किल्ल्यांच्या संरक्षण व्यवस्थेतले महत्त्वाचे घटक म्हणजे तटबंदी आणि बुरूज. वरवर बघताना त्यांची रचना साधी वाटली तरी प्रत्यक्षात मात्र त्यात खूप बारकावे आहेत. या बारकाव्यांचा अभ्यास केला तर आपल्या पूर्वजांचा स्थापत्यशास्त्रातला अधिकार लक्षात येतो.

एखाद्या भूभागाला, डोंगराला, बेटाला तटबंदी आणि बुरुजांचा साज चढवला की त्या भागाचे किल्ल्यात रूपांतर होते. किल्ल्यवर लांबलचक पसरलेली तटबंदीची माळ आणि त्यात मण्यांसारखे गुंफलेले बुरूज आपल्यासमोर संपूर्ण किल्ल्याचं चित्र उभं करतात. फार पूर्वी लाकडी फळ्या आणि मातीच्या भिंती बांधून तटबंदी बनवली जात असे. जसजसे स्थापत्यात प्रगती होत गेली तसतसे त्यानंतरच्या काळात तटबंदीच्या बांधणीसाठी विटा, घडीव दगड यांचा वापर सुरू झाला.

Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

भुईकोटासाठी सरळ तटबंदी तर गिरिदुर्ग अणि जलदुर्गासाठी त्यांच्या आकाराप्रमाणे सर्पिलाकार तटबंदी बांधण्यात येऊ लागली. तटबंदी बांधताना आतल्या आणि बाहेरील बाजूच्या भिंती घडीव दगडाने बांधून दगड एकमेकांशी चुन्याने सांधले जात असत. बाहेरील भिंतीची जाडी आणि उंची आतील भिंतीपेक्षा जास्त ठेवलेली असे. या दोन भिंतींमधील जागेत छोटे-मोठे दगड भरून सपाटी तयार करण्यात येते. त्यास फांजी असे म्हणतात. तटबंदीवर पहारेकऱ्यांना गस्त घालण्यासाठी या फांजीचा उपयोग होत असे. किल्ल्याच्या बाहेरील बाजूकडील तटबंदी उंच असल्यामुळे युद्धकाळात बाहेरून होणाऱ्या हल्ल्यापासून सैनिकांचे संरक्षण होत असे. या फांजीची रुंदी प्रत्येक किल्ल्यावर वेगवेगळी पाहायला मिळते. काही किल्ल्यांवर एक माणूस फिरेल एवढीच फांजी पाहायला मिळते, तर काही किल्ल्यांवर तोफेचा गाडा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येईल इतकी रुंद फांजी पाहायला मिळते. फांजीवर पोहोचण्यासाठी तटबंदीत ठिकठिकाणी जिने बनवलेले असतात. तटबंदीआडून स्वत: सुरक्षित राहून शत्रूवर हल्ला करता यावा यासाठी वेगवेगळ्या उंचीवर आणि कोनात उभी आयताकृती छिद्रे ठेवलेली असतात त्यांना जंग्या म्हणतात. या जंग्यांची रचना अशा प्रकारे केलेली असते की किल्ल्याच्या आतून शत्रू सैनिकाला बंदुकीच्या किंवा बाणाच्या साहाय्याने सहज टिपता येईल, पण शत्रूला बाहेरून जंग्यांच्या आत मारा करता येणार नाही. किल्ल्यातील सैनिकाला एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणचा किंवा हलता शत्रू टिपता यावा यासाठी एकाच ठिकाणी तीन ते चार वेगवेगळ्या अंशाच्या कोनांत जंग्या बनवलेल्या पाहायला मिळतात. तटबंदीच्या वर पाकळ्यांच्या किंवा त्रिकोणी किंवा पंचकोनी आकाराचे दगड बसवलेले पाहायला मिळतात. त्यांना चर्या म्हणतात. या चर्यामुळे किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडतेच, पण चर्याच्या आड दडून वेळप्रसंगी शत्रूवर माराही करता येतो.

किल्ल्यावर शत्रूच्या हल्ल्याच्या दृष्टीने नाजूक भागात तटबंदी बांधताना दुहेरी आणि तिहेरी तटबंद्या बांधल्या जातात. विजयदुर्ग किल्ल्यावर आपल्याला तिहेरी तटबंदी पाहायला मिळते. समुद्रालगत असलेली पहिली तटबंदी ३० फूट उंचीची आहे. त्यानंतरची दुसरी तटबंदी १० फूट उंचीची आणि मुख्य किल्ल्याची तिसरी तटबंदी ३० फूट उंच आहे. या प्रकारच्या तटबंदीमुळे शत्रूच्या हल्ल्यात पुढील तटबंदी कोसळली तरी मागच्या तटबंदीच्या आडोशाने हल्ला चालू ठेवता येतो. राजगडावरील संजीवनी माचीला दुहेरी नाळयुक्त तटबंदी आहे. यात दोन तटबंदींच्या मध्ये नाळ (अरुंद मोकळी जाग) ठेवलेली असते. बाहेरची तटबंदी शत्रूच्या हल्ल्यात कोसळल्यास शत्रू या नाळेत (अरुंद जागेत) प्रवेश करतो. यामुळे त्याच्या हालचालींवर आणि संख्येवर बंधने येतात. आतील तटबंदी या तटबंदीपेक्षा उंच असल्याने शत्रूला टिपून मारता येते.

नगरचा किल्ला, यशवंतगड इत्यादी किल्ल्यांवर तटबंदीत पहारेकऱ्यांसाठी खोल्या, भांडारगृह यांची निर्मिती केलेली पाहायला मिळते. वर्धनगडसारख्या अनेक किल्ल्यांवर तटबंदीतून चोरदरवाजे काढलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड स्वच्छ राहावा तसेच पहाऱ्यावर असलेल्या सैनिकाला नैसर्गिक विधींसाठी दूर जायला लागू नये यासाठी सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजगड इत्यादी अनेक किल्ल्यांवरील तटबंदीत शौचकूप बांधलेले पाहायला मिळतात. तटबंदीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तटबंदीत नक्षीदार सज्जे बांधलेले पाहायला मिळतात. पिलिवचा किल्ला, गाळणा किल्ला इत्यादी किल्ल्यांच्या तटबंदीत असे नक्षीदार सज्जे आहेत.

सह्यद्रीत अनेक गिरिदुर्गावर आपल्याला घडीव दगड एकमेकांवर ठेवून बांधलेली तटबंदी पाहायला मिळते, तर काही ठिकाणी तटबंदीच नसते. याचे कारण म्हणजे किल्ल्याच्या त्या भागाचे स्थान आणि अभेद्यपणा. त्यामुळे किल्ल्यावर आवश्यक त्या ठिकाणीच तटबंदी बांधलेली पाहायला मिळते.

बुरूज :- तटबंदीवरून शत्रूवर मारा करण्यासाठी बंधनं येतात. एकमेकांना जोडणाऱ्या दोन सरळ तटबंदीच्या किंवा सर्पिलाकार आकारामुळे निर्माण होणाऱ्या कोनातूनच शत्रूवर मारा करता येत असे. यावर तोडगा काढण्यासाठी बुरुजांची रचना करण्यात आली. बुरूज हे मोक्याच्या जागी तटबंदीतून बाहेर डोकावणारे बांधण्यात आले. त्यांच्या गोल, चौकोनी, षटकोनी, चांदणीसारख्या इत्यादी आकारांमुळे चहुदिशांना हल्ला करता येऊ  लागला. तटबंदीपासून पुढे आलेल्या बुरुजांमुळे तटबंदीला भिडणाऱ्या शत्रूला बुरुजांवरून सहजगत्या टिपता येऊ  लागले. बुरुजांच्या वर मोकळी जागा असल्यामुळे त्यावर तोफांची मांडणी करण्यात आली. तोफांनी विविध दिशांना मारा करण्यासाठी बुरुजावर झरोक्यांची (खिडक्यांची) निर्मिती करण्यात आली. बुरुजाच्या भिंतीत मोक्याच्या जागा पाहून जंग्यांची निर्मिती करण्यात आली.

बुरुजाने शत्रूकडून होणारा तोफांचा मारा सहन करावा, तसेच त्यावरील तोफेतून होणाऱ्या माऱ्यामुळे जी कंपनं निर्माण होतात ती सहन करता यावीत यासाठी बुरुजाचा पाया खोलवर खणला जात असे. यासाठीच गिरीदुर्गावर आपल्याला खालच्या कातळकडय़ापासून बुरूज बांधत आणलेला पाहायला मिळतो. बुरुजाचा पायथ्याकडील घेर रुंद तर वरच्या बाजूला कमी झालेलाही पाहायला मिळतो. बुरूज बांधताना बुरुजाच्या आतल्या भागात छोटेमोठे दगड वापरले जातात, तर बाहेरच्या बाजूस मोठे घडीव दगड वापरले जातात. हे घडीव दगड सांधण्यासाठी चुन्याचा वापर केलेला पाहायला मिळतो. खान्देश, मराठवाडय़ातील काही गढय़ांमध्ये मातीचे बुरूज बांधलेले पाहायला मिळतात. बुरुजांना मजबुती यावी यासाठी बाहेरच्या बाजूने विटा किंवा दगडांचा वापर केलेला पाहायला मिळतो. धोत्रीचा किल्ला, पारोळा किल्ला इत्यादी किल्ल्यांत अशा प्रकारची तटबंदी आणि बुरूज पाहायला मिळतात. काही बुरुजांमध्ये पहारेकऱ्यांसाठी खोल्या, भांडारगृह यांची निर्मिती केलेली पाहायला मिळते. अशा प्रकारचे बुरूज आपल्याला जंजिरा, सिंधुदुर्ग, लोहगड इत्यादी किल्ल्यांवर पाहायला मिळतात. बुरुजातून बऱ्याचदा चोरदरवाजे काढलेले दिसतात. अशा प्रकारचे बुरूज आपल्याला सुधागड, सिंधुदुर्ग, इत्यादी किल्ल्यांवर पाहायला मिळतात.

किल्ल्यावरील बुरुजांची संख्या जास्त असल्यामुळे त्याचे स्थान कळण्यासाठी (लक्षात ठेवण्यासाठी) त्या काळी बुरुजांना नावे देण्याची प्रथा होती. बुरुजाच्या वैशिष्टय़ावरून, देवांच्या नावावरून किंवा बुरुज असलेल्या दिशेला किंवा पायथ्याला असलेल्या गावावरून बुरुजांना नावे दिलेली पाहायला मिळतात. गाविलगड किल्ल्यावर ‘बहराम बुरूज’ किंवा ‘बारा खिडकी बुरूज’ नावाचा अप्रतिम बुरूज आहे. या बुरुजात १२ झरोके (खिडक्या) आहेत. मधल्या खिडकीच्या वर फारसीतील शिलालेख कोरलेला दगड बसविलेला आहे. या बुरुजाचे फारसी नाव ‘बुर्ज-ए-बेहराम’ आहे. या बुरुजाचे बांधकाम व किल्ल्याची दुरुस्ती अहमदनगरचा नवाबाचा अधिकारी बहराम याने हिजरी सन ९८५ (इ.स.१५७७) मध्ये केल्याचा उल्लेख आढळतो. याच किल्ल्यातील एका बुरुजाचे नाव मोझरी बुरूज आहे. हे नाव त्या बुरुजाच्या पायथ्याखाली असलेल्या मोझरी गावामुळे पडलेले आहे. बुरुजांची प्रचलित नावे किल्ल्याचे राज्यकर्ते बदलल्यावर बदललेलीही पाहायला मिळतात. वसईचा किल्ला जिंकल्यानंतर त्यावरील बुरुजांची नावेही बदलण्यात आली. बुरुजांबाबत अनेक कथा तसेच दंतकथाही प्रचलित आहेत. पुरंदर किल्ल्यावर बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधलेला आहे, त्याचे नाव शेंदऱ्या बुरूज. शेंदऱ्या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत होता, तेव्हा बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली, त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला अशी अख्यायिका सांगीतली जाते.

अर्धगोल बुरूज :- भुईकोट, जलदुर्ग, गिरिदुर्ग अशा सर्व प्रकारच्या किल्ल्यांवर अर्धगोल बुरूज पाहायला मिळतात. या रचनेमुळे १८० अंशाच्या कोनातून शत्रूवर मारा करता येतो. बुरुजाच्या वरच्या बाजूला भरपूर मोकळी जागा मिळते. त्या ठिकाणी तोफा ठेवता येतात. बुरुजांच्या आकारावरून बुरुजांचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात.

गोल बुरूज :- हे बुरूज बहुधा भुईकोट आणि सागरी किल्ल्यांवर पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी किंवा उंच जागी या बुरुजाची उभारणी केलेली असते. बुरुजावर तोफा ठेवायला जागा असते. या बुरुजावर ध्वजस्तंभ असतो. या बुरुजावरून किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरावर तसेच किल्ल्यात नजर ठेवता येते. अकलूज किल्ल्यावरील आणि नळदुर्ग किल्ल्यावरील उपल्या बुरूज, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील झेंडा बुरूज ही अशा प्रकारच्या बुरुजांची उदाहरणं आहेत.

चौकोनी बुरूज :- सह्यद्रीत चौकोनी बुरूज पाहायला मिळत नाहीत, पण उत्तर महाराष्ट्रात आणि उत्तर भारतातील काही किल्ल्यावर चौकोनी बुरूज पाहायला मिळतात. नागपूरजवळील नगरधन किल्ल्यावर चौकोनी बुरूज पाहायला मिळतात. चौकोनी बुरुजाच्या आकारामुळे शत्रूवर मारा करण्याला मर्यादा पडतात त्यामुळेच हे बुरूज कमी प्रमाणात आढळत असावेत .

षटकोनी बुरूज :- चौकोनी बुरुजामुळे शत्रूवर मारा करताना येणाऱ्या मर्यादांवर मात करण्यासाठी षटकोनी बुरुजांची रचना केलेली पाहायला मिळते. बुरुजाला जेवढे कोपरे जास्त तेवढय़ा शत्रूवर वेगवेगळ्या कोनातून मारा करण्याच्या जागा जास्त मिळतात. नगरधन किल्ल्यावर षटकोनी बुरूज पाहायला मिळतात.

चिलखती बुरुज :- प्रवेशव्दाराच्या बाजूला किंवा शत्रूच्या हल्ल्याच्या दृष्टीने नाजूक ठिकाणी चिलखती बुरूज बांधलेले पाहायला मिळतात. या रचनेत एका बुरुजाच्या आत दुसरा बुरुज बांधलेला असतो. आतील बुरुजाची उंची बाहेरील बुरुजापेक्षा जास्त असते. या रचनेमुळे शत्रूच्या तोफेच्या माऱ्यामुळे बाहेरील बुरूज पडला तरी आतल्या बुरुजावरून शत्रूवर मारा करता येतो. अशा प्रकारचे चिलखती बुरूज रायगड, सुधागड, सिंधुदुर्ग इत्यादी किल्ल्यांवर पाहायला मिळतात.

त्रिकोणी बुरूज :- ठाणे जिल्ह्यतील केळवे समुद्र किनाऱ्यावर केळवे किल्ला आहे. या किल्ल्याच्या चार टोकांना चार वैशिष्टय़पूर्ण त्रिकोणाकृती बुरूज आहेत. या बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी झरोके व बंदुकीतून मारा करण्यासाठी जंग्या आहेत. पोर्तुगीज बांधणीच्या किल्ल्यांमध्ये अशा प्रकारचे बुरूज पाहायला मिळतात.

कॅप्सुल बुरूज :- पोर्तुगीज शैलीतील या बुरुजाचा आकार उभ्या कॅप्सुल सारखा दिसतो. तटबंदीतून बाहेर आलेल्या या बुरुजात जेमतेम एक सैनिक उभा राहील एवढीच जागा असते. बुरुजातून पाहाण्यासाठी एक झरोका असतो. तसेच शत्रूवर मारा करण्याकरिता जंग्या ठेवलेल्या असतात. महाराष्ट्र गोव्याच्या सीमेवरील तेरेखोल किल्ल्यात हे बुरुज पाहाता येतात.

पाकळी बुरूज :- उस्मानाबाद जिल्ह्यतील नळदुर्ग किल्ल्यावर सुंदर पाकळी बुरूज आहे. बुरुजाच्या पाकळ्यांच्या बाहेर आलेल्या भागाचा उपयोग शत्रूवर जास्तीत जास्त कोनांमधून मारा करण्यासाठी केलेला आहे. कल्पकतेने बनवलेला हा बुरूज पाहाताना बनवणाऱ्यांची सौंदर्य दृष्टी दिसून येते.

किल्ल्यावर लांबलचक पसरलेली तटबंदी आणि भव्य बुरूज पाहिल्यावर आपल्याला पहिला प्रश्न पडतो की हे बांधण्यासाठी एवढे दगड आणले कुठुन? किल्ला बांधण्यासाठी दगड किल्ल्यातूनच काढले जातात. नंतर त्या दगडांच्या खाणीचे रूपांतर पाण्याच्या टाक्यात, तलावात केले जाते. अशा प्रकारे किल्ल्यासाठी लागणाऱ्या दगडाची गरज भागून किल्ल्यावर पाण्याचे साठे तयार होतात. हा दगड काढण्यासाठी, त्याला आकार देण्यासाठी छिन्नी हातोडय़ाचा वापर केला जातो. त्याच बरोबर दगड सरळ निघावा यासाठी एक पुरातन पद्धत वापरली जाते. यात जो दगड फोडायचा आहे त्यावर एका सरळ रेषेत त्रिकोणी खाचा केल्या जातात. त्या खाचांमध्ये लाकडाची पाचर घट्ट बसेल अशा प्रकारे मारली जाते. या लाकडावर रोज पाणी ओतले जाते. त्यामुळे लाकूड फुगून त्याच्या जोरामुळे कातळातून दगड वेगळा होतो. अनेक लेण्यांच्या ठिकाणी, किल्ल्यांवर अशा प्रकारचे खाचा असलेले दगड पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग किल्ल्यावरही अशा प्रकारे खाचा असलेला एक दगड पाहायला मिळाला. सिंधुदुर्ग किल्ल्याचे निर्मिती वर्ष १६६४ आहे म्हणजे सतराव्या शतकापर्यंत अशा प्रकारे दगड काढला जात होता. तटबंदी बुरूज बांधण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर चुना लागत असे. चुन्याच्या घाण्याच्या सहाय्याने चुना किल्ल्यावरच बनवला जात असे. चुन्याचा घाणा बनवण्यासाठी कातळावर गोल चर खोदला जात असे. या चराच्या गोलाच्या मधोमध एक खांब रोवून त्या खांबाला आडवा खांब जोडलेला असे. या आडव्या खांबाला दगडी जात्याचे चाक जोडलेले असे. चरात चुना, गूळ, भाताचे तूस आणि पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून त्यावरून जात्याचे दगडी चाक बैल जोडीमार्फत फिरवले जात असे. तयार झालेले मिश्रण साठवण्यासाठी हौद बांधलेले असत. अशा प्रकारचे जाते आणि हौद सिंधुदुर्ग किल्यावर पाहायला मिळतात. याशिवाय माणिकगड, विसापूर, रोहिडा, विजयदुर्ग इत्यादी किल्ल्यांवरही चुन्याचा घाणा पाहायला मिळतो.

तटबंदी आणि बुरूज ही किल्ल्याची प्राथमिक संरक्षण व्यवस्था आहे. त्यासाठी किल्ल्याची बांधणी करताना त्यावर विशेष लक्ष दिले जाते. एखाद्या व्यूहरचनेप्रमाणे किल्ल्याची तटबंदी, बुरूज आणि प्रवेशव्दाराची रचना केली जाते. पाहाताना सोपी वाटणारी पण करायला अतिशय कठीण अशी तटबंदी आणि बुरुजांची रचना असते.
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com