जमाना कनेक्टिव्हिटीचा आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये इंटरनेटचाही समावेश झालेला आहे. एखादवेळेस अन्नाशिवाय माणूस जगू शकतो, पण इंटरनेट नसलं की जीव कासावीस होतो. सतत कनेक्टेड राहण्याचं हे व्यसनच जडल्यासारखं झालं आहे. आणि या व्यसनाची साधनं म्हणजे २जी, ३जी, ४जी, डोंगल, वायफाय राऊटर वगैरे वगैरे. बाजारात ही साधनं खोऱ्याने उपलब्ध आहेत. पण या सर्व साधनांपैकी लोकप्रिय साधन म्हणजे वायफाय.
सध्याच्या घडीला सगळ्या स्मार्ट डिव्हाइसेसना इंटरनेटची आवश्यकता आहे. इंटरनेटशिवाय ही स्मार्ट डिव्हाइसेस ढ बनून जातात. अगदी घरातला टीव्हीही इंटरनेटशिवाय खोका बनून जातो. अशावेळी घरात वायफाय असणं उपयुक्त ठरतं. परिस्थिती अशी आहे की एखाद्या ठिकाणी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध आहे हे कळलं, की असा काही आनंद होतो जणू काही पगारवाढच झाली. डेटापॅक जास्त खर्च होणार नाही ही त्या आनंदामागची खरी भावना असते. त्यात पुन्हा इंटरनेटचा स्पीडही चांगला मिळणार ही पुरवणी भावना. पण मुद्दा असा आहे की वायफाय सुविधा देणारे हे राऊटर काम कसं करतात. हे राऊटर विकत घेताना काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कशा पद्धतीने हे राऊटर्स घरात किंवा छोटेखानी ऑफिसमध्ये लावले पाहिजेत, जेणे करून सर्व स्मार्ट डिव्हाइसेसना त्याचा फायदा होईल.
वायफाय राऊटर कसा निवडाल?
साधारण सगळ्या कंपन्यांचे वायफाय राऊटर्स हे एकसारखेच दिसतात. असं असलं तरी त्यांच्या कार्यक्षमतेत खूप फरक असतो. वायफाय राऊटरचं मुख्य काम असतं ते म्हणजे डेटाची देवाणघेवाण वेगाने करणं. डेटा ट्रान्सफरचा वेग जितका चांगला तितका तुमचा राऊटर उत्तम.
आयईईई म्हणजेच इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्सने वायफाय राऊटर्ससाठी काही मापदंड घालून दिले आहेत. राऊटरच्या खोक्यावर किंवा ई-कॉमर्स वेबसाइट्सवरही विशिष्ट वायफाय राऊटरची माहिती दिलेली असते. त्यातली सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे ८०२.११ या रेंज. राऊटरचा खोका नीट पाहिला तर तुम्हाला त्यावर ८०२.११ए, ८०२.११ एसी वगैरे वगैरे प्रकार लिहिलेले दिसतील. हे प्रत्येक व्हर्जन वेगवेगळं असतं. डेटा ट्रान्सफर, बँडविड्थ, फ्रिक्वेन्सी आणि रेंज या चार महत्त्वाच्या निकषांनुसार राऊटर्स एकमेकांपासून भिन्न ठरतात.
ही यादी तशी खूप मोठी आहे. पण त्यापैकी हे तीन प्रकारचे राऊटर्स घरांसाठी किंवा छोटेखानी ऑफिसेससाठी उत्तमप्रकारे काम करू शकतात. राऊटर विकत घेण्याआधी इंटरनेटचा वापर नेमका कशासाठी आणि कोणत्या डिव्हाइसेससाठी होणार आहे ते निष्टिद्धr(१५५)त करा. मोबाइल, टॅब्स, लॅपटॉप्स, कम्प्युटर्ससाठी ८०२.११ एन किंवा एसी उत्तम प्रकारे काम करू शकतात.
ह्या स्मार्ट डिव्हाइसेसवर ती कोणत्या वायफाय राऊटर्ससोबत चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे लिहिलेलं असतं. तुमच्याकडे असणाऱ्या इंटरनेटचा स्पीड आणि राऊटरचा स्पीड दोन्ही जर का चांगलं असेल तर त्याचा फायदा स्मार्ट डिव्हाइसेसना होतो. फक्त इंटरनेटचा स्पीड चांगला असून उपयोग नसतो. राऊटरचा डेटा ट्रान्सफरचा वेग जर कमी असेल तर डिव्हाइसेसवर इंटरनेटचा वापर मंदावतो.
ह्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फ्रिक्वेन्सी. एकापेक्षा अधिक डिव्हाइसेसवर इंटरनेटचा वापर होत असल्याने त्याचा वेग मंदावण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी फ्रिक्वेन्सी चांगली असेल तर ही अडचण येण्याची शक्यता कमी असते. ५ गीगाहर्ट्झचे राऊटर हे २.४ गीगाहर्ट्झच्या तुलनेत जास्त डिव्हाइसेसना अधिक वेगाने इंटरनेट कनेक्टिव्हिटी देतात. मात्र या दोन्ही राऊटर्समध्ये सतत इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याची क्षमता नाही. त्यामुळे अनेक तास नेट कनेक्टिव्हिटी पुरवल्यानंतर काही सेकंदांसाठी सेवा खंडित होते. तुम्हाला जर सिंगल बँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी हवी असेल तर तुम्ही २.४ किंवा ५ गीगाहर्ट्झचे राऊटर घेऊ शकता. मात्र डय़ुएल बँडसाठी तुम्हाला ५ गीगाहर्ट्झचा राऊटरच उत्तम.
राऊटरचा डेटा ट्रान्सफर रेट आणि फ्रिक्वेन्सी याबरोबरच त्याची रेंजसुद्धा महत्त्वाची असते. घर किंवा ऑफिसच्या आकारानुसार तेवढय़ा रेंजचा राऊटर घ्यावा. सामान्यत: ३५ मीटर रेंज असणारे राऊटर्स घरांसाठी चांगल्या प्रकारे काम करतात. पण हा राऊटर घरात किंवा ऑफिसमध्ये कुठे लावता यावर बरंच काही अवलंबून असतं. एका खोलीत एका कोपऱ्यात लावलेल्या राऊटरची रेंज इतर खोल्यांमध्ये कमी येणं ही नेहमीची अडचण. त्यामुळेच घराच्या मध्यभागी राऊटर लावणं कधीही चांगलं.

प्रोटोकॉल                  डेटा ट्रान्सफर                      बँडविड्थ             फ्रिक्वेन्सी                  रेंज
८०२.११                      जी ५४ एमबीपीएस            २० MHz                 २.४ GHz          ३८ मी
८०२.११                      एन १३५ एमबीपीएस          ४० MHz             २.४/५vGHz        ७० मी
८०२.११                       एसी ८०० एमबीपीएस         १६० MHz             ५ GHz               ३५ मी

पुष्कर सामंत – pushkar.samant @gmail.com