एकूण सात उपचार केंद्र बंद

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई भागांतील रेल्वे स्थानकांवर वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘वन रुपी क्लिनिक’ म्हणजेच एक रुपयात उपचार करणाऱ्या केंद्रांना रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी टाळे ठोकले. या केंद्रावर चोवीस तास एमबीबीएस डॉक्टर नेमण्याची अट रेल्वे प्रशासनाने घातली होती. मात्र, त्याप्रमाणे डॉक्टरांना काम शक्य होत नसल्याच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका मात्र रेल्वे प्रवाशांना बसणार आहे. असे असले तरी उर्वरित सहा स्थानकांतील उपचार केंद्रांवर चोवीस तास डॉक्टर उपलब्ध होत असल्यामुळे ती सुरू ठेवण्यात आली आहेत.

रेल्वे स्थानक परिसरातील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने वर्षभरापुर्वी दिलेल्या आदेशानुसार स्थानक परिसरात ‘वन रुपी क्लिनिक’ सुरू करण्यात आले होते. ठाणे, कल्याण, डोंबिवली, कुर्ला, घाटकोपर, वडाळा, वाशी, गोवंडी, मुलुंड, मुंब्रा, भायखळा, दादर, मानखुर्द या सर्व स्थानकांमध्ये ही केंद्रे होती. या केंद्रांवर एक रुपयात उपचार केले जात होते.या केंद्रांमध्ये आतापर्यंत ५५ हजार रेल्वे प्रवाशांवर उपचार करण्यात आले असून त्यामध्ये दोन हजार अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचा समावेश आहे. असे असतानाच या केंद्रावर चोवीस तास एमबीबीएस डॉक्टर नेमण्याची अट रेल्वे प्रशासनाने घातली आहे. मात्र, त्याप्रमाणे डॉक्टरांना काम शक्य होत नसल्याने रेल्वे प्रशासनाने सात केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात कल्याण, डोंबिवली, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, वाशी, गोवंडी आणि वडाळा या स्थानकांवरील केंद्रांचा समावेश आहे. यासंदर्भात रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के.जैन यांच्याशी वारंवार संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही. प्रशासनाने ही उपचार केंद्रे बंद करून प्रवाशांच्या उपचारासाठी स्थानक परिसरात कोणतीही दुसरी उपाययोजना केलेली नाही.यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया ‘वन रुपी क्लिनिक’चे संचालक राहुल घुले यांनी दिली.