29 January 2020

News Flash

‘स्मार्ट’ संशोधन

आपल्या खिशातील फोन दिवसेंदिवस अधिक ‘स्मार्ट’ होऊ लागला आहे.

आपल्या खिशातील फोन दिवसेंदिवस अधिक ‘स्मार्ट’ होऊ लागला आहे. आपल्याला पाहिजे त्या सुविधा त्यात देण्यासाठी जगभरात मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू आहे. याच संशोधनातून फोन आपला ‘स्मार्ट’सोबती होऊ लागला आहे. २०१६ या वर्षांत असेच एकापेक्षा एक प्रगत संशोधन झाले आणि स्मार्टफोनचा अनुभव आणखी सुखद झाला. वर्षभरात झालेल्या ‘स्मार्ट’ संशोधनांचा हा आढावा.

वायररहित चार्जिग

अ‍ॅपलने सप्टेंबर महिन्यात आयफोन ७ बाजारात आणला. त्याबरोबर स्मार्टफोन क्षेत्रातील अनेक नवी संशोधनेही समोर आलीत. यातीलच एक महत्त्वाचे संशोधन म्हणजे वायररहित चार्जिग. या सुविधेमुळे आपण आपल्या गाडीत किंवा घरातील खुर्चीच्या हातावर एखादे वायररहित चार्जिग जोडून ठेवू शकतो. आपण केवळ त्याच्यावर फोन ठेवला की चार्जिग सुरू होणार. याचबरोबर फोनसोबतही वायररहीत चार्जर येतो. तोही आपण आपल्यासोबत घेऊ शकतो. तसे हे संशोधन २०१५ मध्ये स्मार्टफोन बाजारात चर्चेचा विषय बनले होते. यानंतर सॅमसंग, एलजी सारख्या कंपन्यांनी आपल्या महागडय़ा फोनसोबत असे चार्जर्स देऊ केले आहे. याचे पुढचे पाऊल हे संपर्करहित चार्जिगचे असणार आहे. म्हणजे वायररहित चार्जिगची सुविधा वापरण्यासाठी आपल्याला एखाद्या उपकरणावर आपला फोन ठेवावा लागतो. पण संपर्करहिज चार्जिगमध्ये आपण घरात किंवा कार्यालयात अथवा गाडीत प्रवेश केल्यावर तातडीने आपल्या फोनचे चार्जिग सुरू होणे शक्य होणार आहे.

हेडफोन जॅक हद्दपार

स्मार्टफोनच्या जीवनपटातील एक महत्त्वाची गोष्टी या वर्षांत घडली ती म्हणजे या फोनमध्ये देण्यात येणार हेडफोनचा जॅक स्मार्टफोनमधून हद्दपार होऊ लागला आहे. या संशोधनाचे श्रेयही अर्थात अ‍ॅपललाच जाते. सध्या स्मार्टफोनमध्ये ३.५ एमएमचा ऑडिओ जॅक देण्यात येतो. पण हा हेडफोन जॅक वापरण्यासाठी आपल्याला वायरसहित हेडफोन वापरणे आवश्यक होते. कालांतराने याची जागा ब्लूटय़ूथ हेडफोन्सनी घेतली. जर बाजारात ब्लूटय़ूथ हेडफोन्स उपलब्ध असतील तर तो जॅक देण्यात काय अर्थ असा प्रश्न निर्माण झाला आणि हा जॅक इतिहासजमा करण्याचा निर्णय झाला. अ‍ॅपलने लाइटनिंग पोर्टला जोडण्यासाठी एक छोटा अ‍ॅडप्टर दिला आणि हेडफोन जॅक हद्दपार केला.

डय़ुएल डिस्प्ले

मोठय़ा स्क्रीनचा फोन घेणे हा सध्या स्मार्टफोन चाहत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. एकाच स्क्रीनवर अनेक गोष्टी देता येणे यामुळे शक्य होऊ लागले आहे. यात कल्पकता करत अर्धवर्तुळाकार डिस्प्ले, ई-लिंक्स डिस्प्ले अशा विविध डिस्प्लेचे फोन्स बाजारात आलेत. पण एकाच स्क्रीनवर दोन भागात दोन वेगवेगळय़ा गोष्टी दिसल्या तर स्मार्टफोनधारकाचा बराचसा वेळ वाचू शकतो. या संकल्पनेतून डय़ुएल स्क्रीनचा जन्म झाला. एलजीच्या व्ही १० या फोनमध्ये ५.७ इंचांचा २ के प्रमुख डिस्प्ले देण्यात आला होता. या डिस्प्लेच्या वरच्या बाजूस १०४० बाय १६० पिक्सेलचा लघू डिस्प्लेही यात देण्यात आला. या लघू डिस्प्लेवर नोटिफिकेशन, अतिरिक्त नियंत्रण, टिकर्स, ईमेल्स या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे वापरकर्त्यांचा वेळ वाचू लागला. सध्या स्मार्टफोनमध्ये

एक एक गोष्ट कमी होत असताना आणखी एका डिस्प्लेचा समावेश झाला आहे. पण याचे स्वागत चांगल्या पद्धतीने झाले असून हा डय़ुएल डिस्प्ले लोकांच्या पसंतीस उतरला आहे. यामुळे इतर ब्रँडही आता डय़ुएल स्क्रीन बाजारात आणू लागले आहेत.

रीअल फोर के स्क्रीन्स

बहुतांश स्मार्टफोनमध्ये टूके स्क्रीन्स उपलब्ध होत्या. पण फोनवर चांगल्या दर्जाचे व्हिडीओज उपलब्ध होऊ लागले व कॅमेऱ्याचा दर्जाही वाढू लागला. यामुळे त्या दर्जाचे चित्र पाहण्याचा अनुभव स्मार्टफोनधारकांना घेता यावा या उद्देशाने फोर के डिस्प्ले उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोनीने झेड ५ प्रीमियम या फोनमध्ये हा स्क्रीन उपलब्ध करून दिला. एचडी आणि टूके डीस्प्लेच्या पुढचे पाऊल म्हणून फोरकेकडे पाहिले जाते. याचा सर्वाधिक फायदा आभासी वास्तवाचा अनुभव देणाऱ्या स्मार्टफोनसाठी होतो.

३२ जीबी साठवणूक

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा दर्जा ज्या गतीने वाढतो त्या गतीने आपण काढत असलेल्या छायाचित्रांचे प्रमाणही वाढू लागले आहे. याचबरोबर या छायाचित्रांना साठवणुकीसाठी जागेची गरज निर्माण होऊ लागली आहे. याचबरोबर विविध अ‍ॅप्स आणि त्याच्या जोडीला येणाऱ्या माहितीसाठीही साठवणुकीची गरजही वाढू लागली. यामुळे सुरुवातीला अगदी काही एमबीमध्ये अंतर्गत साठवूणक देणाऱ्या फोन्समध्ये चार जीबी त्यानंतर आठ मग पुढे

सोळा जीबी साठवणूक क्षमता उपलब्ध झाली. कोणत्याही कंपनीने स्मार्टफोन बाजारात आणला की त्याच्या साठवणूक क्षमतेची सुरुवात चार जीबीपासून असायची. कालांतराने ती सोळा जीबीपर्यंत पोहोचली. पण या वर्षांत अ‍ॅपलने किमान साठवणूक मर्यादा फोन ३२ जीबीचा आणल्यामुळे सोळा जीबी साठवणूक क्षमतेचा फोन बाजारात आणल्यामुळे स्मार्टफोनमध्ये पुन्हा एकदा कमाल साठवणूक क्षमतेची नवी मर्यादा समोर आली.

व्हीओएलटीई

या वर्षांत सर्वाधिक चर्चा झाली ती रिलायन्स जिओची. यामध्ये वापरण्यात आलेले व्हीओएलटीई तंत्रज्ञान ही वैशिष्टय़पूर्ण बाब ठरली आहे. हे तंत्रज्ञान देशात दूरसंचार क्षेत्रात प्रथमच रीलायन्सने वापरले. या तंत्रज्ञानात तुम्हाला व्हॉइस कॉल आणि इंटरनेट अशा दोन्ही सुविधा वापरता येतात. या तंत्रज्ञानामुळे तुमच्या व्हॉइस कॉलचा वेग अधिक चांगला होतो, आवाजाचा दर्जाही वाढतो. तसेच कॉल ड्रॉप होण्याचे प्रमाणही कमी होते.

आयरिस स्कॅनर

आपल्या फोनमध्ये अनेक महत्त्वाच्या नोंदी असतात. जर आपला फोन चोरीला गेला तर या नोंदींचा फायदा घेऊन चोर कोणत्याही थराला जाऊ शकतो. यामुळे फोनच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ लागला. मग फोनच्या सुरक्षेवर विविध प्रकारचे संशोधन होऊ लागले. अँटि व्हायरसबरोबरच फिंगर स्कॅनरसारख्या सुविधाही फोनमध्ये उपलब्ध होऊ लागल्या. पण त्याच्याही पलीकडे जाऊन अधिक सुरक्षा मिळावी या उद्देशाने डोळय़ांच्या स्कॅनिंगची सुविधा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे तुमचा फोन अधिक सुरक्षित राहणार आहे. अर्थात आयरिस स्कॅनची सुविधा असलेला फोन बाजारात उपलब्ध झाला नाही तरी व्हिवो, झेटई या कंपन्या त्यांच्या नव्या फोनमध्ये या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.

 

– नीरज पंडित

niraj.pandit@expressindia.com

First Published on December 13, 2016 12:27 am

Web Title: smart research in mobile phones
Next Stories
1 विमानांची अचूक स्थिती
2  ‘अ‍ॅप’ले डाऊनलोड!
3 अस्सं कस्सं? : हसता हुआ नूरानी चेहरा..
Just Now!
X