21 October 2020

News Flash

‘ऑनलाइन शॉपिंग’ जरा जपून..

अ‍ॅड्रेस बारमध्ये संकेतस्थळाच्या नावापूर्वी https ही अक्षरे दिसत असतील तर ते संकेतस्थळ सुरक्षित आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

सध्याच्या संगणकीय युगात ई-कॉमर्सला प्रचंड मागणी आहे. घरबसल्या कॉम्प्युटर किंवा मोबाइलवरून आपल्याला हवी ती वस्तू घरपोच तीही सवलतीच्या दरात उपलब्ध होत असल्याने ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळांची सध्या जबरदस्त चलती आहे. सणासुदीच्या दिवसांत अशा संकेतस्थळांवरून दिल्या जाणाऱ्या आकर्षक सवलती आणि भेटवस्तू यांमुळे तेथे ग्राहकांच्या ‘आभासी’ रांगाच लागलेल्या असतात. त्यामुळे अनेकदा ही संकेतस्थळे ‘क्रॅश’ होत असतात किंवा कधी कधी ‘हॅकर्स’ची शिकारही बनतात. साहजिकच ऑनलाइन शॉपिंगदेखील डोळसपणे करणे आवश्यक आहे. याच पाश्र्वभूमीवर काही महत्त्वाच्या टिप्स :

आपण खरेदीसाठी एखाद्या दुकानात जातो तेव्हा अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी तपासून घेतो. जी वस्तू घ्यायची आहे तिचा दर्जा व किंमत, विविध स्पर्धक कंपन्यांच्या वस्तूंचा दर्जा व किंमत, दुकानदाराकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर्स या सर्व गोष्टी आपण डोळसपणे पाहत असतोच. पण दुकानातून बाहेर पडताना आपली पर्स किंवा पाकीट मागे राहिलं नाही ना, दुकानदाराने योग्य पावतीच दिली आहे ना, आपल्याला हवी तीच वस्तू मिळाली आहे ना, डेबिट/क्रेडिट कार्डचा पिन नंबर कुणी पाहत तर नाही ना.. या सर्वाची आपण खात्री करत असतो. पण दुर्दैवाने ऑनलाइन शॉपिंग करताना अनेकांचा हा डोळसपणा गायब होतो. शॉपिंग संकेतस्थळांवरून दिल्या जाणाऱ्या आकर्षक ऑफर्स आणि भेटवस्तूंच्या मोहात अनेक जण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत आणि मग त्याचा त्यांना मोठा भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळेच ऑनलाइन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत.

सुरक्षित संकेतस्थळाची निवड :

तुमच्या ई-मेलवर किंवा अन्य कुठल्याही माध्यमातून आलेल्या जाहिरातीतील शॉपिंग संकेतस्थळावर खरेदी करण्याआधी सर्वप्रथम त्या संकेतस्थळाचा अ‍ॅड्रेस काळजीपूर्वक तपासून पाहा. तुमच्या इंटरनेट ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये संकेतस्थळाच्या नावापूर्वी https ही अक्षरे दिसत असतील तर ते संकेतस्थळ सुरक्षित आहे. यातील ‘२’ हे आद्याक्षर वेबसाइट सेक्युअर असल्याचे दर्शवते.

याखेरीज अ‍ॅड्रेस बारमध्ये ‘पॅडलॉक’ हे कुलपाचे चिन्ह खुले असल्यास ती वेबसाइट असुरक्षित आहे, असे समजावे. तुम्ही ज्या वेबसाइटवरून व्यवहार करू इच्छिता, त्या वेबसाइटचा डाटा ‘एन्क्रिप्टेड’ (गुप्त) आहे का, याची खातरजमा करण्यासाठी त्या वेबसाइटच्या ‘प्रायव्हसी आणि सिक्युरिटी पॉलिसी’ काळजीपूर्वक वाचा.

संकेतस्थळाचा अभ्यास

ही बाब अनेकांना दुय्यम वाटते. मात्र, ज्या संकेतस्थळावरून आपल्याला खरेदी करायची आहे, त्या संकेतस्थळाची पाश्र्वभूमी आणि विश्वासार्हता तपासून पाहिलीच पाहिजे. यासाठी ‘गुगल सर्च’ करून त्यांची माहिती मिळवणे हा सोपा पर्याय आहे. त्याशिवाय संबंधित संकेतस्थळ कंपनीचा भौगोलिक पत्ता, ग्राहक सेवा क्रमांक, ई-मेल आहे का, हे त्या संकेतस्थळावरून पाहता येते.

शक्यतो, आपण नेहमी खरेदी करत असलेल्या किंवा विश्वासार्ह म्हणून प्रसिद्ध असलेल्या संकेतस्थळांवरूनच खरेदी करा. तसे नसल्यास, संबंधित संकेतस्थळाच्या ग्राहक सेवा क्रमांकावर फोन करून त्यांच्याकडून मिळेल तेवढी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.

तुमच्यावर नजर आहे..

सध्याच्या युगात इंटरनेट वापरकर्ता हा कमालीचा असुरक्षित झाला आहे. कारण, कोणत्याही संकेतस्थळावर गेले तरी आपली माहिती तेथे साठवली जाते. या माहितीचा गैरवापर झाल्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात उजेडात आल्या आहेत. ही माहिती गोळा करण्याचे काम संकेतस्थळांवरील ‘कुकीज’ करत असतात. प्रत्यक्षात ‘कुकीज’ हा वापरकर्त्यांची माहिती साठवून पुढच्या वेळेस तो जेव्हा संकेतस्थळाला भेट देईल, तेव्हा ती माहिती वापरून त्याचा ‘अ‍ॅक्सेसिंग’ वेळ वाचवण्याचे काम करतात. ऑनलाइन शॉपिंगमध्येही तसेच होते. संकेतस्थळावरील ‘कुकीज’ ग्राहकाची माहिती (नाव, पत्ता, फोन नंबर, इत्यादी) संगणकावर साठवून ठेवतात. त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तोच ग्राहक खरेदीसाठी येतो, तेव्हा ती माहिती भरण्याचे त्याचे कष्ट कमी होतात. परंतु, असुरक्षित संकेतस्थळांवरील ‘कुकीज’ ही माहिती कंपनीच्या सव्‍‌र्हरद्वारे अन्यत्र पोहोचवण्याचाही धोका असतो. त्यामुळे याबाबतीत काळजी बाळगणे आवश्यक आहे. यावर उपाय म्हणून तुम्ही ‘कुकीज’ डिसेबल करू शकता. मात्र, बहुतांश संकेतस्थळांवर ‘कुकीज’ सुरू असल्याखेरीज तुम्हाला खरेदीची ऑर्डरही नोंदवता येत नाही.

तुम्ही ‘फ्लिपकार्ट’वर जाऊन ‘टीव्ही’ खरेदीच्या ऑफर्स पाहिल्या, तर पुढच्या वेळेस तुम्ही कोणतेही संकेतस्थळ सुरू केले की त्यावर तुम्हाला ‘टीव्ही’च्या जाहिराती नक्कीच पाहायला मिळतील. तुमच्या ई-मेलवरही असे अनेक ई-मेल्स येतात. हे सर्व घडतं ते ग्राहकाच्या आवडीनिवडीची ‘नोंद’ ठेवण्याच्या कंपन्यांच्या सवयीमुळे. थोडक्यात या कंपन्या तुमच्यावर पाळत ठेवून असतात. त्यामुळे योग्य संकेतस्थळाची निवड करणे अतिआवश्यक आहे.

या दोन्ही गोष्टींचा आपल्याला फटका बसू नये, यासाठी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये चांगला अँटिव्हायरस आणि इंटरनेट सिक्युरिटी प्रोग्रॅम असणे आवश्यक आहे.

डेबिट कार्ड की क्रेडिट कार्ड की नेट बँकिंग?

ऑनलाइन शॉपिंग करताना वरील तीन गोष्टींची आवश्यकता असतेच. अशा वेळी क्रेडिट कार्डचा वापर सर्वात चांगला. कारण तुमच्या नकळत तुमच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी करण्यात आली, तरी तुम्ही तुमच्या बँकेला फोन करून संबंधिर्त मचट वेबसाइटचे ‘पेमेंट’ रोखू शकता. याउलट डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगमार्फत हॅकर्स तुमच्या खात्यातील सर्व पैसे हडप करू शकतात. अर्थात संबंधित संकेतस्थळावर ‘सेक्युअर पेमेंट सव्‍‌र्हिस’ असल्यास हा धोका अत्यल्प असतो. अर्थात अलीकडे ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ हा पर्याय उपलब्ध झाला असून तो सर्वात सुरक्षित पर्याय आहे.

जास्त माहिती देऊ  नका

कोणत्याही संकेतस्थळावर तुमचा ‘आधार क्रमांक’ किंवा ‘बँक खाते क्रमांक’ किंवा तुमच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित गुप्त क्रमांक नोंदवू नका. शक्यतो जन्म तारीख देणेही टाळा. कारण क्रेडिट कार्डचा क्रमांक आणि जन्म तारीख माहिती असल्यास कोणताही हॅकर तुमच्या खात्यापर्यंत पोहोचून तुमची लुबाडणूक करू शकतो.

विक्रेत्याची माहिती घ्या

काही ऑनलाइन संकेतस्थळे विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील मध्यस्थीचे काम करत असतात. अशा वेळी व्यवहार करताना संकेतस्थळाची विश्वसार्हता पुरेशी नसते. तर, संबंधित विक्रेत्याची माहितीही तपासून घेणे आवश्यक आहे. कारण अनेकदा विक्रेत्याकडून फसवणूक झाल्यास संकेतस्थळ त्याची जबाबदारी घेत नाही.

मोह असावा, हाव नको

शॉपिंग संकेतस्थळांवरून दिल्या जाणाऱ्या ऑफर्स तोंडाला पाणी आणणाऱ्या असतात. त्यामुळे ग्राहकांच्या त्यांवर उडय़ा पडतात. मात्र, अशा ऑफर्स स्वीकारताना त्यांतील बारकावे पाहिलेच पाहिजेत. अनेकदा एखादी वस्तू ५० टक्के सवलतीत म्हणून ज्या किमतीला विक्रीला मांडली जाते, त्या वस्तूची मूळ किंमत या सवलतीच्या किमतीपेक्षा कमी असते. काही वेळा एखाद्या वस्तूसोबत दुसरी वस्तू ‘मोफत’ असे सांगून अप्रत्यक्षपणे त्याची किंमत वसूल केली जाते. त्यामुळे अशा ऑफर्स नीट वाचूनच खरेदी केली पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2017 3:11 am

Web Title: tips for safe online shopping
Next Stories
1 फोन पसंत नसेल, तर पैसे परत
2 ऑनलाइन छळाचे परिणाम
3 शॉपिंगसोबत कमाईही
Just Now!
X