29 January 2020

News Flash

आभासी विश्वात नेणारी दृष्टी

तंत्रस्नेही मंडळी सध्या वास्तवापेक्षा आभासी वास्तावात अधिक रमू लागली आहे.

बाजारात उपलब्ध असलेल्या व्हीआर हेडसेट्स

तंत्रस्नेही मंडळी सध्या वास्तवापेक्षा आभासी वास्तावात अधिक रमू लागली आहे. यामुळे बसल्या जागी आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील ठिकाणी पोहोचू शकतो. सध्या अगदी आपण चष्मा खरेदी करणार असलो तरी अ‍ॅपवरून अथवा संकेतस्थळावरून आपल्या चेहऱ्याला कोणती फ्रेम चांगली दिसेल हे पाहण्यापासून ते आपण घर खरेदी अथवा भाडय़ाने घेणार असू तर आपण निवडलेले घर कसे आहे ते बसल्या जागेवर पाहण्याची सोय या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झाली आहे. या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर हा गेमिंगसाठी होत आहे. यामुळेच सध्या बाजारात ‘व्हीआर हेडसेट’ची गर्दी होऊ लागली आहे. गुगलने नुकताच भारतात हा व्हीआर हेडसेट आणला आहे. यानिमित्ताने बाजारात उपलब्ध असलेल्या व्हीआर हेडसेट्सविषयी.

गुगल ड्रेडीम व्ह्यू

अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीनंतर गुगलने भारतात आभासी विश्वात नेणारा चष्मा आणला आहे. अर्थात याला व्हीआर हेडसेट असे म्हणतात. सध्या गुगलचा हा हेडसेट गुगल पिक्सेल, पिक्सेल एक्सएल आणि मोटो झेड या फोनवर काम करतो. यामध्ये आपण आवश्यक ते अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर हा हेडसेट वापरू शकतो. हा हेडसेट वापरून आपण गुगलच्या कार्डबोर्ड या अ‍ॅपवर उपलब्ध असलेल्या आभासी विश्वातील अ‍ॅप्स अथवा गेम्स आपण या हेडसेटच्या माध्यमातून खेळू शकतो. याचबरोबर गुगलच्या स्ट्रीट व्ह्यू या अ‍ॅपच्या माध्यमातूनही आभासी विश्वात नेणारे अनेक व्हिडीओज या हेडसेटबरोबर उपलब्ध होणार आहेत. हा हेडसेट लवकरच इतर फोनसाठीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गुगलने सांगितले.

किंमत : ६,४९९ रुपये असून फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

पीट्रोन

नेत्रदीपक अशी वैशिष्टय़ आणि आकर्षक रचनेमुळे पीट्रोन या कंपनीचा हेडसेट चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये तुम्हाला हाय डेफिनेशन गेमिंगचा चांगला अनुभव घेता येऊ शकतो. हे उपकरण वापरण्यासाठी आपल्याला डोळ्यांनी नियंत्रण करावे लागते. आपली नजर हीच आपल्या संपूर्ण मोबाइवर चांगल्या प्रकारे नियंत्रण करते. आपल्याला मोबाइलमधील एखादा पर्याय निवडायचा असेल तर आपल्याला आपली नजर त्या पर्यायाकडे घेऊन जावी लागते. मग आपण तो पर्याय निवडू शकतो. हे वापरण्यासाठी आपल्याला आपला फोन हेडसेटमध्ये देण्यात आलेल्या फोनसाठीच्या जागेत ठेवावा लागतो.

किंमत : १४९९ रुपये

झेब्रॉनिक्स

झेब्रॉनिक्सने बाजारात आणलेला व्हीआर हेडसेटचे हार्डवेअर हे सर्व प्रकारच्या मोबाइल जोडता येणार आहे. हा हेडसेट वापरण्यासाठी आपल्याला आपल्या फोनमध्ये गुगल कार्डबोर्ड हे अ‍ॅप डाउनलोड करावे लागते. हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर क्यूआर कोडच्या माध्यमातून आपण हेडसेट आणि आपला फोन जोडू शकतो. कार्डबोर्ड या अ‍ॅपमध्ये व्हीआरवर आधारित अ‍ॅप्स आणि गेम्स देण्यात आले आहेत. याशिवाय यामध्ये थ्रीडी गेम्सचे कलेक्शन्स आहेत. यामुळे आपल्याला आभासी जगातील नावीन्यपूर्ण गोष्टी उपलब्ध होतात. चेन्नईस्थित या कंपनीने तयार केलेला हा हेडसेट इतरांपेक्षा जरा हटके असून या हेडसेटच्या माध्यमातून आभासी जगात वावरताना कोणतीही अडचण जाणवत नाही. अनेक हेडसेट वापरत असताना आपल्याला अनेकदा खाली छोटीशी पोकळी राहते व आजूबाजूच्या गोष्टी दिसतात. पण या हेडसेटच्या बाबतीत असे घडत नाही. याचबरोबर अनेक हेडसेट हे डोळ्यांना किंवा चेहऱ्याला टोचणारे असतात. मात्र झेब्रॉनिक्स या कंपनीने याची काळजी घेत हेडसेटच्या सर्व बाजूंना मऊ अशी उशी दिली आहे. तसेच डोक्यात लावता यावा असा पट्टाही देण्यात आला आहे. यामुळे हेडसेट आपल्या चेहऱ्यावर पक्के बसतात आणि आपण वास्तवातील विश्वातून पूर्णत: आभासी जगात जाऊ शकतो. याशिवाय या हेडसेटमध्ये आपण जे पाहात आहोत त्याचा फोकस अ‍ॅडजेस्ट करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. यामुळे आपण आभासी जगातील चित्र हेडसेटमध्येच अधिक जवळून किंवा लांबून पाहू शकतो. हेडसेटमध्ये फोन ठेवण्यासाठी देण्यात आलेली जागा अगदी सुरक्षित असून त्या जागेत फोन ठेवल्यामुळे कोणताही धोका जाणवत नाही. तसेच या जागेत आपण सहा इंच स्क्रीन असलेला कोणताही फोन ठेवू शकतो.

किंमत: १४०० रुपये असून स्नॅपडील या संकेतस्थळावर तो उपलब्ध आहे.

अ‍ॅग्नुस

हा हेडसेटही वापरकर्त्यांच्या दृष्टीने सुलभ अशा रचनेत बनविण्यात आला आहे. कमी किमतीत जास्तीतजास्त फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. झेब्रॉनिक्सप्रमाणेच हाही कुलपॅडच्या मदतीने चालतो आणि आपल्याला आभासी जगातील अ‍ॅप्स, गेम्स आणि व्हिडीओज उपलब्ध करून देतो. या हेडसेटच्याही चारही बाजू चामडय़ाने मऊ करण्यात आल्या आहेत. यात फोकस अ‍ॅडजेस्ट करण्याची सुविधा देण्यात आली असून विशेष बाब म्हणजे यात हेडफोन जॅक देण्यात आला आहे. यामुळे आपण हेडफोन लावून व्हिडीओचा किंवा गेमचा आवाज ऐकू शकतो. यामध्ये उच्च दर्जाचे ऑप्टिकल लेन्सेस वापरण्यात आल्या आहेत. यामुळे दृश्यानुभव अधिक दर्जेदार होतो.

किंमत : २४९९ रुपये. हा हेडसेट अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.

डोमो एनहान्स

हा हेडसेट सर्वात स्वस्त असून यामध्ये थ्रीडी व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी अनुभवता येणे शक्य आहे. हा हेडसेट सर्व स्मार्टफोनसोबत काम करू शकतो. हा हेडसेट वापरताना आपला अँड्रॉइड किंवा आयओएस स्मार्टफोनवर कंपनीचे एक अ‍ॅप डाउनलोड करावे लागते. हे अ‍ॅप डाउनलोड केल्यावर तुमचा फोन हेडसेटशी जोडला जातो. यामध्ये आय ट्रॅकिंग तंत्रज्ञानाऐवजी हेड ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे आपल्याला एखादा पर्याय निवडण्यासाठी संपूर्ण चेहरा हलवावा लागतो. हा हेडसेट गुगल कार्डबोर्डसारखाच विकसित करण्यात आला असून कार्डबोर्डमध्ये अनुभवता येणारे सर्व अ‍ॅप्स आणि व्हिडीओज याही अ‍ॅपच्या माध्यमातून अनुभवता येऊ शकतात.

किंमत : १२९० रुपये. हा हेडसेट फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.

आयरुस प्ले

यामध्ये अद्ययावत प्रोडक्शन तंत्रज्ञानाधारित लेन्सेसचा वापर करण्यात आला आहे. यातील चित्र अधिक दर्जेदार दिसावे यासाइी व्हॅक्युम लॉन वापरण्यात आला आहे. यामुळे आपल्याला आभासी जगातील पात्रांशी, वस्तूंशी किंवा गेम्समधील पात्रांशी अधिक जवळीक साधता येते. यामध्ये फोकस अ‍ॅडजेस्ट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे  चष्मा असलेली व्यक्तीही अधिक चांगल्या प्रकारे आभासी जगातील चित्रफिती पाहू शकते. या हेडसेटला हेडफोन जॅक नसल्यामुळे आपल्याला मोबाइलमधील आवाज मोठा ठेवून चित्र पाहावे लागते. जेणेकरून आपण त्याचा अधिक चांगला अनुभव घेऊ शकू.

किंमत : २४९९ रुपये असून हे हेडसेट अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.

– नीरज पंडित

nirajcpanditNiraj.pandit@expressindia.com

First Published on June 13, 2017 5:54 am

Web Title: vr headset market of india
Next Stories
1 मेमरी फुल्ल?
2 ‘दंग-तान’ प्रतिसादक्षम तंत्रज्ञानाची झलक
3 इंटरनेट संथ झालेय?
Just Now!
X