29 January 2020

News Flash

कूपनचा स्मार्ट वापर!

कूपनची मुदत-कूपनची मुदत लवकर संपते आणि काही वेळा दिवसागणिक जाहिरातीत बदल होत असतात.

ई-कॉमर्स संकेतस्थळांच्या वाढत्या प्रभावामुळे कपडय़ांपासून फर्निचपर्यंतच्या असंख्य गोष्टी ऑनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढत चालला आहे. अशा संकेतस्थळांवर बाजारापेक्षा कमी किमतीत वस्तू मिळतात आणि त्या कोणत्याही शुल्काविना घरपोच येतात, या दोन कारणांमुळे कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात करावी लागणारी वणवण ग्राहक टाळतात. त्यामुळेच अशा ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून दररोज काही ना काही निमित्ताने वस्तूंवर सवलती जाहीर करून त्यांची विक्री केली जाते. यातच अलीकडे ‘डिस्काउंट व्हाउचर्स’ किंवा ‘स्मार्ट कूपन्स’ असा नवीन प्रकार रूढ होऊ लागला आहे. अशा कूपन्सच्या माध्यमातून वस्तूखरेदीवर भरघोस सूट किंवा रोखपरतावा (कॅशबॅक) मिळवण्याची हमी दिली जाते.  सवलत, सूट, कॅशबॅक, डिस्काउंट हे शब्द कोणत्याही ग्राहकाला सुखावणारे आणि आकर्षित करणारे असतात. त्यामुळे ग्राहक त्याकडे आपसूकच आकर्षित होतात आणि त्या कूपन्सचा वापर करता येत असलेल्या ई- कॉमर्स संकेतस्थळांवर जाऊन खरेदी करतात. ‘५०० रुपयांच्या खरेदीवर १०० रुपयांची सूट’ अशा ऑफरपासून ‘दोन खरेदी केल्यास तिसरी वस्तू ५० टक्के सवलतीत’ अशा असंख्य आकर्षक सवलती वाटणारे कूपन्सचे कोड सध्या अनेक संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. मात्र, हे कूपन्स खरोखरच आपले पैसे वाचवतात का? ते किती परिणामकारक आहेत? त्यांचा योग्य वापर कसा करावा? ते निवडताना काय खबरदारी घ्यावी? यांची माहिती देणारा हा लेख..

कूपन वापरणे हा पैसे वाचवण्याचा सगळ्यात चलाख मार्ग आहे आणि ग्राहकांनी ‘स्मार्ट’पणे कूपन वापरल्यास त्यांना हवी असलेली वस्तू खूपच कमी किमतीत त्यांना मिळू शकेल. मोबाइलखरेदीपासून मोबाइल रिचार्जपर्यंत आणि कपडय़ांपासून प्रवासापर्यंत असंख्य गोष्टींवर कूपन्स उपलब्ध आहेत. कूपनमुळे आपले पैसे वाचतील, असा विचार करून ग्राहक ते घेतात. मात्र, त्याचा अचूक वापर न करता आल्याने त्यांना आपली फसगत झाल्याचे वाटू लागते. हे टाळण्यासाठी खालील टिप्सचा जरूर अवलंब करा.

कूपनची मुदत-कूपनची मुदत लवकर संपते आणि काही वेळा दिवसागणिक जाहिरातीत बदल होत असतात. बरेचदा तर ग्राहक कूपन मिळाल्यावर खूश होतात आणि कूपनवरच्या मुदतीची धोरणे काळजीपूर्वक बघायचीच विसरतात. कूपन वापरायला गेलं की त्याची मुदत संपल्याचं त्यांना कळतं. यामुळे नेहमीच कूपनची मुदत बघायला हवी आणि ती मुदत संपताना किंवा त्याआधी ते कूपन वापरायला हवं.

नियम व अटी लागू-अनेक कंपन्या जास्त प्रमाणात सवलती देऊन ग्राहकांना कुशलतेने वापरत असतात, हे तुमच्या लक्षातही येत नसेल. उदाहरणार्थ : ५००० रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि २० टक्के सवलत मिळवा. याचा ग्राहकाच्या खरेदीच्या निर्णयावर परिणाम होतो, केवळ सवलत उपलब्ध आहे म्हणून खरेदीदार जास्त पैसे खर्च करतो. पण असे खूप ब्रॅण्ड्स आहेत जे कुठल्याही किमतीच्या खरेदीवर पूर्ण १० टक्के इतकी सवलत देत आहेत. यामुळेच खरेदीदारांनी कूपनचे खरे मूल्य समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

कूपनचे मूल्य-काही ब्रॅण्ड्स त्यांची आधीची सवलत कूपन दुसऱ्या खरेदीवरच वापरायची परवानगी देतात. पहिल्या कूपनची सवलत मिळवण्यासाठी दुसऱ्यांदा खरेदी करण्याची सक्ती त्यांच्यावर केल्यास ग्राहकांचा रस संपू शकतो. त्यामुळे कूपनचे तपशील काळजीपूर्वक पाहा. बऱ्याचदा कूपनमधील सवलती मिळवण्यासाठी आपण स्वत:च्या गरजेपेक्षा अधिक किमतीची खरेदी करतो आणि मागाहून पश्चात्ताप होतो. त्यामुळे याबाबत खबरदारी घेतलीच पाहिजे.

तुलना करा आणि उत्तम निवडा-हल्ली कूपनच्या असंख्य वेबसाइट्स आहेत, पण कुणीही सारख्याच सवलती किंवा सौदा देत नाहीत. यामुळे तुमच्या गरजेनुरूप कूपन निवडताना काळजी घ्या. नेहमी चांगलं आणि अधिक चांगलं कूपन निवडा, यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सवलत मिळेल. उदाहरणार्थ, समजा काहीजणं पैसे परत देण्याची सवलत देत आहेत. बऱ्याचदा या साइटना तुम्ही त्यांच्याकडून खरेदी केल्यास ब्रॅण्डच्या दुकानांकडून कमिशन दिलेलं असतं, पण कुणीही ही अतिरिक्त बचत ग्राहकांपर्यंत पोचू देत नाही. म्हणूनच खात्री करून आणि व्यवस्थित ठरवूनच अस्सल पैसे परत मिळणारी सवलत किंवा साइटवरील सवलत घ्या.

सर्वसामान्यपणे कूपन वापरण्याच्या पद्धती संक्षेपात जाणून घ्या-

कूपन वापरायच्या पद्धती काहीशा गोंधळ निर्माण करण्याऱ्या असू शकतात. ब्रॅण्ड बरेचदा खूप सारी आद्याक्षरे कूपनवर लिहितात, आपल्याला वाटतं जणू काही आपण कुठला अगम्य मजकूर वाचतोय. पण ही अक्षरं पहिल्यांदा वाटतात तितकी अगम्य नाहीत. एकदा का ती कशी वाचायची हे तुम्हाला कळलं की, कूपनचं एडव्हेंचर किती सोपं आहे हे कळेल. पुढे कूपनवर वारण्यात येणारी काही आद्यक्षरे देत आहोत, भविष्यात वापरायसाठी ती संग्रही ठेवू शकता.

BOGO- बाय वन गेट वन; EXP- एक्सपायर्स किंवा एक्सपायरेशन डेट; OYNO  – ऑन युअर नेक्स्ट ऑर्डर इत्यादी.

– अंकिता टंडन (कूपन दुनिया डॉट कॉम)

First Published on February 16, 2016 6:06 am

Web Title: use of discount coupon in online shopping
Next Stories
1 फोटो काढा पटापट!
2 फोनची चोरी रोखण्यासाठी..
3 मोबाइल चार्जरला सौर ऊर्जेची जोड