News Flash

ठाण्याच्या अर्थसंकल्पात १०० कोटींची वाढ

अर्थसंकल्प आता अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महिनाभरापूर्वी सादर केलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये स्थायी समितीने सुमारे १०९.५० कोटी रुपयांची वाढ सुचविली आहे. यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प आता २६५९.३२ कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. या अर्थसंकल्पात वाढ सुचविताना स्थायी समितीने शहर विकास, अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम, पुनप्र्रक्रिया केलेले पाणी, अतिक्रमण, स्थावर मालमत्ता, आरोग्य आणि क्रीडा अशा विभागांवर वाढीव उत्पन्नाचा भार टाकला आहे. दरम्यान, जयस्वाल यांच्या वास्तववादी अर्थसंकल्पावर स्थायी समितीनेही एकप्रकारे मोहर उमटवली असून रकमांमध्ये अवाचे सव्वा वाढ करण्याचा मोह यंदा टाळला आहे.

दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने तब्बल ५०० कोटी रुपयांची वाढ सुचवली होती. त्यामुळे उत्पन्नाच्या बाजूचे आकडे विनाकारण फुगले होते. अशा फुगीर अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणे शक्य नसल्याचे कारण देत गुप्ता यांनी विकासकामांच्या अंमलबजावणीवर नियंत्रण आणले होते. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या जमा खर्चाचे गणित पूर्णपणे बिघडल्याचे चित्र होते. संजीव जयस्वाल यांनी वर्षभरापूर्वी सादर केलेला अर्थसंकल्प अधिक वास्तवादी होता. तसेच अर्थसंकल्पातील आकडे फुगविताना सदस्यांनी वास्तवतेचे भान ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यामुळे स्थायी समितीने जयस्वाल यांच्या अर्थसंकल्पात जेमतेम १०० कोटी रुपयांची वाढ करून विकासकामांना गती कशी मिळेल याची काळजी घेतली आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मात्र गेल्या वर्षभरामध्ये महापालिकेची आर्थिक स्थिती रुळावर आणली आहे. यामुळे पालिकेच्या जमा-खर्चाचे भान लक्षात घेऊन आयुक्त जयस्वाल यांनी महिनाभरापूर्वी यंदाचा वास्तववादी अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर केला. सुमारे २५४९.८२ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प होता. गेल्या दहा दिवसांपासून स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. अखेर गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीत अर्थसंकल्पामध्ये सुमारे १०९.५० कोटी रुपयांची वाढ सुचवून त्यास मान्यता देण्यात आली. यामुळे हा अर्थसंकल्प आता २६५९.३२ कोटी रुपयांचा झाला असून तो आता अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.

वाढीव उत्पन्न

शहर विकास विभाग ७० कोटी, अग्निशमन दल १० कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग १५ कोटी, अतिक्रमण विभाग २.९० कोटी, स्थावर मालमत्ता विभाग एक कोटी, आरोग्य विभाग ५० लाख, क्रीडा प्रेक्षागृह १० लाख असे या विभागांकडून वाढीव उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. या शिवाय पुनप्र्रक्रिया केलेले पाणी विक्रीतूनही वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे, मात्र तो आकडा स्पष्ट होऊ शकलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 1:47 am

Web Title: 100 crore increase at thane municipal corporation
टॅग : Thane
Next Stories
1 एकपात्री अभिनय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
2 हिंदोळा, बंदिनी चित्रपट पाहण्याची रसिकांना संधी
3 येऊरमधील धनदांडग्यांना मुलभूत सुविधा कशा?
Just Now!
X