लिहिते व्हा!

ब्लॉग कसा तयार करावा?

साल २०१७ अवघ्या सहा दिवसांत निरोप घेणार आहे. सरत्या वर्षांचा निरोप आणि नववर्षांचे स्वागत याच्या तयारीत सगळेच लागले असल्याने सध्या सर्वत्र जल्लोषाचा माहोल आहे. नववर्षांचे जल्लोषात स्वागत करताना प्रत्येक जण काही ना काही तरी संकल्प करत असतोच. यातील अनेकांचे संकल्प अवघ्या काही दिवसांत मोडून पडतात. पण काही जण निग्रहाने तो तडीसही नेतात. येत्या नवीन वर्षांसाठी काय संकल्प करायचा, असा विचार करत असाल तर, ‘ब्लॉग लेखन’ हा एक चांगला पर्याय आहे. खरं तर लिहिणं हे एक प्रकारे व्यक्त होणं असतं. रोजच्या आयुष्यात आपण अशा काही घडामोडींना, घटनांना, प्रसंगांना सामोरे जात असतो की ज्याबद्दल व्यक्त व्हावं, अशी इच्छा उफाळून वर येत असते. त्यातूनच अनेक जण समाजमाध्यमांवरून व्यक्त होतात. परंतु, या व्यक्त होण्याला एक शिस्त आणि स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल, तर ब्लॉग लिहिणं हा एक चांगला पर्याय तुमच्याकडे आहे.

ब्लॉगचा उपयोग तुम्ही केवळ व्यक्त होण्यासाठीच नव्हे तर तुमच्या आवडीनिवडींबद्दल इतरांना माहिती करून देण्यासाठी, तुमच्या व्यवसायाचा प्रसार करण्यासाठी, एखाद्या आवडत्या ठिकाणाची किंवा खाद्यपदार्थाची इतरांना शिफारस करण्यासाठी किंवा आठवणी शब्दरूपात साठवण्यासाठी करू शकता. सध्या कोणत्याही भाषेत ब्लॉग लेखनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. तुम्हाला ब्लॉगच्या अगदी तयार चौकटी उपलब्ध करून देणारी संकेतस्थळेही उपलब्ध आहेत. तरीही स्वत:चा ब्लॉग सुरू करायचा तर काय करावं, असा प्रश्न पडत असेल तर हे वाचा.

ब्लॉग कसा तयार करावा?

 • गुगलचे ब्लॉगर डॉट कॉम(com) हे संकेतस्थळ तुम्हाला विनामूल्य ब्लॉग तयार करण्याची सुविधा देते.
 • या संकेतस्थळाला भेट देऊन तुमच्या गुगल अकाऊंट अर्थात जीमेलच्या लॉगइन नावाने साइन इन करा.
 • तुम्ही ‘लॉगइन’ करताच समोर दिसणाऱ्या डॅशबोर्डवर तुमचे ब्लॉग किंवा त्याला भेट देणाऱ्यांची संख्या अशी माहिती दिसेल.
 • नवा ब्लॉग लिहिण्यासाठी ‘न्यू ब्लॉग’वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर टायटल आणि अ‍ॅड्रेससाठी विचारणा होईल.
 • ‘Title’ म्हणजे तुमच्या ब्लॉगचे नाव आणि तुमच्या ब्लॉगचा पत्ता (internet address) जो कायमस्वरूपी असेल. तो तुम्हाला बदलता येणार नाही. तुम्ही शीर्षक व पत्ता तुम्ही ज्या विषयावर लिहिणार असाल त्यानुसार निवड करून तेथे नोंदवा. तुमचा ब्लॉग तयार झाला आहे.
 • आता या ब्लॉगवर नवीन लेख लिहण्याकरिता New Post क्लिक करा त्यानंतर एक नवीन पान उघडेल जिथे तुम्ही तुमचा ब्लॉग लिहू शकाल .
 • या पेजवर पहिल्या भागात Post Title दिसेल जे तुमच्या ब्लॉगचे अर्थातच लेखाचे नाव असणार आहे. दुसऱ्या भागात blog formatting ¨FZ tools दिसतील. जिथे तुम्हाला टायपिंग करून लेख लिहिता येईल.
 • ब्लॉग लिहीत असताना लिखाण पूर्ण झालेले नसेल तर ” Save” वर क्लिक करून ते सुरक्षित ठेवता येईल. एखादा विषयानुरूप फोटो जोडल्यास ब्लॉग अधिक उठावदार होतो. तो फोटोही तुम्हाला इथे जोडता येतो.
 • तसेच ब्लॉग पब्लिश करण्यापूर्वी तो वाचकांना कसा दिसेल हे पडताळून बघण्याकरिता Preview वर क्लिक करा आणि ब्लॉग पूर्ण लिहून झाल्यावर ” Publish” या बटणवर क्लिक करून प्रसिद्ध करा.

ब्लॉगलेखनाचे फायदे

 • कोणत्याही विषयावर व्यक्त होता येतं.
 • लेखन, छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती अशा कोणत्याही माध्यमातून ब्लॉग करता येतो.
 • तुमचे लेखन केवळ देशातच नव्हे तर जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवता येते.

लक्षात ठेवा

तुम्ही लिहिलेल्या ब्लॉगवरील मतांशी प्रत्येक जण सहमत असेलच असे नाही. यातील काही जण ब्लॉगच्या खालील प्रतिक्रिया जागेत तुमच्या मतांविरुद्धची मते नोंदवू शकतात. मात्र, याबद्दल चिडून अथवा निराश होऊन प्रत्युत्तर करणे योग्य नाही. ब्लॉगवर नोंदवण्यात येणाऱ्या प्रतिक्रियांकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. तुमच्या ब्लॉगवर मतप्रदर्शन करणं, हा ब्लॉगवाचकांचा हक्क आहे. त्यांच्या मताचा आदर ठेवा.

मराठी टायपिंग

ब्लॉग मराठीत टाइप करण्याकरिता गुगलचीच मदत घ्या.  http://www.google.com/intl/mr/inputtools/try/ या वेबसाइटला भेट द्या. इथे इंग्लिशमध्ये टाइप करा ते मराठीत दिसेल. ते कॉपी करून ब्लॉगमध्ये पेस्ट करा

– प्रा. योगेश  हांडगे

(handgeyogesh@gmail.com)

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: How to create a blog on blogger

ताज्या बातम्या