शंभरी पार केलेल्या जोडप्याचा एकाच दिवशी मृत्यू; ७० वर्षांची सोबत एकत्रच निमाली

विवाहानंतर संपूर्ण आयुष्य एकत्रितरीत्या आनंदाने घालवण्याच्या आणाभाका अनेक जोडपी घेतात, मात्र जोडीदारांच्या मृत्यूनंतर केवळ त्याच्या आठवणीच शिल्लक राहतात. मीरा रोडमधील शंभरी पार केलेल्या जोडप्याला मृत्यूही विभक्त करू शकला नाही. एकमेकांच्या प्रेमाखातर बांधलेली लग्नगाठ मृत्यूनंतरही सोडायची नाही, अशी खूणगाठ बांधलेल्या या जोडप्याचा मृत्यू एकाच दिवशी अगदी काही तासांच्या अंतराने झाला. तब्बल ७० वर्षे एकमेकांसोबत काढल्यानंतर जीवनाची अखेरची यात्राही सोबतच केलेल्या या जोडप्याचा एकमेकांवरील प्रेमाचा हा आदर्श दखल घेण्याजोगाच आहे.

मीरा रोड येथील १०७ वर्षीय नाथुजी राठोड यांचे सोमवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास निधन झाले आणि त्यांचा विरह सहन न झालेल्या त्यांच्या पत्नी १०३ वर्षीय नसीबन राठोड यांनीही काही तासांतच आपला देह ठेवला. या दोघांची अंत्ययात्रा एकत्रच काढण्यात आली. मीरा रोडच्या दफनभूमीत दोघांना एकमेकांच्या शेजारीच दफन करण्यात आले.

नाथुजी राठोड हे मूळचे राजस्थानमधील मनोहरपूर येथील निवासी. ५५ वर्षांपूर्वी कुटुंबासह ते मुंबईत दाखल झाले. मीरा रोडच्या नयानगर भागातील गंगा कॉम्प्लेक्समधील गुलमोहर या इमारतीत त्यांचे सध्या वास्तव्य होते. पडदे तयार करण्याचा त्यांचा पिढीजात व्यवसाय. सुमारे ७० वर्षांपूर्वी त्यांचा नसीबन यांच्याशी विवाह झाला. एरवी संसार म्हटला की भांडय़ाला भांडे लागण्याचे प्रकार होतच असतात, परंतु दोघा पती-पत्नीचे एकमेकांवर इतके निस्सिम प्रेम होते की त्यांच्यात भांडण अथवा तंटा झाल्याचे कधी पाहाण्यात आले नसल्याचे किंवा दोघेही एकमेकाला सोडून इतरत्र राहिले आहेत, असेही कधी झाल्याचे स्मरत नाही. इतकेच काय, परंतु मरणालाही एकत्रच सामोरे जायचे, असे पती-पत्नी नेहमी एकमेकाला सांगत असत, असे त्यांचे नातेवाईक सांगतात. त्यांची ही इच्छा खरोखरच पूर्ण झाली.

शेवटपर्यंत तब्येत खणखणीत असलेले नाथुजी राठोड यांना दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु नसीबन यांना त्यांच्याजवळच राहायचे होते. त्यांना रविवारी रुग्णालयातून घरी आणले आणि सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली, मात्र राठोड आता हयात नसल्याचे नसीबन यांना आधी सांगितले गेले नाही. मात्र त्यांच्या अंत्ययात्रेची वेळ जवळ येण्याच्या आधी नसीबन यांना राठोड यांच्या मृत्यूची कल्पना दिली गेली. साथीदाराच्या विरहाचे दु:ख पचवणे नसीबन यांना जड गेले आणि त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला. इहलोकात एकमेकांच्या सोबतीने सुरू झालेली यात्रा परलोकातही कायम ठेवणाऱ्या या जोडप्याचे प्रेम कायमस्वरूपी स्मरणात राहील असेच आहे.