News Flash

अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी दहा कोटीचा प्रस्ताव

नगररचना विभागाने अशी नियमबाह्य़ उभी राहणारी बांधकामे रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत नव्याने उभी राहत असलेली आणि प्रशासनाने बेकायदा म्हणून घोषित केलेली बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पालिका प्रशासनाने १० कोटी रूपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर या निधीतून अत्याधुनिक यंत्रणेच्या मदतीने बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

कल्याण, डोंबिवली, २७ गावांच्या हद्दीत बेसुमार बेकायदा चाळी, इमारती माफियांकडून उभ्या केल्या जात आहेत. या बांधकामांवर प्रशासनाचा अंकुश नाही. नगररचना विभागाने अशी नियमबाह्य़ उभी राहणारी बांधकामे रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे; याउलट हा विभाग इमारत बांधकामांचे आराखडे मंजूर करीत असल्याची टीका सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली. वेलरासू यांनी ही बेकायदा बांधकामे आधीची  आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर काहीच कारवाई करीत नाहीत, हे नगरसेवकांचे म्हणणे योग्य नाही. आता जी बेसुमार बेकायदा बांधकामे कल्याण, डोंबिवली, २७ गावांच्या हद्दीत सुरू आहेत. ती बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी अत्याधुनिक पोकलेन आणि इतर अत्यावश्यक यंत्रणा लागते. ती यंत्रणा उभी करण्यासाठी अर्थसंकल्पात दीड कोटींचीच तरतूद आहे. इतक्या कमी रकमेत कार्यवाही शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. आता मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी १० कोटी  रूपयांचा प्रस्ताव तयार करून तो लवकरच स्थायी समितीत मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर उपलब्ध निधीतून बेकायदा बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे, असे वेलरासू म्हणाले.

निधीच्या तरतुदीअभावी इमारतींना अभय

सहा वर्षांपूर्वी डोंबिवलीतील १२ बेकायदा इमारती निष्कासित करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली होती. परंतु, कार्यवाही करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा भाडय़ाने घेण्यासाठी पुरेशा निधीची तरतूद नसल्याने प्रशासनाने या अनधिकृत इमारतींना अभय दिले होते. या इमारती जमीनदोस्त करण्यासाठी सुमारे चार लाख रूपये खर्च येणार होता. या खर्चाची तरतूद नसल्याने इमारत तोडण्याचा विषय नंतर बारगळला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 1:50 am

Web Title: 10 crore proposal in kdmc for breaking unauthorized constructions
Next Stories
1 महापालिकेच्या कचराकुंडय़ांवर चोरांचा डल्ला?
2 जलमापकांना ठाण्यात मुहूर्त
3 ठाण्यातील भेंडी, कारली युरोपच्या बाजारात
Just Now!
X