मोबाइलच्या विविधांगी संशोधनाचे सादरीकरण करण्यासाठी आयोजित करण्यात येणारी जागतिक मोबाइल परिषद नुकतीच पार पडली. यापूर्वीच्या सर्व परिषदांमध्ये कंपन्या आपण मोबाइलमध्ये काय संशोधन करतो आहोत याचे सादरीकरण करत असे. मात्र  या परिषदेचे वैशिष्टय़ म्हणजे यंदा प्रथमच या परिषदेत मोबाइलऐवजी मोबाइलला पूरक तंत्रज्ञानावर जास्त भर होता. यामुळे यंदाच्या परिषदेत बॅटरीज, आभासी विश्व, इंटरनेटधारित उपकरणे आदीचे सादरीकरण झाले. पाहू या यंदाच्या परिषदेचे खास आकर्षण.

जास्त काळ बॅटरी आणि जलद चार्जिग

या परिषदेत विविध कंपन्यांनी सादर केलेल्या स्मार्टफोनमध्ये एक समान सूत्र होते. ते म्हणजे प्रत्येक कंपनीने जास्त काळ चालणारी बॅटरी आणि जलद चार्जिगचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. अ‍ॅपल आणि सॅमसंग या दोन बडय़ा मोबाइल उत्पादन कंपन्यांनंतर तिसऱ्या स्थानावर असलेल्या ह्य़ुवाई या कंपनीने नव्या पी 10 या फोनमध्ये बॅटरीची क्षमात ४० टक्क्यांनी वाढविल्याचे नमूद केले. तर हा फोन अवघ्या २० मिनिटांत पूर्ण चार्ज करण्यासाठीचे ‘सुपर चार्ज’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. तर ब्लॅकबेरी या कंपनीनेही कंपनीचे वैशिष्टय़ असलेल्या की-बोर्डसह नवीन फोन परिषदेत सादर केला. या फोनमध्ये कंपनीने आजपर्यंत दिलेल्या सर्व फोनच्या तुलनेत सर्वाधिक बॅटरी उपलब्ध करून दिली आहे. हा फोन अवघ्या ३६ मिनिटांत चार्जिग करण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे.

ड्रोन्स आणि रोबो

यंदा प्रथमच या परिषदेमध्ये ड्रोन्ससाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. यामध्ये ई-व्यापार संकेतस्थळांसाठी सामान पोहोचविणाऱ्या ड्रोन्सपासून ते शेतावर नजर ठेवणाऱ्या ड्रोन्सपर्यंत विविध ड्रोन्सचे सादरीकरण करण्यात आले. कॅमेरा बसविलेला ड्रोन शेतावरून फिरत असताना शेतकऱ्याला घरबसल्या शेतावर नजर ठेवता येते. याचबरोबर पिकाची वाढ किती झाली हेही पाहता येते. अशा ड्रोन्सच्या वापराचे प्रयोग अमेरिकेत सुरू आहेत. तर विविध दुकानांना आणि कंपन्यांना त्यांची उत्पादने अतिदुर्गम भागात पोहोचविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोनचाही प्रदर्शनात समावेश करण्यात आला होता. हे ड्रोन्स मोबाइलवरून नियंत्रित करता येतात. याचबरोबर मोबाइलवर नियंत्रण असलेले रोबोही प्रदर्शनात आकर्षण ठरत होते. कोरियातील दूरसंचार कंपनीने दिवसभर गाणी वाजविणारे रोबो उभे केले होते. तर सॉफ्टबँक या जापनीज कंपनीने त्यांच्या उत्पादनांची माहिती देण्यासाठी रोबो उभे केले होते. हे रोबो ग्राहकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देत याचबरोबर विविध उत्पादनांचे सादरीकरणही करून दाखवत होते.

आभासी वास्तव

सध्या जग आभासी वास्तवात अधिक रमू लागले आहेत. याचे पडसाद या परिषदेतही उमटले. सॅमसंग या कंपनीने या क्षेत्रात विविध संशोधनाचे सादरीकरण केले. यात सर्वाधिक आकर्षणाचा विषय ठरले ते ३६० डीग्री आभासी प्रवासी अ‍ॅप. या अ‍ॅपमध्ये पर्यटकाला तो ज्या ठिकाणी जाणे पसंत करत आहे त्या ठिकाणाचा सर्व तपशील उपलब्ध होतो तसेच त्या ठिकाणी आपण गेलो आहोत असा आभासही निर्माण करून दिला जातो. याचबरोबर लिथुएनीयन मोबाइल अ‍ॅप विकसित करणाऱ्या कंपनीने आभासी वास्तव तंत्रज्ञानाच्या मदतीने जगभरातील लोकांना व्यावसायिक सभा कशा प्रकारे घेता येईल या अ‍ॅपचे सादरीकरण केले.

आभासी साहाय्यक

अ‍ॅमेझॉन डॉट कॉम या कंपनीने बाजारात आणलेल्या इको या आभासी साहाय्यक एलेक्सा तंत्रज्ञानावर आधारित हॅण्ड्सफ्री स्पीकरच्या यशानंतर बहुतांश कंपन्यांनी त्यांचे या क्षेत्रातील संशोधन परिषदेत मांडले. यात सोनी या कंपनीने एक्स्पेरिया इअरफोनचे सादरीकरण केले ज्याला सोनी एजंट असे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून आभासी साहाय्यक आपल्या आवडीनुसार गाणी प्ले करण्याचे काम करतो. म्हणजे जर आपण प्रवास करत असताना पाऊस सुरू झाला तर आपल्या मोबाइलमधील किंवा मोबाइल इंटरनेटशी जोडला असेल तर ऑनलाइन सर्च करून पावसाचे गाणे वाजविले जाते. याचबरोबर एलजी, मोटोरोल या कंपन्यांनीही अशाच प्रकारच्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. सॅमसंगने अशा प्रकारचे तंत्रज्ञान असलेल्या फोनचे सादरीकरण केले. हा फोन या महिन्याअखेर न्यूयॉर्कमध्ये उपलब्ध होणार आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या गार्नर या कंपनीने २०१९ पर्यंत २० टक्के संवाद हा अशाच प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

स्मार्ट टूथब्रश

या प्रदर्शनात इंटरनेट ऑफ थिंग्जवर विशेष भर होता. अनेक कंपन्यांनी चालकरहित गाडय़ांचे सादरीकरण केले. तर कोलीब्री या फ्रान्समधील कंपनीने स्मार्ट टूथब्रशचे सादरीकरण केले. आपण या ब्रशने दात घासल्यानंतर आपण किती स्वच्छ दात घासले याचा एक छोटेखानी तपशील आपल्याला मिळतो. इतकेच नव्हे तर विविध वेळी दात घासल्यानंतर तयार झालेला तपशील तुलनात्मकरीत्या आपल्या स्मार्टफोनवर उपलब्ध करून देण्याची सुविधाही यामध्ये आहे. तर भारतीय स्टार्टअप ‘लेचल’ या कंपनीनेही जीपीएस ट्रॅकर असलेले बूट सादर केले. आपण मोबाइलमध्ये आपल्याला कुठे जायचे याचे ठिकाण नकाशावर निश्चित केले की ते ठिकाण आल्यावर बूट व्हायब्रेट होतात व आपल्याला ठिकाण आल्याची सूचना करतात. यामुळे रस्ता शोधत असताना मोबाइल डोळ्यासमोर ठेवण्याची आवश्यकता राहात नाही.

नीरज पंडित – nirajcpandit

 Niraj.pandit@expressindia.com