इंटरनेटचा उदय झाला आणि त्यापाठोपाठ पेव फुटलं ते वेबसाइट्सचं. एक नवीन क्षेत्रच निर्माण झालं. दुकान, कंपनी, लायब्ररी, गेम्स, माहिती, शब्दकोश वगैरे सारे प्रकार वेबसाइट्सच्या माध्यमातून वेगळ्या अवतारात प्रकट झाले. त्यातूनच मग हळूहळू वेबसाइट डेव्हलपमेंटला ओळख मिळाली. सुरुवातीच्या काळात वेब डेव्हलपमेंट हा बराच किचकट प्रकार होता. पण तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच वेबसाइट तयार करणं सोपं होत गेलं. आज अगदी घरबसल्या विनासायास वेबसाइट तयार करणं शक्य झालं आहे. स्वत:चा ईमेल आयडी बनवणं जसं किचकट राहिलेलं नाही तसंच स्वत:ची वेबसाइट तयार करणंही काही कठीण राहिलेलं नाही. पण तशी वेबसाइट बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

मुळात वेबसाइट का बनवायची आहे हे मनात स्पष्ट असू द्या. छोटा बिझनेस असेल आणि अनेकांपर्यंत पोहोचायचं असेल तर वेबसाइटपेक्षा ब्लॉग हे प्रभावी ठरू शकतं. ब्लॉग चालवणं म्हणजे एखादं मासिक चालवल्यासारखं आहे, तर वेबसाइट चालवणं म्हणजे वर्तमानपत्र. समजा तुमचा बिझनेस हा विक्रीसंदर्भात असेल तर जुन्या ग्राहकांना धरून ठेवण्यासाठी सतत काहीतरी बदल करणं आवश्यक असतं. नवीन ग्राहकांना ते माहीत व्हावे म्हणून सतत नवीन आकर्षक गोष्टी ठेवणे आवश्यक आहे. ब्लॉग हा मोफत तयार करता येतो. तसंच आपल्या आवडी-निवडीनुसार त्याचा लुक आपण ठरवू शकतो. वेबसाइट हा प्रकार जरा खर्चीक आहे.

तसंच एकदा लुक ठरला आणि त्यानुसार वेबसाइट तयार केली की त्यानंतर त्यात बदल करणं जरा कठीण जातं.

तुम्हाला जर स्वत:ची वेबसाइट स्वत:च बनवायची असेल तर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे सरळ वेब डेव्हलपमेंट आणि डिझाइनचा कोर्स करा आणि ढासू, परिपूर्ण वेबसाइट बनवा. त्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करण्याची तयारी असेल तर मग काहीच अडचण नाही. पण तसं शक्य नसेल आणि कुणाच्याही मदतीशिवाय स्वत:च वेबसाइट बनवायची असेल तर खालील पायऱ्यांचा अवलंब करा. वेबसाइट बनवण्याआधी एक ईमेल आयडी तयार करायला विसरू नका.

* वेबसाइटचा प्लॅटफॉर्म ठरवा

काही वर्षांपूर्वी वेबसाइट बनवण्यासाठी एचटीएमएल, फ्लॅश वगैरेचा वापर करावा लागायचा. आताही तो होतो. पण पूर्वी ही सगळी प्रक्रिया शिकावी लागायची. आजही

अनेकांना असंच वाटतं की वेबसाइट बनवायची म्हणजे आधी शिका. पण गेल्या काही वर्षांत, खास करून मागल्या वर्षांपासून वर्डप्रेससारख्या कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम (सीएमएस)मुळे वेबसाइट बनवणं सोपं झालं आहे. सीएमएस म्हणजे एक

युजरफ्रेंडली प्लॅटफॉर्म असतो ज्याचा वापर करून वेबसाइट बनवणं आणि त्यावरच कंटेंट मॅनेज करणं शक्य असतं. वर्डप्रेसप्रमाणेच ड्रुपल, जुमला हे प्लॅटफॉम्र्सही लोकप्रिय आहेत, पण वर्डप्रेसचा वापर हा सर्वाधिक आहे.

* डोमेन नेम आणि होस्ट शोधा

प्लॅटफॉर्म ठरल्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोमेन नेम आणि होस्टिंगची शोधाशोध. डोमेन नेम म्हणजे दुसरं-तिसरं काहीही नसून तुमच्या वेबसाइटचं नाव. आपल्याला हवं असलेलं नाव उपलब्ध असेल तर प्रश्नच मिटला, अन्यथा वेबसाइटच्या नावाची जुळवाजुळव करावी लागते. होस्टिंग म्हणजे अशी जागा जिथे तुमची वेबसाइट स्टोअर होते, त्यावरचा डेटा सेव्ह असतो आणि त्या होस्ट सव्‍‌र्हरवरून तो वेबसाइट युजर्सशी संवाद साधतो. या दोन्ही गोष्टी वेबसाइट बनवण्यासाठी महत्त्वाच्या असतात.

डोमेन नेम आणि होस्टिंग या दोन्ही गरजा भागवणारे अनेक प्लॅटफॉम्र्स उपलब्ध आहेत. गो डॅडी डॉट कॉम, ब्लू होस्ट डॉट कॉम, ड्रीमहोस्ट डॉट कॉम असे अनेक प्लॅटफॉम्र्स आहेत, जिथे तुम्हाला वेबसाइटचं नाव आणि होस्टिंग पुरवलं जातं. या दोन्हीसाठी असणारा सुरुवातीचा खर्च हा साधारण चार ते पाच हजार रुपये असतो. त्यानंतर प्रतिवर्षी फक्त होस्टिंगसाठीच जुजबी पैसे भरावे लागतात.

* वेबसाइट डिझायनिंग

पहिली दोन महत्त्वाची कामं पार पडली की खऱ्या अर्थाने वेबसाइट बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. कुठलीही बिल्डिंग बांधण्यासाठी जसं फाउंडेशन केलं जातं तसाच हा प्रकार आहे. खोदकाम झालं की सिमेंट ओतणं सुरू होतं. तसंच डोमेन नेम बुक झालं की त्यावर प्लॅटफॉर्म उदाहरणार्थ, वर्डप्रेस इन्स्टॉल करायचं. साधारण सगळ्या होस्टिंग प्लॅटफॉर्मवर वन-क्लिक-इन्स्टॉलेशनचा पर्याय असतो. एकदा इन्स्टॉलेशन झालं की मग थीम्स आणि टेम्प्लेट्सचा भाग येतो. आपल्या आवडीनुसार, वेबसाइटच्या प्रकारानुसार थीम नक्की करायची. कुठल्याही वेबसाइटवर विविध वेबपेजेस असतात. थीम नक्की झाल्यानंतर ही वेबपेजेस बनवायला घ्यायची. जेणेकरून नक्की केलेली थीम सगळ्या वेबपेजेसना लागू होते. वेगवेगळे टॅब्स, साइडबार, टूलबार अ‍ॅड करण्याची सुविधा वर्डप्रेस, द्रुपल किंवा जुमलासारख्या प्रचलित प्लॅटफॉम्र्समध्ये असते. त्याशिवाय प्लगइन्सही वेबसाइटवर अ‍ॅड करणं शक्य असतात.

महत्त्वाच्या या तीन पायऱ्या आहेत. प्रत्यक्षात जेव्हा वेबसाइट बनवली जाते तेव्हा बेसिक साइट एका दिवसात बनू शकते. मात्र तुमच्या आवश्यकतेनुसार वेबपेजेसच्या प्रमाणावर वेबसाइट तयार होण्याचा वेळ अवलंबून असतो. संपूर्ण प्रक्रिया इथे देणं शक्य नाही. त्यामुळेच थोडक्यात महत्त्वाच्या मुद्दय़ांची मांडणी इथे केलेली आहे.