गळतीची सूचना देणारे ‘इलेक्टोमॅग्नेटिक फ्लो मीटर’ बसवणार; शिळफाटा जलवाहिनीवर सर्वप्रथम जोडणी

धरणातील पाणी शहरात पोहचेपर्यंत त्याच्या होणाऱ्या गळतीचे प्रमाण सर्वाधिक असून सुमारे ३० टक्क्य़ांपर्यंत पाणी या गळतीमुळे वाया जाते. यामध्ये पाणी गळतीबरोबर पाण्याच्या चोरटय़ा वापराचाही समावेश आहे. त्यामुळे ही पाणी गळती रोखण्यासाठी जलवाहिनीतून होणाऱ्या पाणी पुरवठय़ाच्या योग्य नोंद आणि पाणी गळतीची त्वरित सूचना देणाऱ्या यंत्रणेची गरज निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जलवाहिन्यांवर ‘इलेक्टोमॅग्नेटिक फ्लो मीटर’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. शिळफाटा येथील जलवाहिनीवर हे मीटर बसवण्यात आले असून त्यामुळे पाण्याच्या गळतीची तात्काळ सूचना देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र औद्य्ोगिक विकास महामंडळाकडून ‘ट्रान्स ठाणे क्रीक’ या औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करताना पाण्याचा अपव्यय टाळता यावा या उद्देशाने शिळफाटा येथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लो मीटर्सची जोडणी करण्यात आली आहे. प्रगत तंत्रज्ञानाद्वारे सुसज्ज अशा या मीटरद्वारे खराब झालेल्या पाइपलाइनमधून पाणी गळती अथवा पाणीचोरी होत असल्यास शीळफाटा येथील संगणक यंत्रणेवर याबद्दलची तात्काळ सूचना पोहचू शकणार आहे. हे मीटर बसविण्यासाठी एमआयडीसीने स्वीस कंपनी एंड्रेस हाऊस सोबत भागीदारी केली आहे. याआधी या कंपनीने पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागासोबत पाण्याच्या स्रोतांना चालना देण्याचा उद्देश असलेल्या प्रकल्पामध्ये काम केले आहे.

पाणी व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक यंत्रणेची मदत

पाणी टंचाईचा सामना करत असताना पाण्याचे योग्य व्यवस्थापन असणे महत्त्वाचे आहे. पाणी व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून जास्तीत जास्त पाणी वाचवण्याचा प्रयत्न एमआयडीसीच्यावतीने करण्यात येत आहे. या नव्या यंत्रणेमुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन होण्यास मदत होऊ शकेल. पाण्याचे योग्य मोजमाप झाल्याने त्यातून अचूक माहिती हाती येणार आहे. अचूक निरीक्षणामुळे पाण्याचा अपव्यय पूर्णपणे टाळता येऊ शकतो, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी दिली.