• मला मोबाइलवर इंग्रजी टेक्स्ट स्कॅन करून त्याचा उपयोग कॉम्प्युटरवर करायचा आहे. यासाठी उपयुक्त अ‍ॅप सुचवा. – अच्युत पांढरे

तुम्ही आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यातून एखाद्या मजकुराचा फोटो काढून तो टेक्स्टमध्ये सहज मिळवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला अँड्रॉइड प्ले स्टोअरवर उपलब्ध अ‍ॅपची मदत घ्यावी लागते. अशा प्रकारची सुविधा देणारे अनेक अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. मात्र. यापैकी टेक्स्ट फेअरी -ओसीआर टेक्स्ट स्कॅनर (Text Fairy (OCR Text Scanner) हे चांगले अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही मजकुराचा फोटो काढून अर्थात स्कॅन करून त्याचे टेक्स्टमध्ये रूपांतर करू शकता. यामध्ये उपलब्ध झालेला मजकूर एडिट अर्थात संपादित करण्याची सुविधाही आहे. अशा प्रकारच्या अ‍ॅपमधून केलेला सर्वच मजकूर अचूक असेल असे नाही. मात्र, इंग्रजी भाषेतील मजकुराच्या बाबतीत चुकांची शक्यता कमी आहे. तरीही कन्व्हर्ट झालेला मजकूर पडताळून पाहण्यास विसरू नका.

  • मला व्हॉटसअ‍ॅप मोबाइलवरून लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून हाताळायचे आहे. काय करता येईल?

‘व्हॉट्सअ‍ॅप’ मोबाइलशिवाय संगणकावरून हाताळण्याची सुविधा व्हॉट्सअ‍ॅपने बऱ्याच आधीपासून पुरवली आहे. यासाठी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जन अपडेटेड असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या इंटरनेट ब्राऊजरमध्ये जाऊन ‘https://web.whatsapp.com/’ हे संकेतस्थळ सुरू करा. तुमच्या समोर येणाऱ्या स्क्रीनवर तुम्हाला एक क्युआर कोड दिसेल.  त्यानंतर तुम्ही मोबाइलमधील व्हॉट्सअ‍ॅप सुरू केल्यानंतर उजवीकडील कोपऱ्यात वरच्या बाजूस तीन उभी टिंबे असलेल्या बटणावर क्लिक करताच पॉपअप होणाऱ्या स्क्रीनवर तुम्हाला ‘व्हॉट्सअ‍ॅप वेब’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच तुम्हाला कोड स्कॅन करण्यासाठी विचारणा होईल. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या स्क्रीनवर दिसणारा कोड यातून स्कॅन करताच तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते तेथे दिसू लागेल. आता तुम्ही तुमच्या संगणकावरून व्हॉट्सअ‍ॅपचा सहज वापर करू शकाल.