News Flash

फळांच्या दरात १० ते ४० रुपयांची वाढ

दर वधारल्याने मागणीत घट

हिवाळ्याच्या दिवसांत फळांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. मात्र यंदा अतिवृष्टीमुळे फळांची आवक घटल्याने त्यांच्या दरात १० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : हिवाळ्याच्या दिवसांत फळांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. मात्र यंदा अतिवृष्टीमुळे फळांची आवक घटल्याने त्यांच्या दरात १० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. दरवाढीमुळे अनेकांनी फळ खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे फळांच्या मागणीत घट झाल्याचे फळ विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

हिवाळ्याच्या दिवसांत अनेक जण उत्तम आरोग्यासाठी दररोजच्या आहारामध्ये फळांचेही सेवन करतात. त्यामुळे या काळात फळांना जास्त मागणी असते. दरवर्षी या काळात फळांचे दरही स्थिर असतात. मात्र, ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजी पिकांसह, फळांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील बाजारपेठांत होणारी फळांची आवक घटली असून त्यांच्या दरात १० ते ४० रुपयांनी वाढ झाल्याचे किरकोळ विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील बाजारपेठेत नाशिकहून डाळिंबाची आवक मोठय़ा प्रमाणात होत असते. या काळात डाळिंबाला मोठी मागणी असते, परंतु अतिवृष्टीमुळे या पिकाचेही नुकसान झाले असून त्यांची आवक घटली आहे. आवक घटल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पूर्वी १८० रुपये किलोने मिळणारे डाळिंब सद्य:स्थितीला २२० रुपये किलोने विकले जात आहे. तर चिकू, सीताफळ, मोसंबी आणि सफरचंद यांच्या दरातही वाढ झाली असून त्यांची मागणी घटली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत सप्टेंबर महिन्यापर्यंतच सफरचंदाची आवक होत असते. त्यामुळे सध्या साठवणुकीत ठेवलेल्या सफरचंद बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. त्याच्या दरातही वाढ झाली आहे, अशी माहिती किरकोळ बाजारातील फळ विक्रेत्यांनी दिली.

हिवाळ्याच्या दिवसांत फळांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. मात्र, यंदाच्या वर्षी फळांची आवक घटल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी, त्यांची मागणी घटली आहे.
– गुड्डू गुप्ता, फळ विक्रेते, ठाणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 3:14 am

Web Title: 10 to 40 rupees hike in fruits rate dd70
Next Stories
1 कोंडी फोडण्यासाठी पोलीस सज्ज
2 पलावा उड्डाणपुलाच्या आराखडय़ास मंजुरी
3 १५० पेक्षा अधिक इमारतींचा पुनर्विकास
Just Now!
X