सध्याच्या काळात स्मार्टफोन ही सर्वात मोठी गरज होत चालला आहे. दूरध्वनी संभाषणापासून ई-मेलपर्यंत, बँकिंग व्यवहारांपासून मनोरंजनापर्यंत आणि गेमिंगपासून कार्यालयीन कामकाजापर्यंत अनेक गोष्टींत स्मार्टफोन आपल्याला उपयोगी ठरत असतो. परंतु, प्रत्येक स्मार्टफोनला जाणवणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे त्याची लवकर संपणारी बॅटरी. स्मार्टफोनची बॅटरी जोपर्यंत व्यवस्थित असते, तोपर्यंत तो अतिशय चपळपणे सर्व कामे करीत असतो. पण जसजशी बॅटरी उतरत जाते. तसतशी आपली घालमेल सुरू होते. सर्वसाधारणपणे नियमितपणे वापरात असलेला स्मार्टफोन दिवसातून दोनदा तरी चार्जिग करावा लागतो. स्मार्टफोनच्या बॅटरीच्या या मर्यादा पाहून अनेक कंपन्या जास्त बॅटरी क्षमता असलेले स्मार्टफोन बाजारात आणत आहे. मात्र, स्मार्टफोन वापरकर्त्यांची तो वापरण्याची हौस आणि स्मार्टफोनची ऊर्जाभूक भागता भागत नाही. त्यामुळे कितीही जास्त बॅटरीक्षमता असलेला स्मार्टफोन घेतला तरी बॅटरीची समस्या कायम असते.
विशेषत: प्रवासात असताना आपल्याला ही समस्या अधिक गंभीरपणे जाणवते. एखाद्या अनोळखी ठिकाणी दिशादर्शनासाठी स्मार्टफोनवरील ‘गुगल मॅप’चा आधार घेत असताना अचानक मोबाइलची बॅटरी डाउन झाली की आपण अस्वस्थ होऊन जातो. किंवा एखाद्या डोंगराळ भागात ट्रेकिंगवर असताना समोरील निसर्गरम्य वातावरण कॅमेऱ्यात टिपण्याची वेळ येते, तेव्हा नेमकी त्याची बॅटरी डाउन झालेली असते. अशा वेळी चार्जिग करण्याची संधीच नसते आणि पर्यायाने आपल्याला अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र, तंत्रज्ञानाने अशा परिस्थितीवरही तोडगा काढला आहे. तुम्ही प्रवासादरम्यान कुठेही असलात तरी स्मार्टफोन, कॅमेरा इतकेच नव्हे तर लॅपटॉप किंवा टॅब्लेट पूर्णपणे चार्ज ठेवण्याची जबाबदारी तुमची बॅग घेते. ही बॅग साधीसुधी बॅग नसून ‘सोलार पॉवर्ड’ म्हणजे सौरऊर्जा साठवून तिचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणारी आहे. त्यामुळे तुम्ही कितीही दुर्गम भागात असला तरी तुमचा फोन वा कॅमेरा व्यवस्थितपणे तग धरू शकतो. अशा बॅगना ‘सोलर पॉवर्ड बॅकपॅक’ असे म्हणतात. अशा बॅगा ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
काम कसे चालते?
‘सोलर बॅकपॅक’ ही एक सर्वसामान्य बॅगांसारखी कापडी बॅग असते. या बॅगेच्या पुढच्या भागात अतिशय पातळ ‘फिल्म सोलर सेल्स आणि बॅटरी’ बसवण्यात आलेल्या असतात. तुम्ही या बॅगा घेऊन उन्हातून जाता तेव्हा या ‘सेल्स’ सौरऊर्जा शोषून घेतात आणि बॅगेतील ‘सोलर पॅनेल’ या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. ही विद्युत ऊर्जा पोर्टेबल बॅटरींमध्ये साठवली जाते. ती आपल्या गरजेनुसार स्मार्टफोन, कॅमेरा किंवा अन्य विद्युत उपकरणांसाठी वापरता येते. या बॅटरीची क्षमता १० हजार पासून अधिक एमएएच इतकी असते. बाजारात विविध प्रकारच्या बॅगा उपलब्ध आहेत. बॅटरी क्षमता, आकार, डिझाइन यानुसार त्यांच्या किमतीत बदल होतो. पण बहुतांश बॅगा ‘वॉटरप्रूफ’ असतात. त्यामुळे या बॅगांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व्यवस्थित राहतात. तसेच विविध उपकरणे चार्ज करण्यासाठी या बॅगेत अ‍ॅडॉप्टरची सुविधाही पुरवण्यात आली आहे.

फायदे
अशा बॅकपॅकचे फायदे वेगळय़ाने सांगण्याची गरज नाही. मात्र, या बॅगांचा सर्वाधिक फायदा ट्रेकर्स किंवा बाइकर्सना होऊ शकतो. विजेची सुविधा नसलेल्या भागांतही त्यांना आपली उपकरणे पूर्णपणे चार्ज ठेवता येतात. शिवाय या बॅगांमध्ये उपकरणे व्यवस्थित राहतात. दुसरं म्हणजे, या बॅगा सौरऊर्जेचे रूपांत विद्युत ऊर्जेत करत असल्याने ऊर्जेच्या अपारंपरिक स्रोत सहजपणे वापरात येतो आणि पारंपरिक ऊर्जेची बचत होते. सध्याच्या कडाक्याच्या उन्हाचा हंगाम पाहिला तर अशा बॅगा कार्यालये किंवा महाविद्यालयांसाठी वापरण्यासही हरकत नाही.
किंमत
भारतीय बाजारात अजूनही या बॅगा सर्वत्र उपलब्ध झालेल्या नाहीत. मात्र अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ई-कॉमर्स संकेतस्थळांवर या बॅगा विक्रीस उपलब्ध आहेत. छोटय़ा ‘स्लिंग’ बॅगांपासून मोठय़ा ‘ट्रॅव्हल’ बॅगांपर्यंतच्या आकारात सोलर बॅग उपलब्ध आहेत. स्लिंग बॅगांची सरासरी किंमत दीड ते दोन हजारांच्या आसपास आहे. मात्र मोठय़ा आणि जास्त बॅटरी क्षमता असलेल्या बॅगा जवळपास १५ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या आहेत.

 

– आसिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com