सामान्यत: युद्धपट किंवा मिलिटरी ऑपरेशन्सवर आधारित लघुपटांमध्ये अनेकदा दिसणारं एक दृश्य म्हणजे रात्रीच्या वेळी जवान डोळ्यांवर एक गॉगल लावून मिशनवर जाणार. रात्रीच्या वेळेस किंवा अंधाऱ्या ठिकाणीही शत्रू किंवा स्फोटकं नीट दिसावीत यासाठी हा नाइट व्हिजनची सुविधा असणारा गॉगल वापरला जातो. फक्त सैन्यातच नाही तर अनेकदा वन्यजीवांबाबतच्या अभ्यासपटांमध्येही अशा प्रकारच्या नाइट व्हिजनचा वापर केला जातो. स्मार्टफोनच्या कॅमेरालाही आजकाल नाइट व्हिजनचं फीचर उपलब्ध झालेलं आहे. फ्लर वनसारख्या गॅजेट्सच्या वापराने स्मार्टफोनचा कॅमेराही नाइट व्हिजनची सोय करून देऊ  शकतो.

मुळातच या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याची कार्यपद्धती रंजक आहे. नाइट व्हिजनविषयीची माहिती बघण्याआधी इन्फ्रारेड लाइटविषयी थोडक्यात जाणून घेणं गरजेचं आहे. इन्फारेड लाइट हा तीन प्रकारांमध्ये विभागता येऊ  शकतो. नीअर इन्फ्रारेड म्हणजेच दृश्यमान प्रकाशाच्या जवळची (लाइट स्पेक्ट्रम किंवा प्रकाश वर्णपंक्तीमध्ये) वेव्हलेन्थ असणारे किरण. मिड इन्फ्रारेड हा त्यापुढील वेव्हलेन्थ असणारऱ्या किरणांचा एक वर्ग. रिमोट कंट्रोल्समध्ये नीअर आणि मिड इन्फ्रारेडचा वापर केला जातो. मात्र इन्फ्रारेड वर्णपंक्तीमध्ये सर्वाधिक जागा व्यापलेली आहे ती थर्मल इन्फ्रारेडने. थर्मल इन्फ्रारेड आणि इतर दोन प्रकारांमध्ये एक मोठा फरक आहे. थर्मल इन्फ्रारेड हा वस्तू किंवा शरीरामधून बाहेर फेकला जातो. इतर दोन प्रकार हे वस्तूवरून परावर्तित होतात. वस्तू किंवा शरीरामध्ये होणाऱ्या अणुपातळीवरील घडामोडींमुळे हे होत असतं. हे प्रकरण जरा क्लिष्ट आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर शरीर किंवा वस्तूमधून इन्फ्रारेड एमिशन होत असतं. आणि नेमका ह्याचाच वापर नाइट व्हिजनसाठी केला जातो.

ह्या प्रकाराला थर्मल इमेजिंग म्हणतात. एक विशिष्ट प्रकारची लेन्स ही वस्तूमधून बाहेर फेकल्या जाणाऱ्या इन्फ्रारेड लाइटवर लक्ष केंद्रित करते. इन्फ्रारेड डिटेक्टरच्या माध्यमातून हा इन्फ्रारेड लाइट स्कॅन केला जातो आणि त्यावरून इमेज तयार केली जाते. या प्रकाराला थर्मल इमेजिंग म्हणतात. थर्मल इमेजिंग डिव्हाइसेस हे -२० ते दोन हजार डिग्रीपर्यंतच्या तापमानातील वस्तू कॅप्चर करू शकतात.

मात्र बहुतांश नाइट व्हिजन कॅमेरा किंवा इतर उपकरणांमध्ये वापरले जाते ते इमेज एनफान्सिंग तंत्रज्ञान आणि ते वापरणाऱ्या उपकरणांना नाइट व्हिजन डिव्हाइसेस किंवा एनव्हीडी म्हटलं जातं. यामध्ये नीअर इन्फ्रारेडचा उपयोग केला जातो. सामान्य लेन्समधून उपलब्ध प्रकाश आणि नीअर इन्फ्रारेड प्रकाश कॅप्चर केला जातो आणि तो एनव्हीडीकडे पाठवला जातो. त्यावर प्रक्रिया करून समोरचं दृश्य हे मॉनिटरवर दाखवलं जातं.

सैन्याच्या वापरासाठीच मुळात नाइट व्हिजनचा शोध लावण्यात आला होता. मात्र त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यानंतर इतरही क्षेत्रांमध्ये त्याचा वापर आणि वावर वाढू लागला. सध्याच्या घडीला व्हिडीओ किंवा डीएसएलआरच नाही तर स्मार्टफोन्ससाठीही नाइट व्हिजन उपकरणे उपलब्ध झाली आहेत. फ्लर, स्नूपरस्कोपसारख्या कंपन्यांकडून छोटेखानी नाइट व्हिजन लेन्स ई-कॉमर्स वेबसाइट्सवर सहज उपलब्ध आहेत. मोबाइलच्या कॅमेराला ह्या लेन्स लावून नाइट व्हिजनचा वापर करता येऊ  शकतो. काही उपकरणं ही यूएसबीसारखी स्मार्टफोनला जोडायची असतात. अँड्रॉइड तसंच अ‍ॅपल फोन अशा दोन्हीसाठी ही उपकरणं वापरता येऊ  शकतात. त्यामुळे जंगलसफारीवर जाताना रात्रीच्या वेळेस वन्यप्राण्यांच्या हालचाली स्मार्टफोन्सवर टिपता येऊ  शकतात. अर्थात ही उपकरणं सध्याच्या घडीला तरी जरा महागडी आहेत.

पुष्कर सामंत -pushkar.samant@gmail.com


‘जीमेल’वरील ‘व्हिडीओ’ आता थेट दिसणार

जीमेलवरून पाठवण्यात येणाऱ्या ‘अ‍ॅटेचमेंट’ची क्षमता आता ५० एमबी करण्यात आल्याने वापरकर्त्यांना ‘इनबॉक्स’मध्ये येणाऱ्या ईमेलमधील व्हिडीओ डाऊनलोड न करता थेट पाहणे शक्य होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत एखाद्या ई-मेलद्वारे आलेला व्हिडीओ डाऊनलोड करताना वापरकर्त्यांचा खर्च होणारा वेळ आणि डेटा वाचणार आहे. या सुविधेमुळे वापरकर्त्यांच्या संगणक किंवा लॅपटॉपवरील स्टोअरेज क्षमतेवर ताण पडणार नाही. येत्या काही आठवडय़ांत ही सुविधा जीमेलच्या करोडो वापरकर्त्यांना उपलब्ध होईल.

या सुविधेअंतर्गत ई-मेलमधून आलेल्या ‘व्हिडीओ अ‍ॅटॅचमेंट’ची संक्षेप प्रतिमा दिसल्यावर त्यावर डबल क्लिक करताच संबंधित ‘व्हिडीओ’ प्ले होईल. विशेष म्हणजे, या व्हिडीओचा वेग, आवाजाची मर्यादा बदलणेही वापरकर्त्यांना शक्य होईल. शिवाय ‘क्रोमकास्ट’वरदेखील हा व्हिडीओ पाहणे आता शक्य होणार आहे. व्हिडीओची लांबी ही ५० एमबी एवढीच मर्यादित असल्यामुळे उच्च दर्जाचा व्हिडीओ पाहणे शक्य नसून केवळ स्मार्टफोनच्या माध्यमातून पाठवलेला व्हिडीओ पाहता येणार आहे. शिवाय उच्च दर्जाच्या व्हिडीओसाठी गुगल ड्राइव्ह ही सुविधा यापूर्वीच देण्यात आलेली आहे.