15 December 2017

News Flash

विजेटचं विश्व

तंत्रज्ञानाचं विश्व म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. या गुहेत एकापेक्षा एक अद्भुत खजिना आहे.

पुष्कर सामंत | Updated: April 11, 2017 3:33 AM

स्मार्टफोन म्हटलं जातं त्याच्या स्मार्टनेसचा निदान पुरेपूर वापर तरी झाला पाहिजे की नाही. उदाहरणार्थ, मोबाइलचा मोठा स्क्रीन.

तंत्रज्ञानाचं विश्व म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. या गुहेत एकापेक्षा एक अद्भुत खजिना आहे. आपल्या हातातला स्मार्टफोन हा त्यातलाच एक. पण हे प्रकरणसुद्धा अजबच आहे. मात्र ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या एका संशोधनानुसार सर्वसामान्य वापरकर्ता स्मार्टफोनमधल्या एकूण फिचर्सपैकी फक्त ४० टक्के सुविधा वापरतो. याचाच अर्थ ज्या यंत्रासाठी आपण १०० टक्के पैसे मोजतो त्याचा आपण फक्त ४० टक्के वापर करतो. अशी अनेक फिचर्स असतात जी कधीच वापरली जात नाहीत. अर्थात पैसे वसूल करायचे म्हणून फोनची पिळवणूक करावी अशातला भाग नाही. पण ज्याला स्मार्टफोन म्हटलं जातं त्याच्या स्मार्टनेसचा निदान पुरेपूर वापर तरी झाला पाहिजे की नाही. उदाहरणार्थ, मोबाइलचा मोठा स्क्रीन.

व्हिडीओ आणि सिनेमे पाहण्यापलीकडे या मोठय़ा स्क्रीनचा काही उपयोग आहे असं अनेकांना वाटत नाही. खिशातलं थिएटर एवढाच काय तो साडेपाच-सहा इंचाच्या स्क्रीनचा वापर. पण मग जेव्हा व्हिडीओ, सिनेमे सुरू नसताना या स्क्रीनचा पुरेपूर वापर कसा करायचा. याचा एक उत्तम आणि अत्यंत उपयुक्त वापर आहे. त्यासाठी स्मार्टफोनमध्ये फिचरही आहे आणि त्याचं नाव म्हणजे – विजेट्स. मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचा जन्म झाला त्या दिवसापासूनच विजेट्स अस्तित्वात आहेत. पण ज्या वेगाने ऑपरेटिंग सिस्टम्स किंवा अ‍ॅप्स लोकप्रिय झाले त्या तुलनेत विजेट्स मात्र उपेक्षित राहिली. उलटपक्षी तंत्रज्ञान वापरकर्त्यांनी कधी या विजेट्सकडे गांभीर्याने पाहिलंच नाही. तंत्रस्वामी किंवा गॅजेटकिडय़ांपर्यंतच हे विजेट्स मर्यादित राहिले.

मुळात विजेट म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम किंवा अ‍ॅप्लिकेशनचा एक छोटासा भाग. रॅमचा कमीत कमी वापर करून अधिकाधिक उद्देश साध्य करणं हा विजेट्सचा मुख्य हेतू. उदाहरणार्थ, घरात तेलाची किंवा लोणच्याची मोठी बरणी असते. त्यातलं रोजच्या वापरासाठी लागणारं आठवडय़ाभराचं तेल किंवा लोणचं दुसऱ्या एका छोटय़ा भांडय़ात काढून ठेवलं जातं. आणि ते भांडं पटकन हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवलेलं असतं. विजेट म्हणजे हे छोटं भांडं. कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टमसाठी, अ‍ॅपसाठी आणि मॉडेलच्या स्मार्टफोनसाठी हे छोटं भांडं अत्यंत उपयुक्त आहे. बहुतांशवेळा ही विजेट्स डाऊनलोड करावी लागत नाहीत. कुठल्याही कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये ती इनबिल्ट म्हणजे आधीपासूनच असतात. फक्त ती आपल्याला शोधावी लागतात.

शोधायची कशी

सामान्यत: डेस्कटॉपवर म्हणजे मोबाइलच्या स्क्रीनवर दोन-तीन सेकंद बोट ठेवलं की विजेट्सचा पर्याय आपणहून येतो. आपल्या गरजेनुसार मग ही विजेट्स निवडता येतात. विजेट्सचा फायदा असा की छोटय़ाछोटय़ा गोष्टींसाठी प्रत्येकवेळा संपूर्ण अ‍ॅप सुरू करायची गरज नसते. हे विजेट तुम्हाला सतत अपडेटेड ठेवतं. उदाहरणार्थ, तापमान आणि घडय़ाळ हे सगळ्यांच्याच स्मार्टफोन्सच्या स्क्रीनवर दिसत असतं. हेसुद्धा एक विजेटच आहे. तापमानाविषयी अधिक जाणून घ्यायचं असतं तेव्हा मग त्यावर क्लिक किंवा टॅप केलं जातं आणि अधिक खोलात शिरलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजेट्समुळे बॅटरी वाचते. अर्थात स्क्रीनलाइटपेक्षा अधिक बॅटरी विजेट्ससाठी वापरली जाते. पण अ‍ॅपपेक्षा कमीच वापर होतो. ऑल इन वन विजेट्सचा वापर केलात तर फारच फायदेशीर ठरू शकतं. विजेट्स वापरणं म्हणजे ज्या भल्यामोठय़ा स्क्रीनसाठी पैसे मोजलेत ते वसूल करणं.

काही उपयुक्त विजेट्स

डॅशक्लॉक – हे एक लोकप्रिय विजेट आहे. एकाच वेळी स्थानिक वेळ- तापमान, मिस कॉल्स, न वाचलेले मेसेजेस, कॅलेंडर, बॅटरी मीटर, म्युझिक कंट्रोल, डेटा युसेज, ईमेल्ससारख्या अनेक फिचर्सचे नोटिफिकेशन आणि माहिती दिली जाते. अ‍ॅप स्टोअरमध्ये हे विजेट सहज उपलब्ध आहे.

सिंपल आरएसएस विजेट – बातम्या आणि लेख वाचणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हे उपयुक्त विजेट आहे. मोठय़ा टायपात, स्पष्टपणे मथळा आणि थोडक्यात बातमी अशा स्क्रीनवर दिली जाते.

याशिवाय गुगल कीप, अल्टिमेट कस्टम विजेट, युनिफाइड रिमोट, स्लाइडर विजेटसारखे पर्यायही उपलब्ध आहेत. जर का ही विजेट्स स्क्रीनवर आणल्यानंतर मोबाइल मंदावल्यासारखा वाटत असेल तर चिंता करू नका. सेटिंग्जमध्ये जाऊन अ‍ॅप्सवर क्लिक करा. ऑल रनिंग अ‍ॅपमध्ये जाऊन शो कॅशे प्रोसेसेस निवडा. आणि एकावेळी एकेक अ‍ॅप बंद करा. याने मोबाइलची कार्यक्षमता नक्कीच वाढेल.

पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com

First Published on April 11, 2017 3:33 am

Web Title: users use 40 feature of smartphone