पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि देशभरात चलनकल्लोळ सुरू झाला. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसला आहे. रोजचा खर्च कसा भागवावा अशी भ्रांत अनेकांसमोर आहे. हातात रोख रक्कम हवी असेल तर चार ते पाच तास बँकांमधील रांगेत उभे राहा किंवा एटीएम सुरू होईपर्यंत वाट पाहा. एवढे करूनही हातात दोन हजार रुपयांची नोट मिळणार. त्याचे सुट्टे पैसे कसे होणार, असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहात आहे. पण या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी देशात रोखरहित व्यवहार करण्याची तंत्रस्नेही सुविधा उपलब्ध आहे. पाहूया या सुविधेबद्दल –

जगातील सर्वाधिक मोबाइलधारक भारतात असले तरी इंटरनेट सुविधा आणि तंत्रस्नेहीपणा यामध्ये आजही देश जगाच्या तुलनेत खूपच मागासलेला आहे. आजही आपल्या देशात रोख व्यवहारांना सर्वाधिक महत्त्व दिले जाते. बँकांनी खिशात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड मोफत उपलब्ध करून दिलेत तरी त्याचा वापर आजही म्हणावा तितका होत नाही. याचबरोबर यूपीआय, ई-वॉलेट्स आदी सुविधाही देशात उपलब्ध झाल्या आहेत. मात्र ते वापरण्याची मानसिकता आजही अनेक भारतीयांमध्ये नाही. यातही सर्वाधिक वापर हा डेबिट कार्डचा होतो. त्याखालोखाल प्रीपेड पेमेंट पद्धतीचा म्हणजे कूपन्स किंवा प्रीपेड कार्ड्सचा वापर होतो. मग क्रेडिट कार्ड आणि त्यानंतर मोबाइल वॉलेट्सचा वापर होत असल्याने विविध सव्‍‌र्हेक्षणांतून दिसून आले आहे. भारतीयांना डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करण्यात नेमक्या काय अडचणी आहेत यावर करण्यात आलेल्या एका पाहणीत खालील गोष्टी प्रामुख्याने लक्षात आल्या.

  • ६८ टक्के भारतीयांनी रोखीने व्यवहार करण्याची सवय झाल्याचे नमूद केले.
  • ५५ टक्के भारतीयांना या सुविधा वापरण्यास किचकट वाटतात.
  • २९ टक्क्यांना डिजिटल पेमेंटपेक्षा रोख किंवा इतर व्यवहारांमध्ये मिळणारी सवलत आकर्षित करते.
  • २७ टक्क्यांना या व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याची भीती असते.
  • १६ टक्क्यांना अशा काही सुविधांबद्दल फारशी माहितीही नसल्याचे समोर आले.

नुकत्याच झालेल्या या पाहिणीवरून आजही भारतीयांची रोख व्यवहाराची मानसिकता समोर येते. या अडचणींवर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणेपासून खासगी कंपन्या विविध स्तरांवर प्रयत्न करत आहेत. यामुळे नजीकच्या काळात रोखरहित व्यवहारांची संख्या वाढणार हे निश्चित असले तरी याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्याने घेतलेल्या निर्णयानंतरच झाली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रोखरहित व्यवहार दिसून आले आहेत. पण हे सर्व व्यवहार शहरी भागांमधून होत आहेत. आपल्या जवळ रोख रक्कम नसताना कोणत्या मार्गाने आपण खर्च करू शकतो याचे पर्याय पाहुयात.

इंटरनेट बँकिंग

रोखरहित व्यवहार म्हटले की सर्वात प्रथम पर्याय दिसतो तो म्हणजे इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंगचा. यामध्ये आपण एकाच्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवू शकतो. असे व्यवहार करण्यासाठी तीन प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. यात एनईएफटी, आटीजीएस आणि आयएमपीएस या सुविधांचा समावेश आहे. यातील आयएमपीएस या सेवेच्या माध्यमातून आपण दोन लाखांपर्यंतची रक्कम कोणत्याही वेळी दुसऱ्याच्या खात्यात जमा करू शकतो. यासाठी पाच रुपयांपासून ते १५ रुपयांपर्यंतचे सेवा शुल्क भरावे लागते. एनईएफटीमध्ये बँकेच्या कामकाजांच्या वेळात व्यवहार करणे शक्य हाते. तर आरटीजीएसमध्ये आपण दोन लाखांपेक्षा जास्त रक्कमेचे व्यवहार करू शकतो. हे व्यवहारही बँकेच्या कामकाजांच्या वेळातच पार पाडता येऊ शकतात.

व्यवहार करताना

  • इंटरनेट बँकिंगचा वापर करताना आपण ज्या संगणकावरून अथवा मोबाइलवरून व्यवहार करत आहोत त्यात अ‍ॅण्टिव्हायरस आहे की नाही हे पाहावे.
  • संगणकावरून व्यवहार करत असताना संगणक लॅनशी जोडलेला नसावा. त्या संगणकावर स्वतंत्र इंटरनेट जोडणी अपेक्षित आहे.
  • व्यवहार पूर्ण झाल्यानंतर संगणकातील किंवा मोबाइलमधील ‘कॅचे डेटा’ डीलीट करावा.
  • क्रोम ब्राऊझरचा वापर करत असला तर ‘ऑटोफिल’ बंद करावे.
  • हे व्यवहार करत असताना आभासी कळफलकाचा वापर करावा.

प्लास्टिक मनी

इंटरनेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग यापेक्षा सर्वात सोपा पर्याय म्हणून प्लास्टिक मनीची ओळख आहे. यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड्सचा समावेश होतो. बहुतांश नोकरदार वर्गाकडे डेबिट कार्ड हे उपलब्ध असते. यामुळेच रोखरहित व्यवहारांमध्ये सर्वाधिक व्यवहार डेबिट कार्डच्या माध्यमातून होऊ लागले. हे व्यवहार करणे अगदी सोपे असून यामध्ये आपण कार्ड स्वाइप केल्यावर आपला पिन क्रमांक टाकल्यानंतर आपल्या बँक खात्यातील पैसे थेट विक्रेत्याच्या खात्यात जमा होतात. क्रेडिट कार्डच्या बाबतीतही असेच असून यामध्ये ठरावीक मुदतीच्या आत आपल्याला पैशांचा परतावा करावा लागातो. याशिवाय सध्या नवीन पद्धतीचा वापर होत आहे तो म्हणजे प्रीपेड कार्ड्सचा. असे कार्ड्स बँकांसोबतच बँक नसलेल्या वित्त कंपन्यांनीही उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये आपल्या कार्डमध्ये अमुक एक रक्कम भरलेली असते. ही रक्कम संपेपर्यंत आपण त्या कार्डचा वापर करू शकतो. याचबरोबर रक्कम संपल्यावर पुन्हा मोबाइलप्रमाणे रीचार्जही करू शकतो. ही सुविधा वापरण्यासाठी बँकेत खाते हवेच असे नाही. त्याच्याशिवायही आपण कार्डच्या माध्यमातून व्यवहार करू शकतो. याचबरोबर यामध्ये विविध ब्रॅण्ड्स त्यांच्या खरेदीसाठीही प्रीपेड कार्ड्स उपलब्ध करून देतात. ते कार्ड्स केवळ त्यांच्या दुकानातील खरेदीसाठी उपयुक्त ठरतात. सध्या बाजारात एसबीआय, आयसीआयसीआयसारख्या बँकांनी त्यांचे प्रीपेड कार्ड उपलब्ध करून दिले आहेत.

युनिफाइल पेमेंट इंटरफेस (यूपीआय)

स्मार्टफोनचा वापर करून बँक खात्यात पैसे पाठविण्याचे सर्वात सोपे माध्यम म्हणून यूपीआयकडे पाहिले जाते. बँकिंग क्षेत्रात एटीएमनंतर झालेले हे सर्वात मोठे संशोधन मानले जाते. यामध्ये आपण विक्रेत्याला थेट पैसे देऊ शकतो. यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन असे दोन्ही पर्याय आहेत. ही सुविधा वापरण्यासाठी आपल्याला डेबिट कार्ड नंबर किंवा आयएफएससी कोड किंवा नेट बँकिंग किंवा ई-वॉलेट पासवर्ड आदी गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नसते. ही सुविधा वापरण्यासाठी बँकेत खाते असणे आणि मोबाइल क्रमांक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी बँकेच्या ग्राहकाला आपल्या स्मार्टफोनमध्ये यूपीआयधारित अ‍ॅप डाऊनलोड करावे लागते. या अ‍ॅपमधून व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्ही आभासी वापरकर्ता क्रमांक तयार करू शकता किंवा तुमच्या बँकेचा आएफएससी कोडही वापरू शकता. सध्या बाजारात बहुतांश सर्वच बँकांचे यूपीआय अ‍ॅप उपलब्ध आहेत.

व्यवहार करताना

  • या अ‍ॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये वापरकर्त्यांची आभासी ओळखच गृहीत धरली जाते. यामुळे हे अ‍ॅप वापरणे इतर अ‍ॅप्सच्या तुलनेत सुरक्षित मानले जाते.
  • या अ‍ॅपच्या माध्यमातून एकावेळी एक लाख रुपयापर्यंतचे व्यवहार करता येतात.
  • हे अ‍ॅप असलेल्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक टाकून हा व्यवहार करता येतो.

मोबाइल पाकिटे

काही क्षणात आपले व्यवहार पूर्ण करणारी सुविधा म्हणून या सेवेची ओळख निर्माण होऊ लागली आहे. पूर्वी केवळ ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरली जाणारी ही सुविधा आता अनेक दुकानदारांनीही स्वीकारली आहे. यामुळे अगदी भेळपुरीवाल्यापासून ते रेल्वेचे तिकीट खरेदी करेपर्यंत सर्वच स्तरांवर मोबाइल पाकिटांचा वापर होऊ लागला आहे. यामध्ये डेबिट किंवा क्रेडिट कार्डसारखी स्वाइप करण्याची गरज नसते. ही सेवापुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या अ‍ॅपमध्ये एकदा का आपली नोंदणी केली की यानंतरचे पुढचे व्यवहार अगदी काही क्षणात करणे शक्य होणार आहे. या पाकिटांमध्ये आपण काही रक्कम भरून ठेवू शकतो. ही रक्कम भरल्यानंतर आपण आपले व्यवहार करू शकतो. जर रक्कम भरून ठेवायची नसेल तर अ‍ॅपच्या माध्यमातून आपण डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगच्या आधारे व्यवहार करू शकतो. या मोबाइल पाकिटांमध्ये आपण अगदी दहा रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत पैसे भरून ठेवू शकतो. जर कंपनीची संपूर्ण केवायसी केली असेल तर एक लाख रुपये साठवण्याची मुभाही या कंपन्यांनी देऊ केली आहे. सध्या बाजारात पेटीएम, फ्रीचार्ज, ऑक्सिजन, चिल्लर, मोबिक्विकसारख्या कंपन्यांनी अशी पाकिटे उपलब्ध करून दिली आहेत.

व्यवहार करताना

  • हे व्यवहार करताना आपल्या बँक खात्याचा क्रमांक किंवा डेबिट कार्डचा क्रमांक अ‍ॅपमध्ये सेव्ह करून ठेवू नका.
  • शक्यतो या पाकिटांमध्ये आधी पैसे भरून ठेवले व व्यवहार केले तर ते जलदगतीने होऊ शकतात.
  • या अ‍ॅपमध्ये सुरक्षेचे सर्व नियम पाळले जातात. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून अनावश्यक किंवा परत भरता येणारा तपशील साठवून ठेवू नये.
  • अ‍ॅपच्या माध्यमातून देऊ केलेल्या विविध ऑफर्सना बळी न पडता आवश्यक तेच व्यवहार करावेत. अनेकदा ऑफर्ससाठी अतिरिक्त तपशील देण्याची गरज पडते.

 

– नीरज पंडित

Niraj.pandit@expressindia.com