28 January 2021

News Flash

मीरा-भाईंदर महापालिकेची १०० कोटी करवसुली

मालमत्ता करवसुलीसाठी राबविवेल्या योजनेचा फायदा

मीरा-भाईंदर महापालिकेने मालमत्ता करवसुलीसाठी कंबर कसली आहे. पालिकेने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे डिसेंबरअखेपर्यंत पालिकेच्या मालमत्ता कराची वसुली शंभर कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

मीरा-भाईंदर शहरात सुमारे ३ लाख ४२ हजार मालमत्ता असून त्यात निवासी मालमत्तांची संख्या २ लाख ८७ हजार, तर व्यावसायिक मालमत्तांची संख्या ५५ हजार इतकी आहे. पालिकेने सन २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षांत मालमत्ता करापोटी २७१ कोटींचे उत्पन्न निश्चित केले आहे. गेल्या मार्च महिन्यापासून देशभरात करोनाच्या टाळेबंदी नियमामुळे पालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. पालिकेच्या उत्पन्नातील महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली करोनामुळे रखडली होती. करवसुलीसाठी पालिकेने कंबर कसली आहे. करोनाच्या र्निबधामुळे नागरिक पालिकेच्या केंद्रात कर भरण्यासाठी येत नव्हते. त्यामुळे पालिकेतर्फे कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मात्र ऑनलाइन कर भरण्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. वसुली एकूण उद्दिष्टापैकी केवळ ०.५५ टक्के इतकीच ठरली. त्यामुळे पालिकेने ऑगस्ट महिन्यापासून कराची देयके वाटण्यास तसेच ऑनलाइनसह थेट करवसुलीला सुरुवात केली होती. याशिवाय नागरिकांनी कर भरावा म्हणून मोठय़ा प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली होती. करवसुलीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्याने करवसुलीत वाढ झाली. सप्टेंबपर्यंत तब्बल २५ कोटी करवसुलीत वाढ झाली होती. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत ७५ कोटींची भर पडली आणि मालमत्ता कराची वसुली १०० कोटी एवढी झाली.
आम्ही केलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे करवसुली १०० कोटी एवढी झाली. येत्या काळात अधिक उपाययोजना आखून मालमत्ता कराचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती करनिर्धारक आणि संकलन विभाग अधिकारी संजय दोंदे यांनी दिली.

कर थकबाकीदारांची नावे सार्वजनिक करणार

शहरातील अनेक मालमत्ताधारकांचा करथकबाकी लाख रुपयांच्या वर गेली आहे वारंवार नोटिसा बजावूनही त्यांनी करभरणा केलेला नाही. त्यामुळे अशा करथकबाकीदारांची नावे सार्वजनिक करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक चौकात अशा मालमत्ताधारकांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 1:44 am

Web Title: 100 crore tax collection of mira bhayander municipal corporation mppg 94
Next Stories
1 लोंबकळत्या वीजवाहक तारांचा धोका कायम
2 रुग्णालयांचे पुनर्परीक्षण
3 श्रेय घेणारे तेव्हा कुठे होते?
Just Now!
X