आज आपल्यापैकी प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन खेळत असले तरी, त्याची सुरुवात ज्या मोबाइलने झाली तो ‘नोकिया ३३१०’ विसरणे कुणालाच शक्य नाही. भारतातील मोबाइल क्रांतीचा पाया ज्या हॅण्डसेटने घातला, तो ‘३३१०’ आता नव्या ढंगात आणि आधुनिक साज चढवून परत आला आहे.

काळ सुमारे १६-१७ वर्षांपूर्वीचा. भारतात मोबाइल नावाचं तंत्रज्ञान सुखवस्तू किंवा धनाढय़ लोकांनाच परवडेल, अशा किमतीत उपलब्ध होतं. मोबाइल हॅण्डसेट एखाद्या ‘कॉर्डलेस फोन’च्या आकाराचा आणि त्यात असलेल्या मोबाइल सेवेच्या मिनिटाचा दर १६ रुपयांपेक्षाही जास्त! अगदी ‘इनकमिंग’लाही सात-आठ रुपये मोजावे लागायचे. अशा काळात मोबाइल ही चैनीचीच वस्तू होती. अशा काळात भारतीय तंत्रपटलावर एका छोटय़ा मोबाइल हॅण्डसेटचा उदय झाला. निळसर राखाडी रंगाच्या तळहातापेक्षा कमी आकाराच्या त्या मोबाइलने तोपर्यंत महागडं वाटणारं तंत्रज्ञान सर्वसामान्यांच्या मुठीत आणून ठेवलं. त्यानंतर मोबाइल हे संपर्काचं  प्रभावी माध्यम म्हणून देशात रुजू लागलं आणि आजघडीला भारत जगातील सर्वात मोठी मोबाइल बाजारपेठ बनली आहे.

‘नोकिया ३३१०’ सप्टेंबर २०००च्या सुमारास या जगात अवतरला. भारतात दाखल व्हायला त्याला पुढे आणखी दोन-तीन वर्षे लागली. परंतु त्यानंतर या हॅण्डसेटने मोबाइलबद्दलचा दृष्टिकोनच बदलून टाकला. त्याच काळात मोबाइल सेवांचे दर कमी होऊ लागले होते आणि प्रीपेड माफक दरातही उपलब्ध होऊ लागलं होतं. त्यामुळे ‘नोकिया ३३१०’ लोकप्रिय होत गेला. त्यापाठोपाठ अनेक कंपन्यांचे छोटय़ा आकाराचे, अँटेनाची काडी नसलेले आणि विविध वैशिष्टय़े असलेले ‘हॅण्डसेट’ येऊ लागले. अगदी नोकियानेही ‘३३१५’, ‘३३९०’, ‘३३९५’ असे हॅण्डसेट बाजारात आणले. मात्र, ‘३३१०’ची मागणी कायम राहिली ती अगदी अलीकडे देशात स्मार्टफोनचं पीक उगवेपर्यंत.

खरं तर या मोबाइलमध्ये फोन करण्यापलीकडे काही वेगळी वैशिष्टय़े नव्हतीच (त्या वेळी मोबाइल फोन हा संपर्कापुरताच असायचा.). पण नोकिया ३३१० मध्ये त्याच्या आधीच्या ३२१०च्या तुलनेत काही गोष्टी नवीन होत्या. एक तर या मोबाइलमधून लांबलचक मेसेज पाठवण्याची सुविधा होती. त्यामध्ये वेगवेगळय़ा ‘मोनो’ रिंगटोन होत्या आणि त्यात स्वत: रिंगटोन तयार करून इतरांना पाठवण्याची सुविधाही होती. पण याहूनही त्या फोनचं वेगळेपण ठरलं त्यातील ‘स्नेक’ या गेममुळे. आज आपल्याला प्रवासादरम्यान स्मार्टफोनवर ‘सबवे सर्फर’, ‘कॅण्डी क्रश’ किंवा कार रेसिंगच्या गेममध्ये गुंतलेले असंख्य लोक पाहायला मिळतात. पण त्या वेळी ‘स्नेक’ या एका गेमने मोबाइलच्या वापरकर्त्यांना वेड लावलं होतं. आजही ‘३३१०’ची आठवण निघताच पहिल्यांदा आठवतो तो ‘स्नेक’ गेमच!

‘नोकिया ३३१०’ने खपाचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले. जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय मोबाइल हॅण्डसेट हे बिरुद ‘३३१०’ने बरीच वर्षे मिरवले. नोकिया कंपनीला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात ‘३३१०’चा मोठा वाटा होता. पण स्मार्टफोनच्या सद्दीस सुरुवात झाली आणि ‘३३१०’ एखादं खेळणं बनून वापरकर्त्यांच्या हातातून गायब झाला. त्यापाठोपाठ नोकियाच्या मोबाइल बाजारपेठेतील वर्चस्वही कमी कमी होत गेलं. आज नोकिया स्वत:च्या अस्तित्वासाठी झुंज देत असताना या कंपनीने पुन्हा एकदा ‘३३१०’ जिवंत करण्याचा निर्णय घेतला आहे. होय, नोकिया ३३१० आता परत येतोय, तेही आधीपेक्षा ‘स्मार्ट’ रूपात!

बार्सिलोनामध्ये होऊ घातलेल्या ‘मोबाइल वर्ल्ड काँग्रेस’ या मोबाइल कंपन्यांच्या कुंभमेळ्याच्या तोंडावर नोकियाने ‘३३१०’ पुन्हा आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अवघ्या साडेतीन हजार रुपयांत हा मोबाइल नव्या रूपात, नव्या ढंगात पण जुन्या ओळखीसकट बाजारात दाखल होणार आहे. नवा ‘३३१०’ आकाराने आधी इतकाच आहे, पण त्याचा रंग आकर्षक असणार आहे. आज ‘टचस्क्रीन’च्या जमान्यातही तो ‘कीपॅड’वरच चालणार आहे, पण त्याची मजबुती आधीसारखीच असणार आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे, यात ‘स्नेक’ही असणार आहे. साधेपण, मजबूतपणा, सहज हाताळण्याची सुविधा या जुन्या वैशिष्टय़ांना आधुनिक साज चढवून नोकियाने ३३१० बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात एप्रिल-मेनंतर हा फोन दाखल होईल.

नव्या दमाच्या खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी होत नसताना निवृत्तीला पोहोचलेल्या एखाद्या खेळाडूला मैदानात उतरावं आणि त्याच्याकडून अप्रतिम कामगिरीची अपेक्षा करावी, अशा हिशेबाने नोकियाने ‘३३१०’चा पुनर्जन्म घडवला आहे. सध्या ज्या अवस्थेतून ‘नोकिया’ जात आहे, त्या अवस्थेत आर्थिक उभारीसाठी ‘३३१०’ किती उपयुक्त ठरेल, याबाबत शंका आहे. पण या फोनसोबत असंख्य आठवणी जोडलेल्या अनेकांना यानिमित्ताने ‘नोकिया’चीही आठवण होईल, एवढे मात्र नक्की!

नोकिया ३३१०ची वैशिष्टय़े

’      किंमत : नवा ‘३३१०’देखील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असणार आहे. याची किंमत सुमारे ३५०० रुपये इतकी असणार आहे.

’      डिस्प्ले : ‘३३१०’मधील हिरवट रंगाचा आणि काळ्या अक्षरांचा डिस्प्ले नवीन हॅण्डसेटमध्ये नसेल. त्या जागी आपल्याला २.४ इंची आकाराचा रंगीत स्क्रीन दिसेल. सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट पाहता येईल, अशी रचना यात असणार आहे.

’      कॅमेरा : ‘३३१०’मधील सर्वात मोठा बदल म्हणजे, यात मागील बाजूस दोन मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल. सोबत एलईडी फ्लॅशचीही सुविधा असेल. अर्थात सध्याच्या ‘सेल्फी’मय जगात या फोनमध्ये फ्रंट कॅमेरा नसल्याची उणीव नक्कीच जाणवेल.

’      ‘स्नेक’ : अवघ्या चार बटणांवर खेळता येणारा ‘स्नेक’ गेम नव्या ‘३३१०’ मध्ये अधिक आकर्षक रूपात असेल.

’      बॅटरी : ‘३३१०’ची बॅटरी पहिल्यासारखीच दीर्घकाळ चालणारी असणार आहे. ‘स्टॅण्डबाय’ स्वरूपात हा फोन महिनाभर चार्जिगशिवाय राहू शकतो. तर सतत वापर करूनही २२ तासांपर्यंत त्याची बॅटरी तग धरू शकेल.