11 August 2020

News Flash

अ‍ॅपची शाळा : रेल्वेची माहिती

असा प्रचंड व्याप असलेल्या रेल्वेबद्दल अद्ययावत आणि अचूक माहिती देणारे एक अ‍ॅप आज आपण पाहणार आहोत.

प्रवास करणाऱ्या मंडळींचे भारतीय रेल्वेशी असलेले नाते अतूट आणि वैशिष्टय़पूर्ण आहे. रेल्वेतून प्रवास करताना तुमच्या बजेटप्रमाणे सामान्य द्वितीय वर्गापासून ते वातानुकूलित प्रथम दर्जापर्यंतचा कोणताही वर्ग तुम्ही निवडू शकता तसेच पॅसेंजर गाडय़ांपासून अतिवेगवान सुपरफास्ट गाडय़ांनी प्रवास करू शकता. भारतीय रेल्वेतर्फे काश्मीरपासून थेट कन्याकुमारीपर्यंत तसेच कच्छपासून थेट आसामपर्यंत गाडय़ा चालवल्या जातात. दर दिवसाला साडेबारा हजारांहून अधिक गाडय़ा सोडल्या जातात.

असा प्रचंड व्याप असलेल्या रेल्वेबद्दल अद्ययावत आणि अचूक माहिती देणारे एक अ‍ॅप आज आपण पाहणार आहोत. त्याचे नाव आहे ‘ट्रेनमॅन’चे ‘पीएनआर स्टेटस प्रीडिक्शन ट्रेनमॅन’ (PNR Status Prediction Trainman)(https://play.google.com/store/apps/detailsAGid=in.trainman.trainmanandroidapp&hl=en). विशेष म्हणजे हे अ‍ॅप इंग्रजीशिवाय हिंदी, मराठी, कन्नड, तामिळ, तेलुगू, बंगाली आणि गुजराती या भाषांमध्येही वापरता येते.

बहुतेक प्रवाशांना पडणारा नेहमीचा प्रश्न म्हणजे आपल्याला जायचे असणाऱ्या ठिकाणासाठी प्रवासाच्या दिवशी कोणकोणत्या गाडय़ा आहेत आणि त्यात आरक्षण उपलब्ध आहे का? अ‍ॅपमध्ये प्रवास सुरू करण्याचे आणि संपण्याचे ठिकाण आणि प्रवासाची तारीख टाकली असता स्क्रीनवर त्या दिवशीच्या उपलब्ध गाडय़ा दाखवल्या जातात. त्या गाडीत कुठल्या वर्गाचे डबे आहेत आणि त्या वर्गाच्या प्रवासाचे भाडे किती असेल ते सांगितले जाते.

जर आपण यातील एखादी गाडी निवडली तर आरक्षणाची स्थिती दाखवली जाते. जर आरक्षण उपलब्ध नसेल (म्हणजेच प्रतीक्षा यादी सुरू झालेली असेल) तर आरक्षण कन्फर्म होण्याची शक्यता किती टक्के आहे हेसुद्धा येथे दिसते. मागील काही दिवसांत प्रतीक्षा यादीतील किती लोकांचे आरक्षण कन्फर्म झाले होते यावरून हा अंदाज आपल्याला दिला जातो. त्यामुळे त्याच दिवशी प्रवास करायचा असेल तर प्रतीक्षा यादीत थांबायचे का दुसरा कोणता पर्याय निवडायचा याचा निर्णय घेण्यास तुम्हाला मदत होते. हे या अ‍ॅपचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे.

याचबरोबर या गाडीचा मार्ग, मार्गावरील स्थानके, तेथे गाडी किती वेळ थांबणार याची वेळापत्रकानुसार माहिती या अ‍ॅपमध्ये तुम्हाला सहजपणे पाहता येते. प्रवासाच्या प्रत्यक्ष दिवशी अपेक्षित वेळ आणि प्रत्यक्ष वेळ यांमधील फरकही तुम्हाला दर्शवला जातो (म्हणजेच तुम्हाला गाडी उशीराने धावत असल्यास ती तुमच्या स्थानकावर किती उशिरा येईल याचा अंदाज मिळू शकतो.).

या अ‍ॅपमधे एखाद्या रेल्वे स्थानकाचे नाव दिल्यास पुढील चार तासांत तेथे कोणत्या गाडय़ा येणार व सुटणार आहेत याची माहिती दिली जाते (यात उपनगरी गाडय़ांचाही समावेश आहे.). लांबच्या प्रवासाला जाताना गाडीत आपला डबा इंजिनपासून कितवा असेल याची माहिती असणे उपयोगाचे असते. सदर माहिती या अ‍ॅपमध्ये दिलेली आहे. एवढेच नव्हे तर स्लीपर डब्यांमधील बर्थ किंवा बसण्याच्या डब्यातील सीट्स कशा प्रकारे असतील याची आकृतीसहित माहिती दिलेली आहे. आपण काढलेल्या तिकिटाविषयी माहिती ढठफ  स्टेट्समध्ये कळतेच. काही कारणाने तिकीट कॅन्सल करायचे असल्यास सद्य:स्थितीत त्याची किती रक्कम नियमानुसार कापली जाईल ते स्क्रीनवर दिसते.

अशी व यासारखी रेल्वेसंबंधी उपयुक्त माहिती देणारी बरीच अ‍ॅप्स (उदाहरणार्थ रेलयात्री, कन्फर्म तिकीट, इक्सिगो इत्यादी) गुगल अ‍ॅप स्टोअरवर आहेत. वाचकांनी आपल्या आवडीनुसार व गरजेनुसार अ‍ॅपची निवड करावी.

मनाली रानडे  manaliranade84@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2016 1:17 am

Web Title: trainman android apps on google play
Next Stories
1 फेसबुकची Find Wi-Fi सुविधा!
2 तंत्राविष्कार
3 आभास हा खेळतो भला..
Just Now!
X