मोबाइल इंटरनेटचा बोलबाला!

प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्यामुळे आपल्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल झाला आहे

कोणे एके काळी ‘डेस्कटॉप’ हा संगणकीय पद्धतीचा आत्मा होता. मोबाइलवर इंटरनेट अवतरण्यापूर्वी आणि लॅपटॉप, टॅब्लेटच्या जन्मापूर्वी घरात किंवा कार्यालयातील संगणक हेच संवादाचे, कामाचे माध्यम होते. सहाजिकच इंटरनेट आल्यानंतर ईमेल तपासण्यापासून अन्य कामांसाठी ‘डेस्कटॉप’ संगणकाचाच वापर होत होता. परंतु, काळाच्या ओघात हे चित्र पुसट होत चालले आहे. इतके की, शहरी भागात आता डेस्कटॉपवर इंटरनेट वापरणं जवळपास हद्दपार होत आलंय..

प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्यामुळे आपल्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल झाला आहे. याचाच परीणाम म्हणून आपण अनेक जुन्या गोष्टी मागे टाकत चाचलो आहोत. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत देशातील शहरी भागात डेस्कटॉपवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या तब्बल ६३ टक्क्यांनी घटून नव्वद टक्क्याहून २७ टक्क्यांवर आला आहे. तर ७३ टक्के इंटनेटवापरकर्ते मोबाइलचा वापर करत असल्याची बाब नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात समोर आली आहे.
जगभरातील लोक माध्यमांचा वापर कसा आणि किती करता हे पाहण्यासाठी झेनिथतर्फे सर्वेक्षण करण्यात येते. या सर्वेक्षणानुसार भारतात शहरांमध्ये सुमारे ४९ टक्के लोक सर्वाधिक वेळ टीव्ही पाहतात. तर त्या खालोखाल २२ टक्के लोक कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत घराबाहेर वेळ घालवण्यास प्राधान्य देतात. यानंतर तिसरा पसंती क्रम आहे तो इंटरनेटला. देशातील शहरी भागांतील १६ टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात. हाच टक्का २०१०मध्ये चार टक्के इतकाच होता. उर्वरीत लोक वृत्तपत्र आणि नियतकालिके वाचणे पसंत करतात. २०१०मध्ये इंटरनेट वापरकरणाऱ्यांपैकी ९० टक्के लोक डेस्कटॉपवर इंटरनेटचा वापर करत होते. मात्र हेच प्रमाण २०१६मध्ये २७ टक्क्यांपर्यंत खाली आले असून ७३ टक्के लोक मोबाइलवर इंटरनेट वापरण्यास पसंती देत आहेत. वृत्तपत्र वाचन, टीव्ही पाहणे, रेडिओ ऐकण, चित्रपट पाहणे, इंटरनेटचा वापर करणे याचा अभ्यास या अहवालामध्ये केला जातो. यंदा हा अभ्यास ७१ देशांमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये करण्यात आला.
जगभरात मोबाइलवर इंटरनेट वापर करणाऱ्यांच्या संख्येत २७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर डेस्कटॉपवर इंटनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या ३.४ टक्क्यांनी घसरली आहे. एकूणच सर्व माध्यमांचा वापर करण्यांची संख्या १.४ टक्क्यांनी वाढली आहे. याचबरोबर डेस्कटॉपचा वापराची गती मंदावल्याची नोंदही अहवालात करण्यात आली आहे. २०१०मध्ये दिवसाला माणसी ३६ मिनिटे डेस्कटॉप वापरण्याची नोंद करण्यात आली होती. हा वापर वाढून २०१४मध्ये ५४ मिनिटांपर्यंत पोहोचला होता. मात्र २०१५पासून मोबाइलचा वापर लक्षणीय वाढला असून एका वर्षांच्या अवधीत वापरकर्ते दिवसाला ८६ मिनिटे मोबाइलवर इंटरनेट वापरण्यासाठी देऊ लागली तर डेस्कटॉप वापरण्याची वेळ ३६ मिनिटांपर्यंत आली. तर या वर्षभरात मोबाइल इंटरनेटचा वापर जगभरात २७.७ टक्क्यांनी वाढणार असून डेस्कटॉपवर इंटरनेट वापरण्याचे प्रमाण १५.८ टक्क्यांनी घटेल असे भाकीतही अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर माध्यमांच्या वापरांसाठी लोक मोबाइलवर अवलंबून राहणार असून सर्व पारंपरिक माध्यमांच्या वापरात घट होणार असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mobile internet dominance