किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी टाकी खोदणं हे प्राथमिक काम होतं. पण राज्यविस्ताराबरोबर अनेक किल्ल्यांवर भरभक्कम, विस्तीर्ण तळी आणि खंदकांचे बांधकाम झाले.

मागील लेखात आपण गडकिल्ल्यांवरील पाण्याची मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्राथमिक सुविधा पाहील्या. पण जेव्हा एखादा किल्ल्यावर राबता वाढतो, तो किल्ला राजकिय कारणाने महत्त्वाचा होत जातो, लष्करीदृष्टय़ा त्याचे महत्त्व वाढते किंवा तो किल्ला राजधानी होतो  तेव्हा त्या किल्ल्यावरील पाणी सुविधादेखील तितक्याच मोठय़ा प्रमाणात विकसित करावि लागते.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
Attack on hotel businessman
आपटे रस्त्यावर हॉटेल व्यावसायिकावर हल्ला करणारे गजाआड; संपत्तीच्या वादातून मेहुण्याकडून मध्य प्रदेशातील पहिलवानांना सुपारी

अशा मोठय़ा किल्ल्यांवर पाणीपुरवठय़ासाठी तलाव खोदले जातं. रायगडवरील ‘गंगासागर तलाव आणि हत्ती तलाव’ तर सर्वाना परिचित आहेत. या तलावातून तसेच किल्ल्यांवर खोदलेल्या टाक्यांमधून निघणारा दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला जात असे. नैसर्गिकरीत्या तयार झालेले तलावही काही किल्ल्यांवर पाहायला मिळतात. त्यात भुदरगडावरचा दुधसागर तलाव, टंकाई किल्ल्यावरचा तलाव, नरनाळा किल्ल्यावरचा शक्कर तलाव इत्यादी मोठे तलाव आहेत. अहिवंतगड, महिमतगड, इत्यादी अनेक किल्ल्यांवर बांधीव तलाव पाहायला मिळतात. गडावरचे पाण्याचे नैसर्गिक स्रोत, उतार, पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग यांचा अभ्यास करून असे तलाव बांधलेले आढळतात. बांधीव तलावाच्या चारही बाजू दगडांनी बांधून घेतलेल्या असतात. धारूर, उदगीर इत्यादी किल्ल्यांवर विहारासाठी खास तलाव बांधलेले आहेत. तलावात पाणी सोडण्यासाठी एका बाजूला चुन्यात कोरलेली नक्षीदार पन्हाळी आहे. किल्ल्याबाहेरील तलावातून खापरी नळांच्या (पाईपांच्या) द्वारे आणलेले पाणी या तलावात सोडले जात असे. धारूर किल्ल्यात असलेल्या तलावाच्या वरच्या बाजूस ‘हवामहाल’ आहे. तलावाच्या पाण्यावरून येणारी हवा गार होऊन या हवामहालात येते. अंकाई किल्ल्यावर कातळात कोरलेला एक सुंदर तलाव आहे. त्याच्या मध्यभागी अगस्ती ऋषींची समाधी आहे.

औसा या लातूर जिल्ह्यतील किल्ल्यात दगडात बांधून काढलेला मोठा चौकोनी तलाव आहे. याला ‘जलमहाल’ या नावाने ओळखतात. या तलावाच्या एका बाजूला आत उतरण्यासाठी जिना आहे. विजेरी घेऊन यात उतरावे लागते. खाली उतरल्यावर आतमध्ये अनेक कमानी असलेला महाल पाहायला मिळतो. हा महाल बरोबर तलावाच्या खाली येतो. या महालात हवा आणि प्रकाश आत येण्यासाठी छतामध्ये झरोके अशाप्रकारे बांधलेले आहेत की त्यांचे तोंड तलावाच्या पाण्याच्या पातळीच्या वर उघडेल. यामुळे तलावात पाणी भरले तरी महालाच्या छतामध्ये असलेल्या झरोक्यातून पाणी खाली येत नसे. या महालाचा उपयोग उन्हाळ्याच्या दिवसात राहण्यासाठी केला जात असे. जमिनीखाली बांधलेला महाल व वर असलेले तलावातील पाणी यामुळे महालात गारवा असे.

धारूर किल्ल्यात दोन वैशिष्टय़पूर्ण तलाव आहेत. त्यांना गोडी दिंडी आणि (सोलापूर) खारी दिंडी या नावांनी ओळखतात. गोडी दिंडी हा अर्धगोलाकार तलाव दगडात कोरून काढलेला आहे. या तलावाच्या दक्षिणेला तटबंदी असून त्यापलीकडे खंदक आहे. तलावाच्या पश्चिमेला दरी असून त्या बाजूची भिंत (४० मीटर लांब ७ मीटर रुंद व १२ मीटर उंच) दरीतून बांधून काढलेली आहे. या तलावाची प्रस्तर खोदून केलेली रचना बघता या तलावाचा उपयोग किल्ल्याला दोन प्रकारे होत होता. संकटकाळी किल्ल्याचे संरक्षण व इतर वेळी वर्षभर पाणीपुरवठा करणारा तलाव.

उस्मानाबाद जिल्ह्यतील नळदुर्ग किल्ला म्हणजे पाण्याचा विविध प्रकारे वापर कसा करता येईल याचा वास्तुपाठ आहे. किल्ल्यातील सर्वात आकर्षक वास्तू म्हणजे ‘जलमहाल’ नळदुर्गाच्या चारही बाजूला खंदक आहे. तुळजापूरहून वाहत येणाऱ्या बोरी नदीचे पात्र वळवून पाणी खंदकात खेळवून संपूर्ण किल्ल्याला संरक्षण दिले आहे. या नदीवर म्हणजेच खंदकावर दुसऱ्या आदिलशहाच्या काळात एक बंधारा बांधला गेला. या बंधाऱ्याच्या एका टोकाला नळदुर्ग तर दुसऱ्या टोकाला किल्ल्याचा जोडकिल्ला रणमंडळ आहे. हा बंधारा १७४ मी. लांब, अडीच ते चौदा मी. रुंद आणि १९ मी. उंच आहे. या बंधाऱ्याच्या आतमध्ये जलमहाल आणि गणेश महाल असे दोन महाल बांधलेले आहेत. जलमहालाच्या दोन्ही बाजूला पाणी जाण्यासाठी नल (नर) आणि दमयंती (मादी) या नावाच्या दोन मोऱ्या ठेवलेल्या आहेत. पावसाळ्यात या मोऱ्यांमधून पाणी वाहते तेव्हा महालातून अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. बंधारा पूर्ण भरल्यावर नदीचे पाणी या बंधाऱ्यावरून वाहते, पण आतील भागात असणाऱ्या एका वास्तूलासुद्धा त्याचा स्पर्श होत नाही. या जलमहालाच्या वरून जेव्हा पाणी पडते, तेव्हा त्याच्या गवाक्षात उभे राहून समोरचा पाण्याचा पडदा पाहण्यास एक वेगळीच मजा येते. या पाणीमहालाच्या निर्मात्याचे नाव आहे मीर इमादीन. या धरणात साठवलेल्या पाण्याचा अनेक प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे. धरणाच्या आतल्या बाजूला एक पाणचक्की बसवलेली आहे. अन्नधान्य दळण्यासाठी त्याचा वापर होत असे. धरणातून सोडलेले पाणी विविध बंधाऱ्यांद्वारे अडवून शेतीसाठी पुरवले जात असे. नळदुर्ग किल्ल्याच्या मागच्या बाजूलाही एक आडवी भिंत बांधून छोटा जलाशय निर्माण केलेला आहे. त्याला मछली म्हणतात. यावरून त्याकाळी या भागात मत्स्य शेतीही होत असावी असा अंदाज करता येतो. भुईकोट किल्ल्यांच्या भोवती जो खंदक खोदला जात असे त्यात आजूबाजूच्या जलस्रोतातले पाणी खेळवले जात असे किंवा खंदक पावसाच्या पाण्याने भरला जाईल याची काळजी घेतली जाई. यामागे संरक्षणाबरोबरच भुईकोट किल्ल्यातील विहिरी, तलाव, पुष्करणी यांना भूजल पुनर्भरणासाठीही याचा उपयोग होत असे.

गंमत म्हणजे वर ज्या तलावांची माहिती दिली आहे ते आजच्या कायम अवर्षणग्रस्त असलेल्या मराठवाडय़ातील किल्ल्यात आहेत. काही शतकांपूर्वी असलेले हे ज्ञान अचानक कुठे गायब झाले हा संशोधनाचा विषय आहे.

मेळघाटातल्या नरनाळा किल्लय़ावरील सर्वच तलाव हे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ तंत्राचा वापर करून बांधलेले आहेत. उतारावरून वाहणारे पाणी बोगदे खणून, कातळात उतार कोरून तलावात आणलेले आहे. नरनाळ्यावरील सर्वात मोठा तलाव म्हणजे शक्कर तलाव. या तलावाच्या उजव्या बाजूस उतारावरून वाहणारे पाणी तलावात वळवण्यासाठी कमानदार बोगदा बांधून काढलेला आहे. तलावाच्या डाव्या बाजूस कातळ आहे. या कातळावर पडणारे पावसाचे पाणी तलावातच जावे यासाठी कातळात ठिकठिकाणी चर कोरून काढलेले आहेत.

नैसर्गिक आणि बांधीव तलावांव्यतिरिक्त गडांवर साचपाण्याचे तलाव असतात. पावसाचे पाणी खोलगट भागात साचून अशा प्रकारचे तलाव तयार होत. पावसाळ्यानंतरचे काही महिने या तलावात पाणी राहाते. किल्ल्यांवर पुष्कर्णीही बांधलेल्या पाहायला मिळतात. हरिश्चंद्रगड, कुलाबा इत्यादी किल्ल्यांवर पुष्कर्णी बांधलेल्या पाहायला मिळतात.

किल्ल्यावर टाक तलावांव्यतिरिक्त विहिरीही पाहायला मिळतात. मसुरे गावात कालावल खाडीकाठी मोक्याच्या जागी उभ्या असलेल्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी १६७०मध्ये शिवरायांनी पाहणी केली होती. पण डोंगरावर पाण्याची सोय नसल्यामुळे येथे गड बांधण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. १६८० साली वाडीकर फोंड सावंतांनी गावाजवळील डोंगरावर किल्ला बांधण्याचे ठरविले. त्यासाठी प्रथम त्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली. २२८ फूट खोल खोदल्यावर विहिरीला पाणी लागले.

नागपूरजवळ असलेला नगरधन किल्ला येथे वाकटाकांची राजधानी होती. या किल्ल्यात वैशिष्टय़पूर्ण विहिरी पाहायला मिळतात. किल्ल्यात भुयारीदेवीचे मंदिर एका विहिरीत आहे. येथे पाण्याच्या टाक्याजवळ देवीच्या मूर्तीची स्थापना करून पाण्याच्या स्रोताचे पावित्र्य जपले आहे. या मंदिरात जाण्यासाठी काळोख्या जिन्याने खाली उतरावे लागते. खालच्या भागात उन्हाळ्याच्या दिवसात विश्रांती घेण्यासाठी दालन बनविलेले आहे. जमिनीच्या पोटात व पाण्याच्या सान्निध्यात हे दालन असल्यामुळे विदर्भाच्या उन्हाळ्यातही येथे गारवा जाणवतो. याच किल्लय़ात एक चौकोनी हौद आहे. या हौदात जमिनीच्या खाली १० फुटांवर एक विहीर खोदलेली आहे. हौदात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. विदर्भातील कडक उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्याचे कमीत कमी बाष्पीभवन व्हावे यासाठी ही रचना करण्यात आलेली आहे. विहिरीच्या पुढच्या बाजूस राजवाडा किंवा महालाचा चौथरा आहे. या महालात ४ बाजूंनी पायऱ्या असलेला एक उथळ हौद आहे. पूर्वीच्या काळी या हौदात कारंजा व कमळाची फुलं ठेवून महालाची शोभा वाढवली जात असावी.

धुळ्याजवळ असलेल्या सोनगीर किल्ल्यावर एक बाव (विहीर) आहे. आत कितीही डोकावले तरी तळाकडील पाणी काही दिसत नाही, याची खोली ही दहामजली इमारती एवढी आहे असे म्हणतात. याच्याच थोडेसे पुढे पुष्करणी आहे. पूर्वी या विहिरीतून पाणी काढून पुष्करणीत साठविले जात असावे.

जलदुर्गावर आपण फिरतो तेव्हा त्यावरील गोडय़ा पाण्याच्या विहिरी पाहून आपण चकीत होतो. चारी बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेल्या किल्ल्यात गोड पाणी येते कुठून. त्यामागील भौगोलिक सत्य असे आहे- बेट आणि समुद्रकिनारा एकाच सलग प्रस्तराने जोडलेले असतात.  त्यामुळे किनाऱ्यावरील जमिनीत झिरपणारे पाणी प्रस्तराखालून वाहत असल्यामुळे बेटावरच्या विहिरीत येते. या पाण्याचा उपसा व्यवस्थित करावा लागतो अन्यथा आजूबाजूला असलेले खारे पाणी विहिरीत येऊन गोडय़ा पाण्याचे स्रोत कायमचे बंद होऊ  शकतात. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील दुधबाव, दहीबाव या गोडय़ा पाण्याच्या विहिरी अशाप्रकारच्या गोडय़ा पाण्याच्या स्रोतांचे उत्तम उदाहरण आहे. सर्वच बेटांवर अशाप्रकारे भूगर्भातले गोड पाणी मिळत नाही. अशावेळी साच पाण्याचे, तलाव टाकी बांधले जातात. त्यात पावसाचे पाणी साठवून वर्षभर वापरले जाते. जंजिरा, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग इत्यादी जलदुर्गावर अशा प्रकारची रचना केलेली पाहायला मिळते.
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com