मला टीव्ही घ्यायचा आहे. तर मी फोर के किंवा फुल एचडीपैकी कोणता घेऊ यामध्ये मी गोंधळलो आहे. तर यापैकी कोणता घ्यावा.

 – मोहन सावंत, माणगांव

यामध्ये तुम्ही फोर केचा टीव्ही घ्यावा. कारण फुल एचडी आणि फोर केमध्ये पिक्सेलचा खूप जास्त फरक आहे. यामुळे तुम्हाला चित्रांचा दर्जा फोर केमध्ये अधिक चांगला मिळू शकतो. फुल एचडीमध्ये 1920 बाय 1080 पिक्सेलचे रिझोल्युशन असते तर हेच रिझोल्युशन फोर केमध्ये 4000 बाय 2160 पिक्सेलचे मिळते. जेवढे पिक्सेल जास्त तेवढा चित्रांचा दर्जा चांगला असतो. यामुळे फोर केचा टीव्ही घेणे केव्हाही फायद्याचे ठरू शकते.

मोबाइलवरून रेल्वेचे आरक्षण करायचे असेल तर कोणते अ‍ॅप उपयुक्त आहे.

– दिनेश जोगळेकर, कर्जत

रेल्वेने प्रवास करावयाचा असेल तर सर्व जण आयआरसीटीसी या रेल्वेच्या अधिकृत आरक्षण नोंदणी संकेतस्थळाला भेट देतात. या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे काळानुरूप बदल करत रेल्वेने याचे अ‍ॅपही बाजारात आणले. हे अ‍ॅप आरक्षण करण्यासाठीचा वेळ काही प्रमाणात कमी करते. यामुळे लोक या अ‍ॅपला पसंती देऊ लागले आहेत. याशिवाय या अ‍ॅपवर आयआरसीटीसीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या सहलींची माहितीही उपलब्ध करून दिली जाते. याचबरोबर अ‍ॅपद्वारे विमान व हॉटेलचे आरक्षण करणेही शक्य होते.