नववर्षांचे स्वागत झाल्यानंतरच्या सोमवारी नियमित कामाला सुरुवात झाली. पण या नियमित कामात हे नवीन वर्ष आपल्यासाठी काय घेऊन येणार. या वर्षांत विविध क्षेत्रांना काय मिळणार याचा ‘गुगल शोध’ मात्र वाढला. अर्थात यामध्ये नवीन वर्षांचे भविष्य काय आहे याचा शोध आघाडीवर असला तरी नव्या वर्षांत आपल्यासाठी कोणते नवतंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे याबाबतही लोकांना मोठय़ा प्रमाणावर उत्सुकता आहे. येत्या वर्षांत आपल्या खिशात रमणारा फोन अधिक स्मार्ट होणार असून हा फोन आपल्यासाठी नेमके काय घेऊन येणार आहे हे पाहुयात.

आयफोन 8

a   स्मार्टफोनमधील ‘दादा’ फोन अशी विशेष ओळख असलेल्या अ‍ॅपलच्या आयफोनची आठवी आवृत्ती बाजारात येणार आहे. अर्थात नेहमीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात हा फोन जागतिक बाजारपेठेत दाखल होणार असून त्यानंतरच्या एक ते दोन महिन्यांत तो भारतीय बाजारात दाखल होणार आहे. यावेळेस अ‍ॅपलचा आयफोन 8 व आयफोन 8 प्लस हा बाजारात दाखल होणार आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात अ‍ॅपलचा दहावा वाढदिवस असणार आहे. यामुळे या फोनमध्ये खास काहीतरी दिले जाईल अशी अपेक्षा तंत्रप्रेमी आणि विशेषत: अ‍ॅपलप्रेमींना आहे. आयफोन 8 हा पूर्णत: काचेचा असेल अशी बित्तंबातमी अ‍ॅपलच्या सूत्रांकडून मिळत आहे. या फोनचा स्क्रीन हा पुढच्या बाजूस सर्व कोपऱ्यांपर्यंत असणार आहे. यामुळे आयफोनची विशेष ओळख असलेले ‘होम’ बटनही बाद होणार असून ते या काचेच्या स्क्रीनमध्येच समाविष्ट केले जाणार आहे. तसेच या फोनला अ‍ॅपलचा ए 11 हा प्रोसेसर वापरण्यात येणार असून एक सहप्रोसेसर देण्यात येणार आहे. तसेच यात वायररहित चार्जिग आणि बायोमेट्रिक फीचर्स देण्यात येणार असल्याचे वृत्तही सूत्रांनी दिले. यामुळे या वर्षांतील अ‍ॅपल भेट ही विशेष असेल अशी अपेक्षा आहे.

एचटीसी 11

cमोबाइलमध्ये सर्वोत्तम हार्डवेअर देण़्ाारी कंपनी म्हणून ओळख असलेल्या एचटीसी या कंपनीने या वर्षांत एचटीसी 11 हा फोन बाजारात आणण्याची तयारी सुरू केली आहे. खरे तर २०१६मध्ये पार पडलेल्या जागतिक मोबाइल परिषदेमध्ये एचटीसीने एचटीसी 10चे अनावरण करत या फोनविषयी वाच्यता केली होती. या नव्या फोनमध्ये अधिक जलद प्रोसेसर, जास्त क्षमतेची रॅम आणि अधिक बॅटरी क्षमता असणार आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर, आठ जीबी रॅम देण्यात येणार आहे. तसेच या फोनमध्ये उच्च क्षमतेची बॅटरी देण्यात येणार असून त्यात क्विकचार्जचा पर्याय देण्यात येणार आहे. यामुळे चौपट वेगाने बॅटरी चार्ज होणे शक्य होणार आहे. फोनमध्ये ५.५ क्वाड एचडी स्क्रीन देण्यात येणार आहे. हे सर्व उच्च क्षमतेचे हार्डवेअर असले तरी यामध्ये देण्यात आलेली अंतर्गत साठवणूक क्षमता ही कमी असण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास हा फोन बाजारात फार चांगली कमाई करू शकणार नाही.

सॅमसंग नोट 8 आणि गॅलेक्सी 8

सॅमसंगप्रेमींसाठी या वर्षांतील विशेष आकर्षण असणार आहे ते नोट 8 चे. २०१६मध्ये नोट7च्या अपयशानंतर सॅमसंगबाबत मोठय़ा प्रमाणावर कुजबूज सुरू झाली. याचबरोबर नोट7च्या अपयशानंतर कंपनीच्या नावालाही धक्का बसला आहे. ही कुजबूज थांबविण्यासाठी सॅमसंगने चंग बांधला असून नोट8 हा फोन येत्या ऑगस्टमध्ये बाजारात दाखल करण्यात येणार आहे. या फोनमध्ये एस पेन आणि अधिक चांगल्या क्षमतेचा प्रोसेसर व रॅम देण्यात येणार आहे. आभासी विश्वात रमविणारा हा फोन असून यामध्ये द्वैकॅमेरा असणार आहे. तसेच हा फोन जलरोधकही असणार आहे. तर याच वर्षांत कंपनीचे गॅलेक्सी एस8 आणि एस8 प्लस हे फोनही बाजारात दाखल होणार आहेत. यात सर्वोच्च असा प्रोसेसर व सहा जीबी किंवा आठ जीबी रॅम देण्यात येणार असल्याचे समजते.

एलजी जी6

bआपल्या ठोकळेबाज मॉडय़ुलर रचनेला बगल देता आता सॅमसंग गॅलक्सी एस मालिकेतील फोनप्रमाणे काचेचा डिस्प्ले देण्यावर भर देणार असल्याचे सूत्रांकडून समजते. इतरवेळी बॅटरीच्या बाबतीत सॅमसंग या प्रतिस्पर्धीसोबत उजवे ठरणाऱ्या एलजीमध्ये या वर्षी दाखल होणाऱ्या जी6 या फोनमध्ये प्रोसेसर आणि ग्राफिक कार्ड हे अधिक क्षमतेचे वापरण्यात येणार आहे. यामुळे हा फोन आभासी वास्तवात रमवण्याची क्षमता असलेला ठरणार आहे. याचबरोबर या फोनमध्ये नवीन प्रकारचे आयरिस स्कॅनर वापरण्यात येणार आहे. जे फ्रंट कॅमेऱ्यामध्ये देण्यात येणार आहे. आहे त्या जागेत जास्तीत जास्त सुविधा देत असताना एका तंत्रज्ञानाबरोबर दुसरे तंत्रज्ञान जोडले जाणार आहे. यामध्ये कमी खर्चात चांगली सुविधा देता येणे शक्य होणार आहे. यासाठी एका विशेष गाळणी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

मायक्रोसॉफ्ट सरफेस फोन

dमायक्रोसॉफ्टने नोकिया कंपनी खरेदी करून स्मार्टफोनच्या उत्पादनात उडी घेतली आहे. यानंतर अनेक फोन बाजारात आले. मात्र अँड्रॉइडवर सरावलेल्या हातांना विंडोजची खेळी काही जमेना. मग कंपनीने अँड्रॉइडचा काही भागही फोनमध्ये आणला. मात्र संगणक बाजाराएवढे यश फोन बाजारात मिळू शकले नाही. मात्र विंडोजप्रेमी लोकांनी या फोनचा पर्याय स्वीकारत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संगणकीय मोबाइलीकरणाचा अनुभव घेतला. याच मालिकेत आता सरफेस फोन दाखल होणार आहे. या फोनच्या नमुन्यावर प्रयोग सुरू असून ते लवकरच अंतिम होतील आणि हा फोन या वर्षांत भारतीय बाजारात दाखल होईल असे सूत्रांकडून समजते. या फोनमध्ये ५.५ इंचाचा क्वाड एचडी एएमओएलईडी डिस्प्ले, चार जीबी रॅम, ६४ आणि १२८ जीबीची साठवणूक क्षमता असलेले पर्याय. ६४ बिटचा इंटेल प्रोसेसर आणि २१ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा व आठ मेगापिक्सेलचा फंट्र कॅमेरा देण्यात येणार असल्याचे समजते. याबरोबर सरफेस पेन आणि यूएसबी सी पोर्टही मिळणार आहे.

नीरज पंडित – nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com