला इंग्रजीतून मराठी टाइप करावयाचे असेल तर त्यासाठी गुगल इनपूटसारखे पर्याय तुम्ही संगणकावर डाऊनलोड करून घेऊ शकता. ते केल्यावरही तुम्ही वरीलप्रमाणे सेटिंग करून कळफलक निवडला की तुम्हाला तो पर्याय खालच्या टूलबारमध्ये उपलब्ध होतो. मोबाइलवर मराठी टाइप करण्यासाठी विविध अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून युनिकोडमध्येच म्हणजे मंगल फाँटमध्ये टायपिंग होत असल्यामुळे तो कुणालाही कुठेही वाचता येऊ शकतो.
या सदरासाठी lstechit@gmail.com वर प्रश्न पाठवा.