आय.आय.टी.सारख्या संस्थांमधून शिक्षण घेण्यासाठी लक्षावधी बुद्धिमान मुले आपल्या जिवाचे रान करीत असतात. दुसऱ्या बाजूला देशभरामध्ये हजारोंच्या संख्येने इंजिनीअरिंग कॉलेजेस निघालेली आहेत. यातील अनेक संस्थांमध्ये योग्य गुणवत्तेचे प्रशिक्षण अभावानेच मिळते. चांगल्या संस्थांमधील दर्जेदार प्राध्यापकांचे ज्ञान देशातील सर्व अभ्यासू मुलांपर्यंत तंत्रज्ञानाद्वारे पोहोचवता येईल काय?
आय.आय.टी. मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मद्रास आणि रुरकी या सात भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि भारतीय विज्ञान संस्था बंगलोर यांनी संघटित होऊन नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्सड लर्निग (एनपीटीईएल) हे प्रोजेक्ट सुरू केलेले आहे. याला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे अर्थसाहाय्य लाभले आहे.
या प्रोजेक्टच्या अंतर्गत अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि मानवविज्ञान यांसारख्या विविध शाखांवरील ऑनलाइन वेब आणि व्हिडीओ कोर्सेस उपलब्ध आहेत. प्रत्येक कोर्समध्ये अंदाजे एक तासाची चाळीस व्हिडीओ लेक्चर्स आहेत. ज्ञानाचा हा सर्व खजिना सर्वाना विनामूल्य उपलब्ध आहे.
आजचे आपले अ‍ॅप हे अँड्रॉइड स्मार्टफोनवर एनपीटीईएलची सर्व व्हिडीओ लेक्चर्स पाहण्यासाठी आणि संस्थेने तयार केलेले विशेष कोर्सेस करण्यासाठी उपयुक्त आहे. गुगल अ‍ॅप स्टोअरवर गेल्यास तुम्हाला ठढळएछ या नावाने विविध अ‍ॅप्स दिसतील. त्यापैकी NPTEL All (https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.zoz.free.nptelalllinks&hl=en) हे अ‍ॅप तुम्हाला संस्थेच्या सर्व कोर्सेससाठी लिंक उपलब्ध करून देते. सध्या या अ‍ॅपद्वारे बाराशेहून अधिक कोर्सेसच्या लिंक्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये वीसपेक्षा जास्त शाखांचा समावेश आहे. उदाहरणादाखल, एअरोस्पेस, ऑटोमोबाइल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, टेक्स्टाइल इंजिनीअरिंग इत्यादी. तुम्हाला हव्या त्या शाखेची निवड केल्यावर हे अ‍ॅप तुम्हाला यूटय़ुबवर घेऊन जाते. तेथे तुम्हाला त्या शाखेतील विविध विषयांवरील लेक्चर्सची प्ले लिस्ट बघायला मिळते.
ही लेक्चर्स तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायची असल्यास तसेच सरावासाठी असाइनमेंट्स सोडवून बघायच्या असल्यास एनपीटीईएल च्या http://nptel.ac.in/ या साइटला तुम्ही भेट देऊ शकता.
तसेच या साइटवर तुम्हाला लिखित स्वरूपातील लेक्चर्स पीडीएफ फॉरमॅटमध्ये मिळतील.
ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयातला पूर्ण चाळीस तासांचा कोर्स करायचा नसेल त्यांच्यासाठी विशिष्ट विषयांमधील छोटे कोर्सेसही उपलब्ध आहेत. ठढळएछ द्वारे घोषित केलेल्या सर्व कोर्सेसची संपूर्ण माहिती या साइटवर दिलेली आहे. येथे विनामूल्य नावनोंदणी करता येते. काही कोर्सेससाठी सर्टिफिकेशनदेखील उपलब्ध आहे. त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला रजिस्टर करून परीक्षेची नाममात्र रक्कम भरावी लागते.
ठढळएछ या उपक्रमाचा आवाका खूपच मोठा आहे. त्यातील आपल्याला हव्या त्या कोर्सपर्यंत चटकन जाऊन लेक्चर ऐकण्यासाठी हे अ‍ॅप तुम्हाला उपयोगी होईल. जिज्ञासूंनी त्याचा लाभ करून घ्यावा.
आय.आय.टी.सारख्या संस्थांमधून शिक्षण घेण्यासाठी लक्षावधी बुद्धिमान मुले आपल्या जिवाचे रान करीत असतात.
मनाली रानडे manaliranade84@gmail.com