|| सुहास बिऱ्हाडे

वसई-विरार महापालिकेच्या मालमत्ता करवसुलीच्या मोहिमेला यश

वसई : वसई-विरार महापालिकेने मागील दोन महिन्यांत मालमत्ता करापोटी १०० कोटी रुपयांचे वसुली केली आहे, तर दुसरीकडे पालिकेचे उत्पन्नवाढीसाठी नव्याने मालमत्तांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले असून नवीन मालत्तांनाही करआकारणी केली जात आहे.

वसई-विरार शहर महापालिकेच्या मालमत्ता कराचे अपेक्षित उत्पन्न हे ५२९ कोटी आहे. याशिवाय मोबाइल मनोरे करापोटीचे ९१ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. तसेच पाणीपट्टी करापोटी ८१ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. करोनामुळे पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडला आहे. त्यामुळे पालिकेने आर्थिक घडी पुन्हा सावरण्यासाठी मालमत्ता कराच्या वसुलीवर भर दिला होता. त्यासाठी जनजागृती करण्यावर भर दिला होता. त्याचा परिणाम म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत  पालिकेच्या मालमत्ता कराची १०० कोटी रुपयांची वसुली झाली आहे.

शहरातील मालमत्ता कराच्या मागणीचा आकडा नेहमी फुगीर असतो. याचे कारण अनेक मालमत्ता या निर्लेखित असतात. अशा मालमत्ता वगळण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. शहरात १० हजार निर्लेखित मालमत्ता असून त्या वगळण्याचे काम सुरू असल्याची माहिती उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिली. थकीत मालमत्ताधारकांवर जप्तीची  कारवाई करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात वाणिज्य मालमत्तांना जप्तीची नोटीस पाठवून कारवाई करण्यात येणार आहे. मालमत्ता वसुलीचे प्रमाण ७५ टक्क्यांवर नेण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

नव्याने मालमत्तांचे पुनर्सर्वेक्षण सुरू

कुठल्याही महापालिकेत मालमत्ता कर हे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत असते.  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अन्वये करआकारणी करायची असते. यामध्ये एकत्रित मालमत्ता कर, शिक्षण उपकर, रोजगार हमी कर (वाणिज्य), पथकर व सुधार आकार कर, मलनिस्सारण कर, पाणीपट्टी आणि पाणीपट्टी लाभ कर या करांचा समावेश असतो.

सध्या वसई-विरार महापालिका हद्दीत  ७ लाख ४९ हजार मालमत्ता आहेत. मात्र या मालमत्ताचे योग्य करनिर्धारण झाले नसल्याने शेकडो कोटी रुपयांचे उत्पन्नावर पाणी फेरावे लागत आहे. २००९ साली महापालिका स्थापन झाली तेव्हा चार नगरपरिषद आणि ५२ ग्रामपंचायत हद्दीमधील गावांचा समावेश झाला होता.

त्यानंतर मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण झालेले नव्हते. त्यामुळे अनेक मालमत्तांना चुकीची करआकारणी करण्यात आलेली होती, तर अनेक मालमत्तांना करआकारणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ते उत्पन्न पालिकेला मिळत नव्हते. त्यामुळे पालिकेने नव्याने कर सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. पालिकेने वालीवच्या प्रभाग समिती जी मधून या कामाला सुरुवात केली आहे.

या प्रभागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत चाळी, तबेले, स्टुडियो, गोदामे उभारण्यात आली आहे. त्यांना पालिकेने कर लावण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पालिकेच्या चार अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. वालीव प्रभागात नव्याने कर सर्वेक्षण केल्यानंतर अनेक मालमत्ता समोर आल्या आहेत. त्यामुळे एकट्या वालीव प्रभागातून २२ कोटी रुपयांनी उत्पन्नात वाढ होऊ शकणार आहे.

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. दोन महिन्यांत १०० कोटींची वसुली झाली आहे. चालू आर्थिक वर्षांत वसुलीचे प्रमाण ७५ टक्क्यांवर नेण्यात येणार आहे. नव्याने कर सर्वेक्षणासही सुरुवात झाली असून सर्व नऊ प्रभागांमध्ये हे सर्वेक्षण करून नवीन मालमत्तांना करआकारणी केली जाणार आहे

– प्रदीप जांभळे-पाटील, उपायुक्त, वसई-विरार महापालिका.