झेरॉक्स, प्रिंट, स्कॅन हे शब्द आपल्याला रस्त्याने जाता येता अगदी थोडय़ा थोडय़ा अंतरावर वाचायला मिळतात. महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रत काढण्यासाठी झेरॉक्स काढणे, डिजिटल स्वरूपात असलेल्या कागदपत्रांची प्रत मिळवण्यासाठी त्याची प्रिंट काढणे आणि कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ठेवण्यासाठी ती स्कॅन करून ठेवणे या गोष्टी आपल्याला अजिबात नवीन नाहीत. कारण आपल्यापैकी प्रत्येकाला या गोष्टी करण्याची गरज कधी ना कधी खरं तर सततच पडत असते. आता यापैकी महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करण्याचे काम तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला घरी स्कॅनर असण्याची आवश्यकता नाही. कारण हे काम तुमच्या हातातील स्मार्ट फोन अगदी स्मार्टली करू शकतो. तेदेखील संपूर्ण विनामूल्य.
’ मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस लेन्स या अ‍ॅपच्या सहाय्याने तुम्ही कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट जसे की, हस्तलिखित किंवा प्रिंटेड डॉक्युमेंट, बिझनेस कार्ड इत्यादीची डिजिटल कॉपी बनवू शकता. तसेच तुमच्या हस्ताक्षरात ब्लॅक बोर्ड किंवा व्हाइट बोर्डवर नमूद केलेले मुद्देदेखील स्कॅन करता येतात. स्कॅन करण्यासाठी आपल्याला केवळ एक फोटो काढावा लागतो. शिवाय हा फोटो खूप कौशल्याने काढावा लागतो अशातला भाग नाही. तुम्ही डॉक्युमेंटचा फोटो घेतल्यावर हे अ‍ॅप त्या डॉक्युमेंटच्या मुख्य कडा आणि शिरोबिंदू ओळखते. आणि इतर अनावश्यक भाग काढून टाकून केवळ मुख्य डॉक्युमेंटचा फोटो ठळकपण दर्शवते.
’ तुम्हाला डिजिटल रूपात काय रूपांतरित करायचे आहे त्यानुसार कुठला मोड निवडायचा हे तुम्ही ठरवू शकता.
’ व्हाइटबोर्ड मोडमध्ये तुम्ही व्हाइटबोर्डचा फोटो काढल्यावर अनावश्यक भाग ट्रीम करू शकता. या मोडमधे बोर्डवरील चकाकी आणि सावली स्कॅन केल्यावर काढून टाकता येते.
’ डॉक्युमेंट मोडमधे अनावश्यक भाग ट्रीम करण्याबरोबरच अक्षरे आणि रंगीत चित्र अतिशय सुस्पष्टपणे स्कॅन केली जातात. जर तुम्ही प्रिंटेड टेक्स्ट असलेले डॉक्युमेंट स्कॅन केलेले असेल तर फोटोतील अक्षरे ओसीआर (डउफ) म्हणजेच ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन तंत्रज्ञानाद्वारे ओळखली जातात. त्यामुळे तुम्ही या फोटोतील शब्द शोधू शकता. ते कॉपी करू शकता. तसेच त्या डॉक्युमेंटमध्ये बदलदेखील करता येतात.
’ बिझनेस कार्ड मोडमध्ये कार्डावरील संपर्काशी संबंधित माहिती उचलून ती तुमच्या अ‍ॅड्रेसबुकमधे आणि वन नोटवर सेव्ह करता येईल.
’ स्कॅन केलेली इमेज तुम्ही लोकल ड्राइव्ह, वन नोट किंवा वन ड्राइव्हवर सेव्ह करू शकता. या अ‍ॅपच्या सहाय्याने तुम्ही इमेज पीडीएफ, वर्ड आणि पॉवर पॉइंट फाइल्समध्ये रूपांतरीत करू शकता.
एकदा या अ‍ॅपशी मैत्री झाल्यावर रोजच्या जीवनातील कागदपत्रांचे व्यवहार तुम्हाला सुलभपणे करता येतील आणि त्यासाठी दुकानात खेटे घालावे लागणार नाहीत.
manaliranade84@gmail.com