ओरिगामी ही कागदांना विशिष्ट प्रकारे घडय़ा घालून नवनवीन कलाकृती तयार करण्याची पारंपरिक जपानी कला. या कलेत एखादी वस्तू बनवण्यासाठी कागदाला विशिष्ट पद्धतीने घडी घालण्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच त्या घडय़ा कोणत्या क्रमाने घालायच्या यालादेखील तितकेच महत्त्व आहे. या कलेतून आपण प्राणी, पक्षी, फुले-पाने, वाहने, बॉक्सेस असे बरेच काही तयार करू शकतो.
लहानपणी प्रत्येकानेच कधी ना कधी कागदी होडी बनवून ती पाण्यात सोडली असेलच. ही होडीदेखील ओरिगामी कलेचाच एक भाग आहे. एका चौरसाकृती कागदापासून दोन-तीन प्रकारच्या होडय़ा बनवता येतात हे आपल्याला माहीत आहेच. हे कसे शक्य होते? आपण कुठल्या प्रकारची घडी घातली, केव्हा घातली, कुठल्या क्रमाने घातली यावरच हे अवलंबून आहे. याचा क्रम आपण जरा जरी चुकवला तर आपल्याला अपेक्षित असलेली वस्तू तयार होणार नाही. याशिवाय कलाकृती सुबक बनण्यासाठी सतत सरावाची आवश्यकता ही असतेच. आता हा सराव तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनवरदेखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला कागदाचा वापर करण्याची आवश्यकता नाही.
पेपरेमा (Paperama) या अ‍ॅपमध्ये तुम्हाला अंदाजे शंभरएक कलाकृती बनवण्यासाठी पझल्स दिलेली आहेत. प्रत्येक पझलमधे तुम्हाला एक चौरसाकृती कागद दिलेला असतो आणि तुम्हाला जो आकार तयार करायचा आहे तो तुटक रेषेच्या साहाय्याने दर्शवलेला असतो. तसेच त्या स्क्रीनवर हे तुम्हाला किती घडय़ांमधे (फोल्ड्स) बनवायचे आहे हेदेखील सांगितलेले असते. टच स्क्रीनवर बोट योग्य तऱ्हेने फिरवून तुम्हाला कागदाच्या घडय़ा घालायच्या असतात. तुम्ही किती बिनचूक घडी घालता यावर तुमचा स्कोअर अवलंबून असतो. तुम्ही घातलेली एखादी घडी चुकीची आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ती अनडू करू शकता. तसेच तुम्हाला हिंटची मदतदेखील येथे घेता येते.
ही पझल्स चार भागांत विभागली असून प्रत्येक भागात २४ लेव्हल्स आहेत. प्रत्येक लेव्हल सोडवून पूर्ण केल्याशिवाय त्या पुढील लेव्हल अनलॉक होत नाही. अशा प्रकारे बुद्धीला आणि कल्पनाशक्तीला चालना देणारा हा खेळ आहे.
दररोजच्या धकाधकीच्या जीवनात लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच वेगवेगळ्या प्रकारच्या ताण-तणावांना सामोरे जावे लागत असते. त्यातून काही काळ तरी बाहेर पडण्यासाठी ओरिगामी हा एक उत्तम उपाय आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे. मनोरंजनासाठी या अ‍ॅपचा उपयोग नक्की करून बघा.
iPhone आणि ्रiPad US https://itunes.apple.com/in/app/paperama/id842608717?mt=8  ही लिंक वापरून हे अ‍ॅप डाउनलोड करू शकता.
अँड्रॉइडसाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.fdgentertainment.paperama&hl=en  ही लिंक वापरून हे अ‍ॅप डाउनलोड करू शकता.
manaliranade84@gmail.com