विशेष मोहिमेमुळे पालिकेच्या तिजोरीत भर; २३०० नळजोडण्या खंडित

ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत शंभर कोटी रुपयांची वसुली झाली आहे.  करोना टाळेबंदीमुळे काहीशी उशिराने म्हणजेच ऑगस्ट महिन्यापासून पाणी देयकांची वसूल सुरू झाली असली तरी ती गेल्यावर्षीच्या तुलनेत सहा कोटी रुपयांनी जास्त असल्याचे दिसून येत आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात महापालिका यंत्रणा व्यस्त होत्या. या कामामुळे जुलै महिनाअखेरपर्यंत मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली होऊ शकली नव्हती. त्यामुळे पालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दोन्ही करांच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून महापालिका प्रशासनाने कर वसुलीवर भर देऊन त्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेची पथके कार्यरत आहेत. या मोहिमेत चालू आणि मागील वर्षांच्या पाणी देयकांची वसुली केली जात असून त्यात पाणी देयकांची थकबाकी देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची नळजोडणी तोडली जात आहेत. ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत २३०० नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत. तसेच आतापर्यंत एकूण शंभर कोटी रुपयांच्या पाणी देयकांची वसुली करण्यात पालिकेला यश आले आहे.

१४० कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण दीड लाख घरगुती नळजोडणीधारक आहेत, तर ६ हजार ५०० वाणिज्य नळजोडणीधारक आहेत. पाणी देयकांच्या वसुलीपोटी अर्थसंकल्पामध्ये १७५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, ते कमी करून आता १६० कोटी रुपये इतके करण्यात आले आहे. मात्र, गेल्यावर्षी १३३ कोटींची वसुली झाली होती. त्यामुळे येत्या मार्च महिनाअखेरपर्यंत १६० ऐवजी १४० कोटींचा आकडा गाठणे शक्य होईल, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.