वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गुन्हा

ठाणे पोलीस मुख्यालयातील राखीव दलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी या विभागातील १० महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करून त्यांना धमकावल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे. एका पीडित महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली असता, त्यादरम्यान दहा महिला पोलिसांनी शिंदे यांच्याविरोधात अशीच तक्रार केली. त्यामुळे शिंदे यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्यात त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नसून या संपूर्ण प्रकरणात कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

ठाणे पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस दलामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर नामदेव शिंदे हे काम करतात. या विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरोधात पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामध्ये विनयभंग, त्रास देणे आणि धमकाविणे अशा स्वरूपाचे आरोप शिंदे यांच्यावर करण्यात आले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन आयुक्त सिंग यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमली होती. मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नरनवरे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. चौकशीदरम्यान दहा महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी शिंदे यांच्याकडून होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली होती. त्याचप्रमाणे या दहा व्यतिरिक्त आणखी महिला पोलीस कर्मचारीही शिंदे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी समितीपुढे आले होते.

दीड महिन्यांपूर्वी नेमलेल्या समितीने या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल नुकताच पोलीस आयुक्त सिंग यांच्याकडे सादर केला असून या अहवालामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या वृत्तास पोलीस उपायुक्त नरनवरे यांनीही दुजोरा दिला आहे. असे असतानाच एका पीडित महिला पोलीस कर्मचारीने ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीच्या आधारे शिंदे यांच्यावर विनयभंग आणि धमकविल्याच्या आरोपाखाली ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिंदे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. या संदर्भात अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तुमच्याकडे तशा आदेशाची प्रत आहे का, असा उलट सवाल विचारत याविषयी माहिती देणे टाळले.