एखादा चित्रपट पाहायचा राहून गेला आणि तो चित्रपट पाहायची तुमची इच्छा झाली आणि अगदी घर बसल्या पाहायचा असेल, तर एक खुशखबर आहे. नेटफ्लिक्स ही मीडिया स्ट्रिमिंग सर्व्हिस कंपनी आता भारतात दाखल झाली आहे. नेटफ्लिक्समुळे आता तुम्हाला तुमच्या मागणीनुसार टेलिव्हिनज शो किंवा चित्रपट ऑनालाईन पाहता येणार आहे. या सुविधेसाठी तुम्हाला दरमहा ५०० रुपये खर्च करावे लागतील. पण पहिल्या महिन्यासाठी नेटफ्लिक्सची सुविधा युजर्सला अगदी मोफत वापरता येणार आहे. नेटफ्लिक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रीड हॅस्टिंग्स यांनी अमेरिकेत सुरू असलेल्या ‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो-२०१६’ मध्ये नेटफ्लिक्स सुविधा भारतात दाखल केली जात असल्याची घोषणा केली.

सुविधेचा लाभ कसा घ्याल?-
‘नेटफ्लिक्स’ सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला http://www.netflix.com/in/ या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करावे लागेल. नोंदणी केल्यानंतर तुमच्या योग्यतेनुसार प्लॅन निवडून तुम्ही तुमच्या डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करून उपलब्ध असलेले चित्रपट किंवा टेलिव्हिजन शो तुम्ही तुमच्या सवडीनुसार केव्हाही पाहू शकता.

नेटफ्लिक्सच्या संकेतस्थळावर हॉलीवूड आणि बॉलीवूड चित्रपटांचा भरणा तर आहेच पण त्यासोबतच बच्चेकंपनीसाठी काही खास कार्टुन, अॅनिमेशन शो आणि चित्रपट देखील आहेत.