‘ओपन सोर्स’ प्लॅटफॉर्म असल्याने अँड्रॉइडवर आधारित स्मार्टफोनवर लाखो अ‍ॅप्स उपलब्ध होतात. त्यामुळे आधीच ‘स्मार्ट’ असलेले फोन आणखी ‘स्मार्ट’ करण्यास मदत होते. मात्र, त्याचबरोबर अशा प्रकारच्या कार्यप्रणालीमुळे अँड्रॉइड फोनच्या सुरक्षेला धोका पोहोचवणारे अनेक अ‍ॅप्स, प्रोग्रॅम, व्हायरस त्यात सहज शिरकाव करतात. असाच एक धोका ‘क्वाडरूटर’ने निर्माण केला आहे.

अँड्रॉइडवर आधारित स्मार्टफोनची सुरक्षितता हा नेहमीच चर्चेत राहिलेला मुद्दा आहे. सुरक्षेबाबत कितीही खबरदारी घेतली तरी अँड्रॉइड फोन ‘हॅक’ होण्याचे किंवा त्यात व्हायरस जाण्याचे प्रकार घडतच असतात. असाच एक नवीन धोका सध्या अँड्रॉइड जगावर घोंघावू लागला आहे. ‘क्वाडरूटर’ नावाच्या धोक्यामुळे जगभरातील जवळपास ९० कोटी अँड्रॉइड स्मार्टफोनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
‘क्वाडरूटर’चा थेट संबंध अँड्रॉइडच्या फोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘चिप’शी आहे. ‘क्वालकॉम’ हे चिपसेट असलेल्या स्मार्टफोनना ‘क्वाडरूटर’मुळे धोका निर्माण झाला आहे. स्मार्टफोनवरील सर्व संगणकीय तसेच इलेक्ट्रॉनिक यंत्रणांना हाताळण्याचे काम हे ‘चिपसेट’ करत असतात. स्मार्टफोनची बांधणी होत असताना ‘क्वालकॉम’च्या चिपसेटसोबतच ‘क्वाडरूटर’चा फोनच्या सॉफ्टवेअरमध्ये शिरकाव झाल्याचे बोलले जात आहे. ‘क्वाडरूटर’मुळे चार सुरक्षा धोके उत्पन्न होतात. यापैकी एकाही सुरक्षेच्या बाबत तडजोड झाल्यास ‘हॅकर’ना स्मार्टफोनचा थेट ‘रूट अ‍ॅक्सेस’ मिळवता येऊ शकेल, असा दावा सुरक्षा संशोधकांनी केला आहे.
‘क्वालकॉम’ चिपसेटमध्ये स्मार्टफोनच्या निर्मिती वेळेसच इन्स्टॉल केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पहिला धोका संभवतो, असे सुरक्षातज्ज्ञांनी म्हटले आहे. चिपचा थेट ‘अ‍ॅक्सेस’ किंवा सॉफ्टवेअरमध्ये थेट प्रवेश असल्याने ‘हॅकर’ एखाद्या अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनमधील सर्व माहिती मिळवू शकतात. इतकेच नव्हे तर, फोन रूट करून वापरकर्त्यांची माहिती मिटवूदेखील शकतात. ‘क्वालकॉम’च्या चिप असलेल्या स्मार्टफोनमध्ये गुगल नेक्सस ५ एक्स, नेक्सस ६पी, एचटीसी १०, एलजी जी५, मोटो एक्स, वनप्लस३, सॅमसंग गॅलक्सी एस७ अशा आघाडीच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. अशा फोनचे सहज हॅकिंग करून ‘हॅकर’ जीपीएस ट्रॅकिंग करणे, व्हिडीओ रेकॉर्डिग करणे अशा गोष्टी सहज करू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.
क्वालकॉमनेही हा धोका असल्याचे मान्य केले आहे. त्याचवेळी एप्रिल ते जुलैअखेरीपर्यंत निर्माण करण्यात आलेल्या तसेच बसवण्यात आलेल्या सर्व चिपच्या स्मार्टफोनधारकांसाठी आणि कंपन्यांसाठी ‘सिक्युरिटी पॅच’ पुरवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. अशा पद्धतीचे धोके सर्वच कंपन्यांच्या चिपसेटच्या बाबतीत असू शकतात, असे कंपनीच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे.

काय काळजी घ्याल?
* तुमचा स्मार्टफोन ‘क्वालकॉम’च्या चिपवर आधारित असल्यास योग्य खबरदारी घेऊन तुम्ही तुमचे नुकसान कमी करू शकता.
* सर्वप्रथम अँड्रॉइडचे ताजे अपडेट डाऊनलोड व इन्स्टॉल करा.
* कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याबद्दल बारकाईने वाचा.
* ‘थर्ड पार्टी’ अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे टाळा.
* कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्यामध्ये कोणत्या ‘परमिशन’चा समावेश आहे, याची खातरजमा करा.