वेगवान इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे. इंटरनेट व्यवस्थित चालत नसेल किंवा संथपणे सुरू असेल तर आपण बेचैन होतो. बऱ्याचदा ‘सव्‍‌र्हिस प्रोव्हायडर’ला (सेवा पुरवठा कंपनी) दोष देऊन मोकळेही होतो. परंतु, प्रत्यक्षात हेच एक कारण इंटरनेट संथगती होण्याला जबाबदार नसते. इंटरनेट संथगती कधी व कसे होते आणि त्यावर उपाय काय, हे सांगण्याचा हा प्रयत्न..

इंटरनेट हा आपल्यापैकी बहुतांश जणांच्या दैनंदिन व्यवहारातील अविभाज्य घटक बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इंटरनेटशी आपण घट्ट जोडले गेलेलो असतो. बरं, फक्त इंटरनेट कनेक्शन असणं आपल्यासाठी आवश्यक नसतं, तर ते जास्तीतजास्त वेगवान असणं हीदेखील आपली गरज असते. त्यामुळेच मोबाइलवर ३जी, ४जी यांची चलती असते आणि घरच्या संगणकावर जास्तीत जास्त ‘एमबीपीएस’चा वेग आपण निवडतो. अर्थात, असं करूनही बऱ्याचदा आपल्याला इंटरनेटचा अपेक्षित वेग मिळत नाही. डाऊनलोडला लावलेली एखादी फाइल आकाराने कमी असली, तरी डाऊनलोड व्हायला बराच वेळ लागतो. किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ अपलोड होता होत नाहीत. अशावेळी आपण सेवा पुरवठा कंपनीच्या नावाने खडे फोडत असतो. परंतु, इंटरनेटचा वेग कमी व्हायला एवढे एकच कारण नाही. आणखीही काही कारणांमुळे तुमचे इंटरनेट संथगती होऊ शकते. अशी कारणे कोणती व त्यावर उपाय काय, हे आपण जाणून घेऊयात.

हार्डवेअरचा दोष

इंटरनेटचा वेग कमी मिळत असेल तर सर्वात प्रथम आपल्या इंटरनेटचा मॉडेम आणि राऊटर यांची तपासणी करा. तुमचा इंटरनेट नेहमीपेक्षा खूपच संथ सुरू असेल तर मॉडेम आणि राऊटर ‘रिसेट’ म्हणजे बंद करून दहा सेकंदांनी चालू करा. ही प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा इंटरनेटचा वेग तपासून पाहा. या इंटरनेटशी वायफायनी किंवा मॉडेमनी जोडल्या गेलेल्या अन्य संगणक किंवा मोबाइलवरील इंटरनेटचा वेग संथ आहे का, हेही तपासून पाहा. जर तुमचा संगणक वगळता अन्य ठिकाणी इंटरनेटचा वेग जास्त असेल, तर तुमच्या संगणकातच काही दोष निर्माण झालाय, असा त्याचा अर्थ होतो. अशा वेळी तुम्ही संगणकावर ‘ट्रबलशूटिंग’ करून नेमका दोष कुठे आहे, हे तपासून पाहू शकता.

इंटरनेट खाणारे अ‍ॅप्स, प्लगइन

वरील सर्व गोष्टी व्यवस्थित काम करत असतानाही, इंटरनेटचा वेग कमी मिळत असेल तर तुमच्या संगणकावरील किंवा मोबाइलवरील अ‍ॅप किंवा इंटरनेट ब्राऊजरच्या ‘प्लगइन’ तपासून पाहा. आपल्या मोबाइल किंवा संगणकावरील अ‍ॅप्स किंवा ‘प्लग इन’ आपल्या नकळत इंटरनेटचा वापर करत असतात. यातील काही तर भरपूर इंटरनेट वापरतात. त्यांच्या अविरत इंटरनेट वापरामुळे आपल्या इंटरनेटचा सरासरी वेग आपोआप कमी होतो. एकतर तुम्ही हे अ‍ॅप/प्लग इन स्वत: शोधून हटवू शकता किंवा ‘अ‍ॅडब्लॉक प्लस’(AdBlock Plus) यासारख्या ‘ब्राऊजर एक्स्टेन्शन’चा वापर करून त्यांचा शोध घेऊ शकता.

वायफायचा सिग्नल

तुम्ही वायफाय वापरत असाल आणि त्याचा वेग कमी असेल तर सर्वप्रथम वायफायचा राऊटर आणि इंटरनेट व्यवस्थित आहेत, याची खात्री करून घ्या. जर या गोष्टी ठीक काम करत असतील, तर तुमच्या वायफायचा सिग्नल कमजोर झालाय, असा याचा अर्थ होतो. अशावेळी तुम्हाला काही गोष्टींची खातरजमा करावी लागेल. त्या गोष्टी पुढीलप्रमाणे

’ राऊटर घराच्या मध्यवर्ती भागात बसवणे.

’ राऊटरच्या जवळपास शक्यतो इलेक्ट्रॉनिक उपकरणे न ठेवणे.

’ वायफायचा अन्य कुणी वापर करतोय का, हे पाहणे.

’ अद्ययावत राऊटरचा वापर करणे.

इंटरनेटचा ‘स्मार्ट’ वापर

खरंतर हा पर्याय एकमेव असा पर्याय आहे ज्याने तुम्हाला तुमच्या इंटरनेटचा वेग वाढल्याचे दिसून येईल. याचे कारण तुम्ही जितके जास्त इंटरनेट वापरता, तितका त्याचा वेग कमी होण्याची शक्यता असते. एकाच वेळी अनेक संकेतस्थळे सुरू ठेवणे, टोरंटने डाऊनलोड करणे, ऑनलाइन व्हिडीओ किंवा संगीत पाहणे/ऐकणे, ऑनलाइन गेम खेळणे अशा सवयींमुळे इंटरनेटचा वेग कमी होतो. अर्थात ही इंटरनेटचा वेग कमी होण्याची कारणे नाहीत. परंतु, एकाच वेळी अनेक माध्यमांतून वेगवान इंटरनेटची मागणी होऊ लागली की, त्याचा वेग विभागला जाणारच. त्यामुळे इंटरनेटचा वापर योग्य तऱ्हेने करा. अनावश्यक संकेतस्थळे काम होताच बंद करणे, वेळोवेळी ब्राऊजर हिस्ट्री आणि टेम्प फाइल्स हटवणे, दिवसातून एकदा तरी राऊटर ‘रिसेट’ करणे अशा छोटय़ा छोटय़ा कृतींमधून तुम्ही तुमच्या इंटरनेटचा वेग सक्षम करू शकाल.

इंटरनेटचा ‘प्लॅन’

बऱ्याचदा आपण निवडलेला इंटरनेटचा ‘प्लॅन’ हाच त्याच्या संथगतीला जबाबदार असतो. सध्या ब्रॉडबॅण्डवर अगदी एक एमबीपीएसपासून १००एमबीपीएस(मेगाबाइट प्रति सेकंद) पर्यंतचा वेग देणारे इंटरनेट प्लॅन उपलब्ध असतात. प्रत्यक्षात या निर्धारित वेगाच्या किमान अष्टमांश वेगाने आपण इंटरनेट हाताळत असतो. उदा. तुमच्या इंटरनेटचा वेग १ एमबीपीएस असेल, तर प्रत्यक्षात तुम्हाला १२०-१३० केबीपीएस (किलोबाइट प्रति सेकंद) असा वेग मिळत असतो. इंटरनेट वेगाची रचनाच तशी असते. त्यामुळे माझा इंटरनेट प्लॅन २० ‘एमबीपीएस’ असताना मला दोन एमबीपीएसचा वेगच मिळतोय, असा विचार करत असाल तर ते चुकीचं ठरू शकेल.

अर्थात, तुमचा इंटरनेटचा वेग निवडलेल्या ‘प्लॅन’इतकाच आहे का, हे जाणून घ्यायचे असेल तर ‘Speedtest.net’ सारखी इंटरनेटचा वेग तपासून सांगणारी संकेतस्थळे किंवा सॉफ्टवेअर तुम्हाला उपयुक्त ठरू शकतील. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमच्या इंटरनेटचा अचूक वेग जाणून घेऊ शकता. आता हा वेग आणि तुम्ही निवडलेला ‘प्लॅन’ यात तफावत असेल तर, तुमच्या सेवा पुरवठा कंपनीकडे नक्की तक्रार करा.