महिनाभर उपचारानंतर घरी

ठाणे : शहराच्या खोपट भागातील सिद्धेश्वर तलाव परिसरात राहणाऱ्या १०३ वर्ष वयाचे आजोबा करोना संसर्गातून बरे झाले आहेत. सुखासिंग छाबरा असे त्यांचे नाव असून त्यांच्यावर ठाण्यातील कौशल्य मेडिकल फाऊंडेशन ट्रस्ट रुग्णालयात उपचार करण्यात आले. महिनाभराच्या यशस्वी उपचारानंतर सुखासिंग सोमवारी घरी परतले आहेत.

महिन्याभरापूर्वी करोनाची लक्षणे दिसू लागल्याने सुखासिंग छाबरा यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा करोना अहवाल होकारात्मक आल्याने त्यांना २ जून रोजी ठाण्यातील कौशल्य मेडिकल फाऊंडेशन ट्रस्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर करोनाचे उपचार सुरू असताना त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले होते. त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेता त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. सुखासिंग यांच्यावर रुग्णालयातील डॉ. अमोल भानूशाली आणि डॉ. समीप सोहोनी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमित लाला खोमाने यांचे पथक उपचार करत होते. एक महिन्याच्या यशस्वी उपचारानंतर सुखासिंग छाबरा यांनी करोनावर यशस्वी मात केली असून सोमवारी त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.