आपल्याला वाय-फाय पाहिजे असेल तर चांगला राऊटर असणे तितकेच महत्त्वाचे असते. राऊटर चांगला नसेल तर वाय-फायचा लाभ घेता येत नाही. सध्या एका घरात किमान चार इंटरनेट जोडणी असलेली उपकरणे असतात. यामुळे लहान क्षमतेचे राऊटर्स पुरेनासे होतात. लोकांची हीच गरज लक्षात घेऊन असूस या कंपनीने नुकताच आरटी-एसी ३२०० हा राऊटर बाजारात आणला आहे. पाहू या कसा आहे हा राऊटर.

रचना आणि सुविधा
नॅनो तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टी छोटय़ा होऊ लागला आहे. मोठा सेट टॉप बॉक्सही आता अगदी छोटय़ा चौकोनी डबीच्या आकारात उपलब्ध होऊ लागला आहे. यामुळे घरात जी काही उपकरणे घेतली जातात ती अगदी कमी जागा व्यापतील अशी आहेत का हे आधी पाहिले जाते. मात्र असूसने बाजारात आणलेला आरटी-एसी ३२०० हा राऊटर इतर उपकरणांच्या तुलनेत अवाढव्य दिसतो. मोठय़ा आकाराच्या या राऊटरचे वजनही एक किलोपर्यंत आहे. हा राऊटर भक्कम बनविण्यात आला असून यामध्ये रोबस्ट प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. या राऊटरची क्षमता जास्त असल्याने अर्थातच त्याचा वापरही जास्त होतो. यामुळे तो तापणार हे निश्चितच. या सर्व पाश्र्वभूमीवर राऊटरला हवा खेळती राहण्यासाठी चांगली जागा देण्यात आली आहे. याचबरोबर तळाला चार रबराचे पायही देण्यात आले आहे, यामुळे तो टेबलवर चांगल्या प्रकारे राहू शकतो. पुढच्या बाजूस एलईडी दिवे देण्यात आले आहेत ज्यांच्या रंगसंगतीमुळे आपल्याला किती नेटवर्क मिळत आहे याचा अंदाज घेता येणे शक्य होते. याच्या पुढच्या बाजूस यूएसबीचा ३.० पोर्ट देण्यात आला आहे. याचा फायदा म्हणजे आपल्याला जर कधी पेनड्राइव्ह वापरून काही गोष्टी शेअर करण्यासाठी होऊ शकतो. याचबरोबर वाय-फाय राऊटरला एखादे उपकरण जोडण्यासाठीही होऊ शकतो. प्रिंटर जोडण्यासाठी राऊटरला यूएसबी २.० पोर्ट देण्यात आला आहे.
राऊटरच्या पुढच्या बाजूला दोन बटने देण्यात आली आहेत. यापकी एक राऊटर बंद-चालू करण्यासाठी तर एक एलईटी दिवे बंद-चालू करण्यासाठी आहे. याशिवाय मागच्या बाजूस एक डब्लूपीएस बटन देण्यात आले आहे. राऊटरला जर कोणते उपकरण जोडायचे असेल तर या बटनाचा वापर होऊ शकतो. यामध्ये चार गिगाबाइटचा इथरनेटपोर्ट देण्यात आले आहे. याशिवाय राऊटर डीफॉल्ट सेटिंग्जमध्ये सुरू करावयाचा असेल तर यासाठी रीसेटचे बटन देण्यात आले आहे. राऊटरच्या मागच्या बाजूची बटने कुठे आहेत हे नमके समजत नाही. या राऊटरच्या किचकट रचनेमुळे पहिल्यांदात राऊटर वापरणाऱ्यांना गोंधळायला होण्याची शक्यता आहे. याचबरोबर राऊटला सहा एन्टीना स्टिक्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक लांब अंतरावर आणि जास्तीत जास्त लोकांना इंटरनेट वापरणे सोपे होते. या राऊटरला प्रिंटरची जोडणी करणे अगदी सोपे आहे. यासाठी यूएसबी पोर्ट किंवा वाय-फाय प्रिंटरचा वापर होऊ शकतो. याचबरोबर यावर थ्रीजी किंवा फोरजी डोंगल वापरता येऊ शकतो. पण यामध्ये एक अडचण आहे ती म्हणजे प्रिंटर जोडण्यासाठी जे अ‍ॅप देण्यात आले आहे त्यात एका वेळी एकच उपकरण जोडता येऊ शकते. या राऊटरमध्ये असूस वेब स्टोअरेजच्या माध्यमातून आपल्याला फाइल्स सेव्ह करून ठेवता येऊ शकतात व त्या रिमोटली ऑपरेटही करता येऊ शकतात. याचबरोबर नेटवर्कच्या माध्यमातून विविध उपकरणांमध्ये शेअरही करता येऊ शकतात.

असे चालते राऊटर
हा राऊटर वापरताना यामध्ये नेटवर्कची स्थिरता अधिक जावणवते. याचबरोबर एकाच वेळी अनेक उपकरणे तसेच अनेक वापरकर्त्यांनी इंटरनेटचा वापर करूनही नेटवर्क कमी होत नाही. यावरून राऊटरची क्षमता खूप चांगली असल्याचे स्पष्ट होते. या राऊटरच्या माध्यमातून सेकंदाला ७० एमबीपर्यंतचा वेग वापरकर्त्यांना मिळतो. मात्र राऊटमध्ये देण्यात आलेल्या यूएसबी ड्राइव्हमधून माहिती देवाणघेवाण करण्याचा वेग खूप कमी आहे. हा वेग ३०.१ एमबी प्रति सेकंदापर्यंत आहे.

थोडक्यात
हा राऊटर इंटरनेट जोडणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मात्र यामध्ये देण्यात आलेल्या इतर सुविधा वापरताना काही अडचणी जावतात. यात प्रामुख्याने एका वेळी एकच प्रिंटरची जोडणी होणे, यूएसबीचा वेग कमी असणे अशा काही अडचणी आहेत. मात्र तरीही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या या दर्जाच्या राऊटर्समध्ये हा राऊटर्स उजवा ठरतो.
नीरज पंडित – niraj.pandit@expressindia.com