श्रावण महिन्याला सुरुवात होताच सण-उत्सवांचे वेध लागू लागतात. उत्सवांचा हा उत्साही माहोल अगदी दिवाळी संपेपर्यंत कायम असतो. अशा हंगामात खरेदीला जोर येतो. याचाच फायदा घेऊन अनेक कंपन्या, ईकॉमर्स संकेतस्थळे, शॉपिंग मॉल आपल्याकडील खरेदीवर ग्राहकांना भरमसाट ‘कॅशबॅक’ जाहीर करतात. ‘कॅशबॅक’चा शब्दश: अर्थ ‘रोकड परतावा’ असा आहे. साहजिकच आपण केलेल्या खरेदीवर ठरावीक रक्कम परत मिळणार, या आशेने ग्राहक आणखी उत्साहात खरेदी करतात; परंतु जेव्हा ‘कॅशबॅक’चे कूपन त्यांच्या हाती पडते, तेव्हा बहुतांश ग्राहकांच्या पदरी निराशा येते. कारण ‘कॅशबॅक’च्या आमिषापोटी त्यांनी ज्या उत्साहात खरेदी केलेली असते, तो उत्साहच ‘कॅशबॅक’च्या अटी-शर्ती वाचून गळून पडतो. अशी वेळ बहुतांश ग्राहकांवर ओढवते. त्यामुळेच ‘कॅशबॅक’चं मिथक समजून घेणं आवश्यक आहे.

‘कॅशबॅक’ म्हणजे काय?

‘कॅशबॅक’ हे बाजारपेठेने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि खरेदीला आणखी प्रोत्साहित करण्यासाठी आणलेल्या योजनेचं गोंडस नाव आहे. या योजनेंतर्गत एखाद्या दुकानात किंवा ऑनलाइन खरेदीवर ५-१० टक्क्यांपासून २ हजार, तीन हजार रुपयांपर्यंत ‘कॅशबॅक’ जाहीर केली जाते. ही जाहिरात पाहून, वाचून ग्राहक दुकानाकडे आकर्षित होतो. तेथे त्याला ठरावीक रकमेच्या किंवा ठरावीक वस्तूंच्या खरेदीवर ही ‘कॅशबॅक’ लागू असल्याचे सांगण्यात येते. ग्राहक त्यानुसार खरेदी करतो, तेव्हा त्याला ‘कॅशबॅक’चे कूपन दिले जाते. प्रत्यक्षात ५ हजार रुपयांची खरेदी केली असेल तर त्यावर दहा टक्के ‘कॅशबॅक’ मिळणार, याचा अर्थ ५०० रुपये आपल्याला परत मिळणार, असा ग्राहकाचा समज असतो. परंतु प्रत्यक्षात ग्राहकाला ५०० रुपयांचे व्हाऊचर दिले जाते. त्यावरील अटी वाचून ग्राहकाला आपण फसलो गेल्याची जाणीव होते.

‘कॅशबॅक’च्या अटी-शर्ती

‘कॅशबॅक’ योजना अनेक अटी-शर्तीनी व्यापलेली असते. यातील काही अटी-शर्ती अशा..

*   ठरावीक दुकान किंवा संकेतस्थळावरून खरेदी करणे आवश्यक.

*   ठरावीक रकमेची खरेदी करणे बंधनकारक.

*   ठरावीक रकमेच्या (प्रामुख्याने जास्त महाग) वस्तूंवरच योजना लागू.

*   विशिष्ट कालावधीत खरेदी न केल्यास ‘कॅशबॅक’ रद्द.

*   अन्य सवलतींसह ‘कॅशबॅक’चा लाभ घेता येणार नाही.

*   ठरावीक बँकांच्या क्रेडिट/ डेबिट कार्डवरील खरेदीवरच ‘कॅशबॅक’ लागू.

*   क्रेडिट कार्डवरील खरेदीवर ‘कॅशबॅक’ मिळेल; परंतु बँकेकडून व्याज लागेल.

अशा अनेक शर्ती घालून दुकानदार किंवा ईकॉमर्स संकेतस्थळे ग्राहकांना ‘कॅशबॅक’च्या नावाखाली फसवणूक करतात. अर्थात ही योजना प्रत्येक वेळी फसवणूक करणारी असतेच असे नाही. परंतु अशा योजनांचा मुख्य हेतू सध्या असलेला माल खपवण्यासोबतच भविष्यात संबंधित ग्राहकाला आपल्या दुकानांतून खरेदी करावी लागेल, याची सोय करणे हा असतो. ग्राहक जेव्हा ‘कॅशबॅक’ची जाहिरात पाहतात, तेव्हा ते या अटी-शर्तीकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत व आपल्या ‘बजेट’पेक्षाही जास्त खरेदी करतात. अनेकदा अनावश्यक वस्तूही खरेदी केल्या जातात. दुसरीकडे, ‘कॅशबॅक’चा वापर करण्यासाठी त्यांना महागडय़ा वस्तू खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे एक प्रकारे ‘कॅशबॅक’च्या माध्यमातून ग्राहकांच्या खिशाला हात घालण्याचे प्रकार केले जातात.

‘कॅशबॅक’ घेताना काय काळजी घ्याल?

* खरेदीला जाताना नेहमी आपले ‘बजेट’ निश्चित करा. तेवढय़ा रकमेच्या खरेदीवरच ‘कॅशबॅक’ मिळणार असल्यास त्या योजनेत सहभागी व्हा. मात्र केवळ ‘कॅशबॅक’साठी खरेदीची मर्यादा वाढवू नका.

* ‘कॅशबॅक’च्या ऐवजी दुकानांतून दिल्या जाणाऱ्या सवलतींचा फायदा घ्या.

* ‘कॅशबॅक’ची निवड करताना, शक्यतो तुम्हाला नेहमी लागणाऱ्या वस्तूंच्या किंवा उत्पादनांच्या खरेदीवर लागू होणाऱ्या योजनेचीच निवड करा. जास्तीत जास्त ठिकाणी लागू असलेल्या ‘कॅशबॅक’ योजनेतच सहभागी व्हा.

* ‘कॅशबॅक’चे व्हाऊचर घेताना त्यावरील मुदत कालावधी नक्की तपासून पाहा. अन्यथा तुम्हाला अल्पावधीतच नव्याने खरेदी करावी लागू शकते.

* ठरावीक डेबिट वा क्रेडिट कार्डाच्या वापरातून ‘कॅशबॅक’ मिळणार असल्यास सर्वप्रथम अशा व्यवहारांवर संबंधित कार्डाच्या बँकेकडून काही शुल्क आकारणी केली जाणार आहे का, याची खातरजमा करून घ्या. अनेकदा बँकाही अशा व्यवहारांवर शुल्क आकारणी करतात.