भाजपचे संसद ते पंचायत प्रत्येक स्तरावर निर्विवाद वर्चस्व मिळविण्याचे धोरण आणि प्रादेशिक पक्ष म्हणून स्वत:चे अस्तित्व टिकविण्याच्यादृष्टीने शिवसेनेची सुरू असलेली धडपड या कारणांमुळे कल्याण-डोंबिवली महानगपालिकेची यंदाची निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रातील दूरगामी राजकीय समीकरणांच्यादृष्टीने ‘ट्रेंड सेटर’ ठरू शकणाऱ्या या निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वपूर्ण ठरू शकतील, यावर टाकलेली नजर.

१. विधानसभा निवडणुकीच्यावेळी एकमेकांपासून फारकत घेतल्यानंतर शिवसेना आणि भाजप दुसऱ्यांदा स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. सद्यस्थितीत शिवसेना आणि भाजपमधील वादही विकोपाला पोहचले आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत दोघांपैकी कोणाची सरशी होणार, याकडे राजकीय वर्तुळातील जाणकारांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी  लढवलेल्या नवी मुंबई आणि औरंगाबाद  महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रादेशिक पक्ष म्हणून भाजपला स्वत:ची ताकद दाखवून दिली होती.

२. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत गेली २० वर्षे शिवसेना-भाजप एकत्रितपणे सत्ता उपभोगत आहेत. या काळातील दोन्ही पक्षांची कामगिरी तितकीशी उत्साहवर्धक नाही. याशिवाय, दीर्घकाळ सत्तेत राहिल्यामुळे तयार होणाऱ्या अँटी-इन्कम्बसी फॅक्टरमुळे स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेना आणि भाजपला फटका बसू शकतो. त्यामुळे सध्या प्रचारात शिवसेनेकडून उपस्थित केले जाणारे भावनिक, प्रतिकात्मक मुद्दे आणि भाजपकडून दाखविण्यात येणारे स्मार्ट सिटीचे स्वप्न अँटी-इन्कम्बसी फॅक्टरवर मात करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

३. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याण-डोंबिवली निवडणुकीच्या प्रचारात जातीने उतरल्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी आणखीनच प्रतिष्ठेची बनली आहे. नरेंद्र मोदींप्रमाणे देवेंद्र फडणवीसदेखील महाराष्ट्रात भाजपसाठी हुकमी एक्का ठरू शकतात का, या प्रश्नाचे उत्तर या निवडणुकीत मिळू शकेल.

४. भाजपकडून मिळणाऱ्या दुय्यमपणाच्या वागणुकीमुळे शिवसेनेने गेल्या काही दिवसांत भाजपवर जाहीरपणे टीका करायला मागेपुढे पाहिलेले नाही. मात्र, भाजपनेही शिवसेनेच्या प्रत्येक टीकेला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या जोरावर शिवसेना भाजपचा माज उतरवण्यास समर्थ असल्याचा दावा खरा करून दाखवणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

५. तुमचे एक मत म्हणजेच बाळासाहेबांना श्रद्धांजली, डोंबिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकराचे स्मारक हे मुद्दे यंदाच्या निवडणुकीत सेनेच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत. शिवसेनेच्या या भावनिक राजकारणाला कल्याण-डोंबिवलीकर प्रतिसाद देणार का, यावर सेनेचे भवितव्य अवलंबून आहे.

६. कल्याण-डोंबिवलीतील परंपरागत मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला डावलून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वत:च्या मर्जीतील उमेदवार दिल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकांच्यावेळी भाजपची एकहाती सत्ता आणण्यात संघ कार्यकर्त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यामुळे कल्याण- डोंबिवलीत संघाची समजूत काढण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न अपयशी ठरल्यास भाजपला निवडणुकीत फटका बसू शकतो. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने रिवद चव्हाण यांनी उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या संघाची मते महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वळली होती.

७. कल्याण-डोंबिवली निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचारात आश्चर्यजनक मुसंडी मारली आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेच्या काळात झालेल्या विकासकामांचे राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेले सादरीकरण मतदारांना विचार करायला लावू शकते. लोकसभा आणि विधानसभेच्या अपयशानंतर ही निवडणूक मनसेसाठी कमबॅक ठरू शकते का, याकडेही अनेकाचे लक्ष आहे.

८. शिवसेना-भाजप यांच्या आपापसातील लढतीमुळे ही निवडणूक अटीतटीची ठरणार, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोघांपैकी एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणे जवळपास अशक्य आहे. अशावेळी सत्तास्थापनेची वेळ आल्यास मनसेप्रमुख राज ठाकरे किंगमेकर ठरू शकतात. सध्याच्या घडीला कल्याण-डोंबिवली महापालिकेतील १२२ जागांपैकी २७ जागांवर मनसेचे नगरसेवक आहेत.

९. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व मिळविण्याच्यादृष्टीने भाजप आणि शिवसेनेने आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. भविष्यात स्वतंत्रपणे लढायचे झाल्यास कोणते फायदे आणि आव्हाने असतील याचा अंदाज घेण्यासाठी कल्याण-डोंबिवलीची निवडणूक ही लिटमस टेस्ट ठरू शकते. याशिवाय, शिवसेना आणि भाजप यांना मिळणाऱ्या यशावर युतीचे भवितव्य ठरेल.

१०. सत्तेत असताना एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणारे काँग्रेस-राष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक एकत्रपणे लढवित आहेत. मात्र, भविष्यातील राजकारणाचा वेध घेऊनच राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर जमवून घेतल्याची चर्चा आहे. कल्याण-डोंबिवलीत दोन्ही पक्षांना तितकासा जनाधारही नाही. परंतु, शिवसेना आणि भाजपमधील वादाचा काहीप्रमाणात फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे.