ऑनलाइन खरेदी करत असताना आपल्याला अनेक सवलतींचा लाभ मिळतो. अगदी दहा टक्के सवलतीपासून ते ८० टक्के सवलत मिळते. इतकेच नव्हे, तर अनेक वेळा आपण खर्च केलेल्या पैशांतील काही पैसेही परत मिळतात; पण हे असे दर वेळेसच होते असे नाही. मग अशा वेळी जर तुम्हाला तुम्ही खर्च केलेल्या पैशांतील पैसे परत हवे असतील तर त्यालाही पर्याय उपलब्ध आहेत. आपण खर्च केलेल्या पैशांमधील काही पैसा आपल्याला परत मिळवून देणारे अनेक संकेतस्थळ व त्यांचे अ‍ॅप्स बाजारात उपलब्ध आहेत. पाहूयात या संकेतस्थळांची एक झलक..

इंडियाकॅशबॅक

हे संकेतस्थळ पैसे परतावा आणि कूपन्सच्या विभागातील सर्वात विश्वासार्ह संकेतस्थळ मानले गेले आहे. या संकेतस्थळाचा वापर करण्यासाठीही सुरुवातीला तुम्ही नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या उत्पादनाची निवड करून त्याची मागणी नोंदवू शकता. ही मागणी नोंदविल्यानंतर तुम्हाला पैसे परतावा मिळू शकतो. इतर सर्व संकेतस्थळांपेक्षा याची विशेष गोष्ट म्हणजे या संकेतस्थळावर नियमित पुरविल्या जाणाऱ्या पैसे परतावा सुविधेसोबतच संकेतस्थळ स्वत: काही उत्पादनांवर त्यांच्यातर्फे पैसे परतावा देते. यामुळे ज्यांना खरेदीवर जास्त पैसे वाचवायचे असतील ते लोक या पर्यायाचा वापर करतात.

लाफालाफा

या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्याला सर्व प्रकारच्या ऑफर्सवर पैसे परतावा मिळवता येऊ शकतो. लाफालाफा ही सर्वात जलदगतीने पैसे परतावा करणारे संकेतस्थळ म्हणून त्याची भारतात ओळख आहे. या संकेतस्थळावर सर्व ई-व्यापार संकेतस्थळांवरील उत्पादनांचा तपशील उपलब्ध होतो. तसेच आपल्याला पाहिजे ती वस्तू कमीत कमी पैशांत कोणत्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे याचा तपशीलही हे संकेतस्थळ आपल्याला उपलब्ध करून देतो. याचबरोबर अनेकदा विविध संकेतस्थळांचे बँकांसोबत सहकार्य झालेले असते, त्यानुसारही पैसे परतावा किंवा सवलतीच्या विशेष ऑफर्स देऊ केल्या जातात. याचा तपशीलही हे संकेतस्थळ आपल्या बँक खात्याच्या माहितीच्या आधारे आपल्या खात्याला उपलब्ध असलेल्या सवलतींची माहितीही करून देते. या संकेतस्थळावर तुम्ही केलेल्या प्रत्येक खरेदीवर पैसे परतावा मिळण्याची हमी आहे.

कॅशकरो

नुकत्याच पार पडलेल्या ई-खरेदीजत्रेत आठ हजार करोड रुपयांची उलाढाल झाली. आता दिवाळीपूर्वी पुन्हा एकदा या संकेतस्थळांनी खरेदीजत्रा भरवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांची झुंबड या संकेतस्थळांवर दिसणार आहे. या संकेतस्थळांवर खरेदी करत असताना आपल्याला अनेक सवलती मिळतातच, पण आपण खर्च केलेल्या पैशांतील काही पैसे परत मिळवणेही आपल्याला शक्य आहे. अनेकदा या संकेतस्थळावर थेट अशी सवलत दिली जाते, तर अनेकदा पर्यायी संकेतस्थळांच्या माध्यमातून ही सवलत घेतली जाते. फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडीलसारखी बडी संकेतस्थळे अशा कॅशबॅक म्हणजेच पैसा परतावा करणाऱ्या आणि कूपन्स उपलब्ध करून देणाऱ्या संकेतस्थळांसोबत काम करत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या संकेतस्थळांच्या मदतीने मुख्य संकेतस्थळावर खरेदी करणे अधिक सवलतीचे ठरणार आहे. पैसे परतावामुळे ग्राहकांचे अधिक बचत होते.

पैसे परतावा करणाऱ्या संकेतस्थळांमधील सर्वात प्रमुख संकेतस्थळ म्हणून कॅशकरो डॉट कॉम या संकेतस्थळाची ओळख आहे. भारतात या संकेतस्थळातर्फे जास्तीत जास्त टक्क्यांपर्यंत पैसे परतावा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर सर्वाधिक ई-व्यापार संकेतस्थळे उपलब्ध असून हे संकेतस्थळ वापरणेही सोपे आहे. हे संकेतस्थळ वापरण्यासाठी सर्वप्रथम हे संकेतस्थळ सुरू करा. तेथे तुमची नोंदणी करा. यानंतर संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला पाहिजे त्या विक्रेत्याच्या संकेतस्थळावर भेट द्या. तेथून तुम्ही खरेदी करा आणि पैसे परतावा मिळवा. या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्ही खरेदी केलेली वस्तू कोठपर्यंत पोहोचली आहे याचा अंदाजही घेऊ शकता. तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परत करावयाचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातात. याचबरोबर तुम्ही पैसे बँकेत जमा करण्याचा पर्याय निवडू शकता किंवा त्या पैशांत कूपन खरेदीही करू शकता. ही सर्व प्रक्रिया पार पाडत असताना आंतरराष्ट्रीय मानांकनांनुसार सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले आहे.

गोपैसा

वरील दोनप्रमाणेच आणखी एक लोकप्रिय पैसे परतावा पुरवठादार आहे. तो म्हणजे गोपैसा. या संकेतस्थळाचे फ्लिपकार्टसोबत सहकार्य करार असून या संकेतस्थळाच्या माध्यमातून फ्लिपकार्टवरील सर्व प्रकारच्या खरेदीवर पैसे परतावा मिळवता येऊ शकतो. हे संकेतस्थळ कॅशकरो या संकेतस्थळाला असलेली मोठी स्पर्धा मानली जाते. या संकेतस्थळावर पैसे परताव्याचे टक्के आणि नफा याचे गुणोत्तर कॅशकरोच्या तुलनेत अधिक चांगले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या संकेतस्थळाचा वापर करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. यानंतर आपल्याला पाहिजे ते उत्पादन विविध ई-व्यापार संकेतस्थळांवर किती रुपयांमध्ये उपलब्ध आहे याचा तपशील आपल्यासमोर उभा राहतो. यात आपण निवडलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून खरेदी करत असताना पैसे परताव्याचा पर्याय निवडा आणि मग आपली मागणी नोंदवा. तुम्ही तुमच्या मागणीची स्थिती आणि पैसे परताव्याची स्थिती गोपैसा वॉलेटच्या माध्यमातून पाहू शकता.

एनकॅशइट

संकेतस्थळाच्या नावाप्रमाणेच हे संकेतस्थळ तुमच्या खात्यात अतिरिक्त पैसे परतावा करते. या संकेतस्थळावर २०० हून अधिक ई-व्यापार संकेतस्थळांचा तपशील उपलब्ध आहे. हे संकेतस्थळ उच्च दर्जाच्या सेवेसाठी ओळखले जाते. यामध्ये देण्यात आलेल्या ऑफर्स ही याची विशेष ओळख आहे. या संकेतस्थळाचे

ज्या ई-व्यापार संकेतस्थळांची सहकार्य करार झालेले आहेत त्या प्रत्येकासाठी कंपनी वेगवेगळे कूपन कोड्स आणि प्रोमोकोड्स उपलब्ध करून देते. यामुळे खरेदी अधिक

सोपी होते. या संकेतस्थळाचा वापर करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला पाहिजे ती वस्तू तुम्हाला पाहिजे त्या ई-व्यापार संकेतस्थळावरून शोधा. विविध संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या वस्तूची आणि किमतीची तुलना करा. मग तुम्ही तेथे दिलेला ‘शॉप नाऊ’ हा पर्याय निवडा. मग संबंधित संकेतस्थळावर जाऊन तुमची मागणी नोंदवा. एकदा का तुम्ही मागणी नोंदविली की, तुम्हाला पैसे परतावा मिळू शकतो. या संकेतस्थळाच्या माध्यमातून २० टक्क्यांपर्यंत पैसे परतावा दिला जातो.

इतर वैशिष्टय़े

हे भारतातील काही पैसे परतावा सेवा उपलब्ध करून देणारी संकेतस्थळे. ही सर्व संकेतस्थळे पैसे परतावा आणि कूपन्सच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक फायदा करून देतात. तसेच ही सर्व संकेतस्थळे वापरण्यासाठी सोपी आहेत. या संकेतस्थळांच्या माध्यमातून खरेदी केल्यावर आपल्याला तातडीने पैसे भरल्यास जास्त परतावा मिळतो. यामुळे बहुतांश कंपन्यांनाही आधी पैसे मिळतात. यामुळे कंपन्याही या संकेतस्थळाचा वापर करून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात.

niraj.pandit@expressindia.com